esakal | याला म्हणतात यश! घरोघरी दूध वाटणारा मुलगा बनला CA, पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत उपसले कष्ट I CA Exam
sakal

बोलून बातमी शोधा

Ajay Kadam

अजयने आठवीत असताना चार्टर्ड अकाउंटंट बनण्याचा निर्णय घेतला.

याला म्हणतात यश! घरोघरी दूध वाटणारा मुलगा बनला CA

sakal_logo
By
अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (सातारा) : घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे वाटणीला आलेला संघर्ष पार करत येथील अजय भरत कदम हा विद्यार्थी सीए परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. वडिलांच्या व्यवसायात त्यांच्याबरोबरीने काम करून त्याने घरोघरी दूधही वाटले. जिद्द, चिकाटी, परिश्रम घेत त्याने हे यश प्राप्त केले. पहाटेपासून दुपारपर्यंत दूधविक्री आणि त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत शिक्षण व अभ्यास हा दिनक्रम ठेवणारा अजय सीए झाल्याने आई-वडिलांच्या डोळ्याचे पारणे फिटले आहे.

अजयने आठवीत असताना चार्टर्ड अकाउंटंट बनण्याचा निर्णय घेतला. शाळेत झालेल्या एका सीएंच्या भाषणातून चार्टर्ड अकाउंटंट या पदवीची त्याला ओळख झाली. अजय व त्याच्या बहिणीच्या शिक्षणासाठी आई-वडील कऱ्हाडवरून ४०० किलोमीटर दूर नाशिकला गेले. एखाद्या नवीन शहरात येऊन शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे हे खरच खूप मोठे दिव्य होते; परंतु मुलांच्या भविष्यासाठी अजयची आई मनीषा व वडील भरत यांनी हा निर्णय घेतला. अजयच्या घरची परिस्थिती नाजूक आहे. वडील घरोघरी दूध वाटून आणि आई शिवणकाम करून आर्थिक परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करतात. अजयने दहावीची परीक्षा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी वडिलांना त्यांच्या दूध व्यवसायात मदत करायला सुरुवात केली. अभ्यासासह दूधविक्री हा दिनक्रम बनवत दररोज सुमारे १६ ते १८ तास त्याने काम केले.

हेही वाचा: खुशखबर! इंडियन आर्मीत NCC भरती; तब्बल 2.50 लाख मिळणार पगार

पहाटे चार वाजता उठून दुपारी १२ वाजेपर्यंत दूध वाटायचे. त्यानंतर शिकवणी, ती संपली की अभ्यास संपवून रात्री १२ वाजता झोपायचे. रोज हा दिनक्रम त्याने सातत्याने सुरू ठेवला. सीए करण्याचा निर्णय ठाम असल्याने दहावीनंतर त्याने वाणिज्य शाखा निवडली. अकरावी, बारावी आणि सीपीटी या सीएच्या पात्रता परीक्षांसाठी सीए समीर तोतले यांचे मार्गदर्शन लाभले. पुढील स्तरातील आयपीसीसीसाठी सीए विशाल पोद्दार यांनी मार्गदर्शन केले. पहिल्याच प्रयत्नात तो परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यानंतर व्यावहारिक अनुभवासाठी नाशिकमधील सर्वोत्तम एका फर्ममध्ये तो काम करत आहे. तीन वर्षे अत्यंत खडतरतेने व्यावहारिक अनुभव पूर्ण केला. पालक भरत व आई मनीषा, श्रीकांत दळवी, समीर तोतले, विशाल पोद्दार, संजीव मुथा आदींचे त्याला मार्गदर्शन मिळाले.

हेही वाचा: UPSC परीक्षेत देशात 'टॉप' आलेल्या शुभमनं सांगितलं यशाचं Secret

जेव्हा मी माझ्या पालकांच्या डोळ्यात पाहतो तेव्हा असे वाटते, की मी माझ्या पालकांसाठी काहीतरी मोठे साध्य केले आहे; पण प्रवास अजून पूर्ण झालेला नाही. माझ्यासाठी ही नवीन सुरुवात आहे. काही आणखी मोठ करून दाखवायचे आहे.

-सीए अजय कदम

हेही वाचा: इच्छा तेथे मार्ग! स्पर्धा परीक्षेचा अभ्यास होतोय एका रेल्वे स्टेशनवर

loading image
go to top