मागील लेखात आपण नकारात्मकतेची माहिती घेतली. नकारात्मकतेचा काय परिणाम होतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे..१) घडणाऱ्या घटना, गोष्टी, वागणूक इत्यादी काळ्या पांढऱ्या श्रेणीत पहाणे : टोकाचा विचार करणे. काळ्या आणि पांढऱ्या मध्ये ग्रे किंवा राखाडी शेड असते हे मान्यच नसणे. उदा. मी एखादी गोष्ट परिपूर्ण केली नाही तर त्याचा अर्थ मी पूर्णपणे अपयशी आहे असा विचार करणे.२) अतिसामान्यीकरण : आपल्या हातून एखादी जरी चूक झाली तरीसुद्धा ‘मी एकही काम नीट करू शकत नाही’ असा विचार करणे.३) मानसिक चाळणी : घडणाऱ्या सकारात्मक, अनुकूल घटनांकडे दुर्लक्ष करणे आणि एखाद्या नकारात्मक किंवा प्रतिकूल घटनेवरच लक्ष केंद्रित करणे..४) सकारात्मक गोष्टींचे अवमूल्यन करणे : कौतुकास्पद काम झालं आणि कोणी अभिनंदन केलं तरी ते अभिनंदन केवळ मला बरं वाटावं म्हणून केलेलं आहे. खरं तर काम काही इतकं चांगलं झालं नाही आहे, अशा सारखा विचार करणे.५) घाईघाईने निष्कर्ष काढणे : सारासार विचार न करता निगेटिव्ह मत बनवून टाकायचं. कुठलाही सबळ पुरावा किंवा तर्कविचार हाताशी नसताना प्रतिकूल गोष्टच घडेल हा जणू निर्णयच करून टाकायचा. उदा. कंपनीमध्ये कर्मचारी काढणार आहेत असे सांगितले जाते. त्यात माझा नंबर नक्की असणार. माझी नोकरी जाणार. माझं कुटुंब रस्त्यावर येणार.६) भावनिक तर्क : आपल्याला जसं वाटतंय तेच खरोखरचं वास्तव किंवा वस्तुस्थिती आहे असं मानून चालणं. उदा. एकुणात मी अपयशीच आहे असं मला वाटतं. आता मला आतून तसं वाटतंय म्हणजे तसंच असलं पाहिजे..७) अपेक्षा ठेवणे : ‘असे केलेच पाहिजे’ आणि ‘असे अजिबात करू नये’ अशा कठोर अपेक्षा ठेवणे. स्वत:ला ‘च’च्या कुलुपात अडकवून टाकणं. म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडून विशिष्ट पद्धतीनं झालीच पाहिजे. झाली‘च’ पाहिजे हा अट्टहास असतो. किंवा एखादी गोष्ट माझ्याकडून होता‘च’ कामा नये. तशी ती झाली‘च’ किंवा झाली‘च’ नाही तर स्वतःवर विलक्षण चिडचिड होते. पर्यायाने मनःस्वास्थ्य बिघडते. आजूबाजूच्या वातावरणावर आणि व्यक्तींवरही विपरीत परिणाम होतो.८) विशिष्ट शिक्का मारणे : पूर्वी आलेल्या लहानशा अपयशामुळे आपण म्हणजे ‘मूर्तिमंत अपयश’ असं लेबल स्वत:ला लावून टाकायचं आणि या गैरसमजुतीच्या प्रभावाखाली सतत दडपणाखाली रहायचं. आपल्याकडून चांगलं असं काही होऊच शकणार नाही हे जणू ठरवूनच टाकायचं.९) स्वतःला कारणीभूत मानणे : काही विपरीत, प्रतिकूल घडलं किंवा काही चुकीचं घडलं तर दोष स्वतःकडे घेण्याची प्रवृत्ती. आपणच या चुकीला जबाबदार आहोत. आपण असे वागलो म्हणून हे असं प्रतिकूल घडलं असा विचार करण्याची सवय.१०) अतिशयोक्तीकरण : आपल्या बाबतीत सगळं छान घडत असताना, घडलेलं असताना, ते दुर्लक्षित करून एखादी लहानशी कमतरता उगाळत बसणे. घडलेल्या सकारात्मक गोष्टींपेक्षा लहानशा नकारार्थी गोष्टीलाच महत्त्व देत बसणे. ती मोठी करून पहाणे..आपली विचार करण्याची पद्धत वरील प्रकारात मोडते का हे तपासायला हवं. या सगळ्या विचार करण्याच्या चुकीच्या पद्धती आपलं मनःस्वास्थ्य बिघडवून टाकतात. आपल्या प्रगतीच्या आड येतात. आपली मनःस्थिती ही ‘ब्रेन केमिस्ट्री’वर अवलंबून असते. प्रत्येक विचार मग तो सकारात्मक असो वा नकारात्मक आपल्या ‘ब्रेन केमिस्ट्री’वर परिणाम करतो. सकारात्मक विचार ‘ब्रेन केमिस्ट्री’मध्ये चांगले बदल घडवून आणतात आणि मनःस्थिती स्वस्थ, शांत तरीही उत्साही बनत जाते. आपण कार्य प्रवृत्त होतो. आणि मुख्य म्हणजे जीवनातला प्रत्येक क्षण रसरसून आनंदानं जगायला प्रवृत्त होतो..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.