esakal | नोकरीनिमित्त तरुण बनले 'पुणेरी सोलापूरकर'! साडेआठ महिन्यांत दोन लाख ब्रेन ड्रेन
sakal

बोलून बातमी शोधा

नोकरीनिमित्त तरुण बनले "पुणेरी सोलापूरकर'! साडेआठ महिन्यांत दोन लाख ब्रेन ड्रेन

जिल्ह्यातील 15 अभियांत्रिकी महाविद्यालयांतून दरवर्षी अंदाजित साडेसहा हजार अभियंते शिकून बाहेर पडतात.

नोकरीनिमित्त तरुण बनले 'पुणेरी सोलापूरकर'!

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यातील 15 अभियांत्रिकी महाविद्यालयांतून (Engineering Colleges) दरवर्षी अंदाजित साडेसहा हजार अभियंते (Engineers) शिकून बाहेर पडतात. दुसरीकडे, विज्ञान (Science) शाखेतून पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, वैद्यकीय शिक्षण (Medical education), औद्योगिक प्रशिक्षण (Industrial training) घेतलेले हजारो विद्यार्थी शिक्षण पूर्ण करतात. मात्र, त्यांची अपेक्षापूर्ती होईल, असा जॉब (Jobs) मिळत नसल्याने त्यातील बहुतेक उच्चशिक्षित पुणेरी (Pune) सोलापूरकर (Solapur) झाले आहेत.

हेही वाचा: एकेकाळी पायात चप्पलही नव्हते, मात्र आज करतोय कोट्यवधींची उलाढाल!

मुंबई, ठाणे, पुण्यानंतर सोलापूर औद्योगिक वसाहतीत उद्योगवाढीला मोठा वाव असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. चिंचोळी एमआयडीसीत सध्या साडेतीनशेहून अधिक उद्योग सुरू असून, त्या ठिकाणी 30 ते 35 हजार कामगार काम करीत आहेत. शैक्षणिक हब, मेडिकल हब म्हणून सोलापूरची ओळख आहे. परंतु, शहर-ग्रामीणमधील तरुणांचे स्थलांतर अजूनही थांबलेले नाही. धक्‍कादायक बाब म्हणजे, जानेवारी ते 17 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील तब्बल एक लाख 92 हजार व्यक्‍ती रेल्वेतून पुण्याला गेल्या आहेत. त्यातून काहीजण परत आले असतील, परंतु बहुतेकजण त्याच ठिकाणी स्थायिक झाल्याचे चित्र आहे. खासगी वाहनानेही अनेकांनी कामाच्या शोधात स्थलांतर केल्याचे शालेय विद्यार्थ्यांच्या सर्व्हेतून समोर आले आहे. अभियांत्रिकीचे संगणक शिक्षण पूर्ण करून अनेक तरुण पुण्यातील आयटी कंपन्यांत तर काहीजण इतर कंपन्यांमध्ये जॉब करीत आहेत. अपेक्षित पगाराची नोकरी मिळाल्याने अनेक उच्चशिक्षित तरुण पुण्यात स्थायिक झाले आहेत. त्यांचे स्वप्न, अपेक्षा पूर्ण होण्यासाठी सोलापुरात आयटी इंडस्ट्रीजच्या नुसत्या घोषणा करून चालणार नाही, तर त्यासाठी विमानसेवा महत्त्वाची असून विमानसेवा सुरू होण्यासाठी उद्योजक, राजकीय नेत्यांसह प्रशासकीय स्तरावरून ठोस प्रयत्नांची गरज असल्याचे पुणेरी सोलापूकर तरुणांचे मत आहे.

चिंचोळी एमआयडीसीतील उद्योगांची सद्य:स्थिती

  • एकूण उद्योग : 370

  • अंदाजित कार्यरत कामगार : 35,000

  • जागा घेऊनही उद्योग सुरू नाहीत : 120

  • शिल्लक जागा : 280 एकर

उद्योगवाढीस वाव पण...

  • वाढीव उद्योगांसाठी उजनीतून मिळावे पुरेशा प्रमाणात पाणी

  • महामार्गांची कनेक्‍टिव्हिटी वाढली, रेल्वेचीही, पण दर्जेदार अंतर्गत रोड, रिंगरोड हवा

  • होटगी रोडवरील विमानसेवा सुरू व्हावी; परदेशी उद्योजकांना सहजपणे येण्यास अडचणी

  • बोरामणीला सुरवातीला व्हावी कार्गोची विमानसेवा

  • उद्योग सुरू करताना येणाऱ्या अडचणी तत्काळ सुटण्यासाठी विभागीय कार्यालयाची गरज

हेही वाचा: प्रतिकूल परिस्थितीत निमगावच्या शेतकरीपुत्राने मिळवले CA परीक्षेत यश

सोलापूर जिल्ह्यात उद्योगवाढीला खूप मोठा वाव आहे. महामार्गांची कनेक्‍टिव्हिटी वाढली असून रेल्वेसेवाही चांगली आहे. परंतु, विमानसेवा सुरू नसल्याने अनेक उद्योजकांची इच्छा असूनही ते सोलापुरात येत नाहीत. विमानसेवेचा प्रश्‍न प्राधान्याने सुटायला हवा; जेणेकरून भविष्यात तरुणांच्या अपेक्षा पूर्ण होतील, असे उद्योग सुरू होतील.

- राम रेड्डी, अध्यक्ष, सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन

loading image
go to top