UPSC Result : वडिलांची चहा टपरी, आई विडी कामगार...; मुलगा २३व्या वर्षी यूपीएससीत यशस्वी

लहानपणापासूनच मंगेश हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणला जात होता. त्यामुळे मोठ्या पदावर प्रतिष्ठेची नोकरी करण्याचं स्वप्नं बघायला त्याने सुरुवात केली.
UPSC Result
UPSC Result google

मुंबई : यूपीएससीचा निकाल जाहीर झाला असून त्यात संगमनेरच्या मंगेश खिलारीने ३९६वा क्रमांक पटकावला आहे. अवघ्या २३व्या वर्षी मंगेशने हे घवघवीत यश मिळवलं आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात मंगेशचा जन्म झाला. त्याचे वडील चहाची टपरी चालवतात. आई विडी कामगार असून शेतातही काम करते. (UPSC result 2023 mangesh khilari from sangamner ranked 396 in UPSC maharashtra toppers of UPSC )

मंगेशचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून झाले. त्यानंतर पुण्याच्या एसपी महाविद्यालयातून त्याने पॉलिटिकल सायन्समध्ये पदवी घेतली. त्याच वेळी त्याने पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.

लहानपणापासूनच मंगेश हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणला जात होता. त्यामुळे मोठ्या पदावर प्रतिष्ठेची नोकरी करण्याचं स्वप्नं बघायला त्याने सुरुवात केली. आयआयटी आणि यूपीएससी असे दोन पर्याय त्याच्याकडे होते.

आर्थिक परिस्थितीमुळे मंगेशला आयआयटीपर्यंत पोहोचता आले नाही. पण यूपीएससी देण्याचा त्याचा निश्चय पक्का होता. मंगेशला आयएएस व्हायचं आहे. आयपीएससाठी निवड झाल्यास तो पुन्हा आयएएससाठी प्रयत्न करणार आहे. या माध्यमातून समाजसेवा करण्याचं त्याचं स्वप्न आहे.

मंगेश नेमकं काय करतोय हे त्याच्या वडिलांना माहीत आहे. पण आईला त्या गोष्टी तितक्याशा समजत नाहीत. ती फक्त एवढंच सांगते, "माझा मुलगा खूप मोठी परीक्षा देतोय".

निकाल कळताच मंगेशने सर्वांत आधी वडिलांना फोन केला. आता गावी गेल्यानंतरही वडिलांना मिठी मारणार असल्याचं तो सांगतो. मंगेशने आजतागायत अशी मिठी वडिलांना कधीच मारलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com