भूगोल मनोरंजक करण्यासाठी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भूगोल मनोरंजक करण्यासाठी...

भूगोल हा विषय आपल्या शालेय अभ्यासक्रमाचा भाग आहे आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करताना तर खूपच गरजेचा.

भूगोल मनोरंजक करण्यासाठी...

- वैशाली मंडपे

भूगोल हा विषय आपल्या शालेय अभ्यासक्रमाचा भाग आहे आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करताना तर खूपच गरजेचा. मात्र, मुलं फारशा आवडीनं हा विषय शिकताना दिसत नाहीत. आपल्या दैनंदिन जीवनात एकंदरीतच भौगोलिक परिस्थिती, त्यातील बदल यांची माहिती असणं गरजेचं आहे.

आपल्याच राज्याविषयी किती माहिती आपणास असते? स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी असाही एक उपक्रम आपण शाळांमध्ये घेऊ शकतो. या उपक्रमात रोज एका राज्याची माहिती रंजक पद्धतीनं मुलांना सांगता येईल.

ही माहिती मिळवा...

१) त्या राज्याचं भौगोलिक वैशिष्ट्य.

२) तिथलं प्रमुख अन्न.

३) ऐतिहासिक ठिकाण.

४) नदी/सरोवर याविषयी माहिती.

५) धरण, बंधारे याविषयीची माहिती.

६) बोलली जाणारी भाषा, वेशभूषा, परंपरा यांची माहिती.

७) नकाशावर ते राज्य कुठे आहे हे मुलांना शोधायला सांगता येईल. यामुळे नकाशा वाचन हा महत्त्वाचा भाग नकळतपणे मुलं शिकतील.

८) एखादा विद्यार्थी/विद्यार्थिनीला वेशभूषा करून यायला सांगता येईल.

९) प्रत्येक राज्याचं संगीत/नृत्य ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. वाद्य वेगवेगळी आहेत. थोर कलाकार आहेत, यांची माहिती मुलांना शोधायला सांगता येईल.

१०) राज्याची राजधानी, राज्यपाल, मंत्रिमंडळ या सर्व गोष्टींचा मुलांचा अभ्यास सहज हसत खेळत होईल.

११) सर्व राज्यांची माहिती सांगून झाल्यावर प्रत्येक वर्गाने मिळून एक -एका राज्याविषयीच्या माहितीची संकलन पुस्तिका तयार करता येईल.

अशा उपक्रमांमुळं अभ्यासाच ओझं न वाटता मुलंही आनंदानं सहभागी होतील. कधी चित्र स्वरूपात, तर कधी शाळेच्या सामाईक फळ्यावर अगदी थोडक्यात ही माहिती मुलांनाच लिहायला लावल्यास सर्वच इयत्तेतील विद्यार्थ्यांचं सहज वाचन होईल. भूगोलाचा अभ्यास हा पाठांतराचा विषय न राहता आनंददायी शिक्षणाचा भाग होईल. असे कितीतरी छान उपक्रम आपण घेऊन मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवू शकतो. तुमच्याही काही नवीन कल्पना असतील तर जरूर कळवा.

टॅग्स :educationschoolstudent