दखल : यशस्वी भव-! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HSC Board Exam

बारावीच्या लेखी परीक्षेस सुरुवात झाली असून, दहावीची २ मार्चपासून आहे. ऐनवेळी काही समस्या येऊ नयेत, गोंधळ होऊ नये यासाठी महत्त्वाच्या टिप्स...

दखल : यशस्वी भव-!

- प्रा. वसंत धिवार

बारावीच्या लेखी परीक्षेस सुरुवात झाली असून, दहावीची २ मार्चपासून आहे. ऐनवेळी काही समस्या येऊ नयेत, गोंधळ होऊ नये यासाठी महत्त्वाच्या टिप्स...

परीक्षेच्या पूर्वीचे नियोजन

 • महाविद्यालयाकडून परीक्षेसाठी मिळालेल्या प्रवेशपत्राच्या दोन प्रती काढून घ्या. मूळ प्रत परीक्षेदरम्यान तुमच्याबरोबर ठेवणे आवश्यक आहे. एक प्रत घरात ठेवा. त्याची माहिती पालकांनाही द्या.

 • प्रवेशपत्राबरोबर महाविद्यालयाचे ओळखपत्र, पेन, पेन्सिल, स्केल, रबर इत्यादी साहित्य पाऊचमध्ये एकत्र ठेवा.

 • उत्तरे लिहिण्यासाठी एकाच शाईचे (निळी किंवा काळी) पेन वापरा.

 • प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राचे नाव, केंद्र क्रमांक नोंद असते. परीक्षा केंद्र तुमच्यासाठी नवीन असेल तर आदल्या दिवशी केंद्राला भेट द्या. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ व येणारा तणाव टाळता येईल.

 • परीक्षेला जाताना सकाळी हलका आहार घ्या. तुम्हाला आरामदायी वाटतील असेच कपडे परिधान करा. पाण्याची बाटली सोबत ठेवा.

 • तुमच्या घरापासून परीक्षा केंद्राचं असलेलं अंतर, प्रवासाचे साधन, रस्त्यावरील अपेक्षित गर्दी, ट्रॅफिक, प्रवासासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन निघण्याची वेळ ठरवा. परीक्षा केंद्रावर नियोजित वेळेपूर्वी किमान ४५ मिनिटे पोहोचू असे नियोजन करा.

 • परीक्षा कक्षात लेखन साहित्य सोडून बरोबर काहीही ठेवू नका. मोबाईल, डिजिटल वॉच, कॅल्क्युलेटर किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक गॅजेट जवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे.

 • पेपर आहे त्या दिवशी सकाळी महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाका. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत वाचू नका. मनावर ताण येऊ शकतो.

महत्त्वाच्या सूचना

 • मिळालेली उत्तरपत्रिका सुस्थितीत असल्याची, तिची शिलाई पूर्ण असल्याची खात्री करून घ्या. योग्य ठिकाणी तुमचा परीक्षा क्रमांक (अंकात आणि अक्षरी), केंद्र क्रमांक, विषय, तारीख, उत्तर लेखनाची भाषा (माध्यम) या नोंदी काळजीपूर्वक करा.

 • उत्तरपत्रिकेमध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. पृष्ठ क्र. ३ पासून लिहिण्यास प्रारंभ करा. केवळ डाव्या बाजूसच समास सोडा.

 • पर्यवेक्षकाकडून बारकोड स्टिकर मिळाल्यानंतर त्यावरील तुमचा बैठक क्रमांक, विषय इत्यादी खात्री करून करून बारकोड स्टिकर योग्य ठिकाणी काळजीपूर्वक चिकटवा.

 • प्रश्नपत्रिका ठरलेल्या क्रमानेच सोडविली पाहिजे, असे कोणतेही बंधन नाही. तुम्हाला योग्य वाटेल, सोपा वाटेल त्या प्रश्नाच्या उत्तरापासून सुरुवात करा.

 • उत्तरे लिहिताना समासात प्रश्न क्रमांक, उपप्रश्न क्रमांक कटाक्षाने न विसरता बिनचूक लिहा.

 • नवीन प्रश्नाची सुरुवात नवीन पानावर करा. एकाच पानावर दोन प्रश्नांची उत्तरे लिहिल्यास परीक्षकाला गुणदान करताना अडचण होते.

 • उत्तरपत्रिका नीटनेटकी, स्वच्छ ठेवा. उत्तरे लिहिताना मांडणीला महत्त्व आहे. उत्तरे मुद्देसूद लिहा. महत्त्वाच्या बाबी अधोरेखित करा. त्याचा सकारात्मक परिणाम नक्की दिसेल.

 • उत्तरपत्रिकेवर कोठेही तुमचे नाव, ओळख, पत्ता, देवाचे नाव (प्रसन्न), पास करण्याची विनंती असा मजकूर लिहू नका. असा प्रकार कायदेशीर कारवाईस पात्र आहे.

 • कच्चे लेखन उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर पेन्सिलने करा. तेथे ‘कच्चे लेखन’ असा स्पष्ट उल्लेख करा.

 • पेपरसाठी उपलब्ध वेळ आणि प्रश्नसंख्या विचारात घेऊन वेळेचे योग्य नियोजन करा.

 • एखादा विषय थोडा अवघड गेला, तरी चिंता करू नका. पुढील विषयाच्या तयारीला जोमाने लागा.

 • एखाद्या दिवशी गडबडीत प्रवेशपत्र घरी राहिले, प्रवासात हरवले तरी घाबरू नका. केंद्र संचालकांना त्वरित भेटा.

 • शेवटची १५ मिनिटे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी राखून ठेवा. घेतलेल्या पुरवण्या क्रमाने व्यवस्थित बांधा. मुख्य उत्तरपत्रिकेवर त्याची नोंद करा. काळ्या रंगाचा होलोक्राफ्ट स्टिकर दिलेल्या जागेवर व्यवस्थित चिकटवा.

 • उत्तरपत्रिकेमध्ये अधोरेखन करण्यासाठी स्केच पेन वापरू नये.

 • दिव्यांग विद्यार्थ्यांना (बोर्डाने प्रमाणित केलेले) प्रतितास २० मिनिटे जादा वेळ वाढवून दिला जातो.

अत्यंत महत्त्वाचे

 • या वर्षी होणारी वार्षिक परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारित आहे.

 • प्रश्नपत्रिकेचे वाटप परीक्षेच्या वेळेपूर्वी १० मिनिटे अगोदर करण्याची सवलत यावर्षी रद्द केली आहे.

 • परीक्षा केंद्रावरील बैठक व्यवस्था दररोज बदलते हे लक्षात ठेवा.

 • विद्यार्थिहित विचारात घेऊन या वर्षी विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेनंतर १० मिनिटे वाढवून दिली आहेत.

कुठलीच परीक्षा आपल्या आयुष्यातील शेवटची परीक्षा नसते आणि कुठलीही परीक्षा या सुंदर, स्नेहपूर्ण, आनंदी आणि लाखमोलाच्या जीवनापेक्षा मोठी असूच शकत नाही हे लक्षात ठेवा. आत्मविश्वासाने, सकारात्मक विचाराने आणि प्रसन्न मनाने परीक्षेला सामोरे जा. यश तुमचेच आहे.

(लेखक बी.एम.सी.सी., पुणे येथे उपप्राचार्य आहेत.)