संवाद : समुपदेशक काळाची गरजसंवाद : समुपदेशक काळाची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

counseling

जन्मापासूनच आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालेले असते. स्वतःचे आयुष्य प्रत्येकजण आपापल्या पिंडानुसार व्यतीत करत असतो.

संवाद : समुपदेशक काळाची गरज

- विद्यावाचस्पती विद्यानंद

जन्मापासूनच आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालेले असते. स्वतःचे आयुष्य प्रत्येकजण आपापल्या पिंडानुसार व्यतीत करत असतो. आपल्या आवडी-निवडी, विचार-आचार, उठणे-बसणे, चालणे-बोलणे, हसणे-रुसणे हे सर्व काही इतरांपेक्षा नेहमीच भिन्न असते. प्रत्येकाचा पिंड निराळा असतो. आपले स्वातंत्र्य अबाधित राहावे असेही अनेकांना वाटत असते. आपल्या वक्तृत्वामुळे, नेतृत्वामुळे आणि कर्तृत्वामुळे प्रत्येकाची ओळख होत असते. काही जणांची ओळख त्यांच्या दातृत्वामुळे, मातृत्वामुळे किंवा पितृत्वामुळे होत असते. व्यक्ती म्हणून कितीही स्वतंत्र अस्तित्व असले तरीही शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक पातळीवर कोणतीही व्यक्ती एकट्याने जीवन आनंदी करू शकतेच असे नाही. प्रत्येकाला कोणाची का होईना पण साथ, सोबत, संगत हवी असतेच. शरीराने फार काळ कोणी एकटे राहू शकत नाही, तसेच मनाने देखील एकलेपण अधिक काळ सुखावह ठरत नाही. मानसशास्त्रीय पातळीवर निर्माण होणाऱ्या समस्या मनातील नकारात्मक भाव-भावनांमुळेच असतात.

समस्यांची कारणे

आपल्या अंतर्मनात येणारे विचार, विषय, घटना, अनुभव आपण अगदी जवळच्या, आपल्या हक्काच्या व्यक्तीजवळ बोलून दाखवणे गरजेचे असते. तसे करण्यामुळे आपल्या मनांत साठून राहिलेल्या गोष्टी बाहेर पडतात, त्यांना मोकळी वाट करून दिली जाते. आपल्या संवादातून, लेखनातून, देहबोलीद्वारे आणि विविध क्रिया-प्रतिक्रियांतून आपण व्यक्त होत असतो. व्यक्त न होणाऱ्या व्यक्तीची घुसमट वाढत जाते. मोकळेपणाने मनातील विषय एखाद्याला सांगितले की मनावरचा ताण, दडपण कमी झाल्याचे जाणवते. या मोकळ्या होण्यातून आपल्या समस्यांचे निराकरण होत जाते. काहीवेळा उद्‍भवलेल्या प्रश्नांची उकल होत जाते. मनातील भय, न्यूनगंड दूर होण्याच्या दृष्टीने मोकळेपणाने आपल्या मनातील शंका व्यक्त करणे उपयुक्त ठरते. आपल्याला पडलेले प्रश्न केवळ आपल्याच भ्रम आणि संभ्रमामुळे निर्माण होत असतात.

समुपदेशन गरजेचे

मानसशास्त्र हा करिअरचा चांगला पर्याय आहे. भारतात हळूहळू प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञांची मागणी वाढत आहे. मानसशास्त्राच्या विविध शाखा प्रसिद्ध आहेत क्लिनिकल, समुपदेशन, औद्योगिक, शैक्षणिक (शालेय) आणि न्यायवैद्यक मानसशास्त्र. क्लिनिकल सायकॉलॉजी हे भारतातील मानसशास्त्राच्या प्रस्थापित क्षेत्रांपैकी एक आहे. अलीकडच्या काळात अनेकांना आपल्या मनातील विचार सांगून मोकळे होता येत नाही, अनेकांना मानसिक पातळीवर खूप मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागते.

समुपदेशकाची गरज कोणासाठी आणि कशासाठी

 • पालकत्व सकारात्मकतेने निभावण्यासाठी

 • शालेय बालकांचे

 • लहान मुलांचे (मानसिक संस्कारासाठी)

 • किशोरवयीन मुला-मुलींचे (वयात येताना)

 • विद्यार्थ्यांचे (अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी)

 • करिअर निवडीसाठी

 • व्यावसायिकांचे

 • विवाहपूर्व आणि विवाह पश्चात

 • कौटुंबिक सदस्यांचे (आपापसांतील नातेसंबंधासाठी)

 • व्यक्तिगत मानसिक संतुलनासाठी

 • व्यसनमुक्तीसाठी

 • स्वमग्न व्यक्तीसाठी

 • विस्मरण न होण्यासाठी

 • विमनस्क व्यक्तीसाठी

 • ज्येष्ठ नागरिकांसाठी

 • एकल पालकत्वासाठी

 • निराधार व्यक्तीसाठी

 • दिव्यांग/विकलांग व्यक्तीसाठी

 • बालगुन्हेगारी/गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी

 • मानसशास्त्रातील विविध शैक्षणिक पर्याय

तुम्हाला जीवन विज्ञान, सामाजिक विज्ञान, गणित आणि संप्रेषण यासारख्या विषयांमध्ये सुरुवातीसाठी चांगली पार्श्वभूमी, आवड असणे आवश्यक आहे. मानसशास्त्रज्ञ होण्यासाठी तुम्ही बारावीनंतर कोणताही मानसशास्त्र अभ्यासक्रम करू शकता. बी.ए., बी.ए. (ऑनर्स), बी.एस्सी. किंवा बी.एस्सी. (ऑनर्स). त्यानंतर, संबंधित पदव्युत्तर पदवी करून तुमचे पुढील विषयांत स्पेशलायझेशन करता येऊ शकते. त्यानंतर पीएच.डी करून तुम्ही पुढे शैक्षणिक उच्च पातळी गाठू शकता.

 • क्लिनिकल मानसशास्त्र

 • समुपदेशन मानसशास्त्र

 • शैक्षणिक मानसशास्त्र

 • विकासात्मक मानसशास्त्र

 • सामाजिक मानसशास्त्र

 • आरोग्य मानसशास्त्र

समुपदेशक हा संवादकच

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात खरी परीक्षा आपल्या धीराची, सचोटीची, मेहनतीची, हुशारीची, बौद्धिक कौशल्याची असते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण नवीन परीक्षाच देत असतो. अनेकदा ही परीक्षा देताना प्रत्येकाला परीक्षार्थी होणे पसंत नसते; परीक्षकाची भूमिका वठवली जावी असे वाटत असते. समुपदेशकाने सर्वप्रथम श्रोत्याची आणि मग संवादकाची भूमिका बजावली पाहिजे. अनेकदा संवादामध्ये बोलणाऱ्या व्यक्तीचे नीट ऐकून आणि समजूनच घेतले जात नाही. परस्परांमध्ये सकारात्मक संवाद घडत राहणे सतत गरजेचे असते. घरातील नकारात्मक वातावरणाचा परिणाम प्रत्येकाच्या मानसिकतेवर, शरीरावर, मनावर, परस्पर संबंधांवर, शिक्षणावर म्हणजेच प्रत्येक गोष्टीवर होऊ शकतो. अशावेळी मानसिक पातळीवर समुपदेशन उपयुक्त ठरते.

Web Title: Vidyavachaspati Vidyanand Writes Need For Counseling Time

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :educationjobCounseling