वेगळ्या वाटा : परदेशातील शिक्षणासाठी जीआरई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abroad Education

जीआरई म्हणजे ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन. परदेशात एम.एस. शिक्षण घ्यायचे असल्यास ‘जीआरई’ची परीक्षा द्यावी लागते.

वेगळ्या वाटा : परदेशातील शिक्षणासाठी जीआरई

- प्रा. विजय नवले

जीआरई म्हणजे ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन. परदेशात एम.एस. शिक्षण घ्यायचे असल्यास ‘जीआरई’ची परीक्षा द्यावी लागते. एम.एस. सोबतच परदेशातील एम.बी.ए. आणि डॉक्टरेटसाठीही जी.आर.ई परीक्षेचा उपयोग होतो. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युरोप येथील महत्त्वाच्या विद्यापीठांमधील प्रवेशप्रक्रियेसाठी हा स्कोअर महत्त्वाचा मानला जातो. परीक्षेचे माध्यम इंग्रजी असून सुमारे १६० देशांमध्ये १०००पेक्षा जास्त केंद्रांवर ती घेतली जाते.

पात्रता

 • या परीक्षेसाठी वयाची अट नाही.

 • पदवी झालेले किंवा पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी

 • अमुक एका विषयाची पदवीचे बंधन नाही. (बी.ए., बी.कॉम, बी.एस्सीसह अन्य पदवीचे विद्यार्थी पात्र.

 • इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आवश्यक.

शुल्क

 • जनरल टेस्टसाठी साधारणपणे २१३ अमेरिकन डॉलर्स परीक्षा नोंदणी शुल्क आहे (अंदाजे १६ हजार रुपये).

परीक्षेची रचना

 • संगणकावर आधारित परीक्षा एका वर्षात ५ वेळा देता येते. दोन परीक्षांमध्ये किमान २१ दिवसांचे अंतर आवश्यक.

 • जनरल टेस्ट सर्वांसाठी तर सबजेक्ट टेस्ट ठराविक विषयातील शिक्षणासाठी असते.

 • पेपरचा प्रकार बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह, वर्णनात्मक तसेच निबंधात्मक असतो.

 • ‘जीआरई’चा स्कोअर पुढील पाच वर्षांसाठी ग्राह्य धरला जातो.

जनरल टेस्ट

 • हा पेपर क्वांटिटेटिव्ह रिझनिंग, व्हर्बल रिझनिंग आणि ॲनालिटिकल रायटिंग या ३ मुख्य विभागात असतो.

अ) क्वांटिटेटिव्ह रिझनिंग

 • यामध्ये २ उप विभागात प्रत्येकी २० प्रश्न असतात. रेशो-प्रपोर्शन, प्रॉफिट-लॉस, सिम्पल-कंपाउंड इंटरेस्ट, स्पीड, डिस्टन्स, टाइम, प्रोबॅबिलिटी, लाइन्स, अँगल्स, पॉलिगोन, सर्कल, एरिया, व्हॉल्युम आदी विषयांवर प्रश्न असतात.

 • एकूण मिळून ७० मिनिटे कालावधी असतो.

ब) व्हर्बल रिसनिंग

 • यातही २ उप विभाग असून एकूण ६० मिनिटे कालावधी असतो. एकूण ४० प्रश्न असतात.

 • इंग्लिश व्याकरणाच्या अनुषंगाने वाक्यरचना, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषणे, काळ, म्हणी आदी बाबी असतात.

क) अनॅलिटिकल रायटिंग असेसमेंट

 • यामध्ये २ प्रश्न असतात. या सेक्शनसाठी एकूण साठ मिनिटांचा कालावधी असतो. यामध्ये एका मुद्द्यावर आणि एका अर्ग्युमेण्टवर समीक्षण/विश्लेषण करायचे असते.

सबजेक्ट टेस्ट

 • यासाठी बायोलॉजी, केमिस्ट्री, इंग्लिश, मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, सायकॉलॉजी असे विषय असून प्रत्येकासाठी दोन तास पन्नास मिनिटे कालावधी असतो.

गुण

 • चुकीच्या उत्तराला निगेटिव्ह मार्किंग नाही.

 • ॲनालिटिकल रायटिंग सेक्शनचे गुण शून्य ते सहामध्ये अर्ध्या गुणाच्या टप्प्याने वाढत असतात. क्वांटिटेटिव्ह आणि व्हर्बलचे गुण १३०-१७० च्या स्कोअर स्केलवर एका गुणाच्या इन्क्रिमेंटल टप्प्याने दिले जातात. विद्यार्थ्यांना निकालामध्ये पर्सेन्टाइल रँक मिळते. साधारणपणे २९२ पेक्षा कमी स्कोअर फारच कमी समजला जातो. ३००च्या पुढचा स्कोअर बरा, ३१८च्या पुढे चांगला आणि ३२९च्या पुढे उत्तम प्रतिभावान स्कोअर असे समजले जाते. सर्वाधिक स्कोअर ३४० तर सर्वात कमी २६० आहे. ३००च्या पुढील स्कोअर शिष्यवृत्ती मिळण्यासाठी सोईस्कर असतो. या परीक्षेची तयारी वैयक्तिक स्तरावर करता येते.

टॅग्स :exameducationAbroad