

- वीणा जपे
स्वीडनमध्ये येऊन मला पाच वर्षे झाली. या प्रवासात इथे बरेच काही शिकायला मिळाले. लहानपणी अभ्यासात प्रगतिशील, प्रगत आणि अप्रगत असे जगातल्या वेगवेगळ्या देशांचे वर्गीकरण असते, हे वाचले होते. मात्र, व्यावहारिक पातळीवर हा फरक नेमका कोणता. ते येथे आल्यावर अनुभवायला मिळाले. स्वयंशिस्त, वेळ काटेकोरपणे पाळण्याची शिस्त, आपल्या केलेल्या कामाचे रेकॉर्ड ठेवणे असे अनेक बदल हळूहळू पचवता आले, अंगी रुजले. त्याचबरोबर बदलला सामोरे जाणे अवघड नसते, हेही समजले.
कडक शिक्षण कायदे
स्वीडिश भाषेमध्ये शिक्षकांचे प्रशिक्षण घेताना येथील प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शिक्षणपद्धती जवळून अनुभवता आली. आधी एक पालक म्हणून निरीक्षणामधून, मुलीशी व तिच्या शिक्षकांशी झालेल्या संवादामधून अनेक गोष्टी नव्याने कळत होत्याच, पण एक शिक्षक म्हणून प्रशिक्षण घेताना मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. त्याचबरोबर येथील स्वयंशिस्तीचे गमक उमजले. मूल स्वतःच्या पायावर उभे राहायला लागले, की त्याला इथे शाळेत पाठवले जाते. अर्थातच, या सोईचा फायदा नोकरी करणाऱ्या पालकांना जास्त होतो. पालकांनी दीड वर्षाचे आपले मूल शाळेकडे निश्चिंतपणे सोडून जाण्यामागे कारणीभूत आहे, ती येथील शिक्षणपद्धती, आश्वासक वातावरण, शिक्षकांकडून मिळणारी सकारात्मक व मैत्रीपूर्ण वागणूक, शाळा व पालक यांच्यामधील पारदर्शक नातेसंबंध, तसेच येथील मुलांच्या हिताचे सरकारने केलेले कायदे. या कायद्यांचे ज्ञान शिक्षक प्रशिक्षणामध्ये अंतर्भूत आहेच, पण याची अंमलबजावणी न झाल्यास शिक्षकांवर देखील कडक कारवाई केली जाते.
मूल अनुकरणांमधून शिकते, त्यामुळे मुलांसमोर एक शिक्षक म्हणून उभे राहताना शिक्षक म्हणून तुमचे वर्तन, देहबोली तसेच कृती जबाबदारीपूर्ण असल्यामुळे स्वयंशिस्तीची ही बीजे कृतियुक्त शिक्षणामधून पेरली जातात. स्वीडनमध्ये पाळणाघर ही संकल्पना अगदीच तुरळक आढळते, कारण नोकरी करणारे पालक मुलांना शाळेतच अधिक काळ ठेवणे पसंत करतात. त्यामुळे मूल सकाळी ८ वाजता शाळेत गेले, तरी शाळेतून मूल घेऊन जाण्याची वेळ पालक निवडू शकतात! मग साहजिकच प्रश्न पडतो की एवढा वेळ शाळेत राहिल्यावर मूल कंटाळते का? तर मुळीच नाही! मुलांना इतक्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रमवले जाते, की हा वेळ कसा निघून जातो हे देखील कळत नाही.
शिक्षणपद्धतीची वैशिष्ट्ये
मातृभाषेतून शिक्षण - येथे इंग्रजी माध्यम निवडण्याचे स्वातंत्र्य असले, तरी बहुतेक स्वीडिश पालकांचा ओढा मातृभाषेतून शिक्षणाकडेच आहे. हा ओढाच कुठेतरी देशात लागलेल्या महत्त्वपूर्ण आविष्कारांच्या यशाचे गमक असावा.
सॉफ्ट स्टार्ट संकल्पना - ही पूर्वप्राथमिक विभागात असलेली संकल्पना असून, त्यात विद्यार्थ्यांना केवळ ठराविक वेळेसच शाळेत येणे व शाळेतून जाणे बंधनकारक नसते. या संकल्पनेमुळे मुलांना शाळेत जाण्याची ओढ लागते आणि शाळेत यायला उशीर झाला तरी कुणी त्याला रागवत नाही.
सहज व कृतियुक्त शिक्षण - मुलांना सहज व कृतियुक्त शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले जाते. सहज आणि कृतियुक्त शिक्षणामुळे मुलांचा या वाढीच्या महत्त्वाच्या २ ते ६ या वर्षांमध्ये शिक्षणामधला रस वाढण्यात मदत होते.
लेखन - लेखन हा शिक्षणामधला एक महत्त्वपूर्ण टप्पा, पण या वयात मुलांवर लेखनाची कोणत्याही प्रकारे जबरदस्ती केली जात नाही. प्रत्येक मुलाच्या व्यक्तिमत्वाचा आदर ठेऊन त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याला विकसित होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. मुलांचे व्यक्तिमत्त्व बहरण्यासाठी, त्याचा आत्मविश्वास वाढण्यासाठी योग्य वातावरण दिले जाते. जसे रंगकाम, चित्रकला, तसेच वेगवेगळ्या प्रयोगात मुलांच्या motor skills विकसित केल्या जातात व साधरणपणे शाळेच्या तयारीसाठी, म्हणजेच पाच ते साडेपाच या वयात मुलांना मुळाक्षरे लिहिता आली पाहिजेत अशी तयारी करवून घेतली जाते. त्यातही मुलांवर कुठल्याही प्रकारचा दबाव न आणता ही तयारी करवून घेतली
पंचेंद्रियांचा विकास - लेखन कौशल्यापेक्षा मुलांच्या पंचेंद्रिय ज्ञानाचा विकास करण्याकडे पूर्वप्राथमिक विभागाचा कल असतो. यात प्रमुख्याने मुलांना स्पर्श, श्रवण, गंध, बोलणे, चव यावर आधारित विविध कृतींमधून शिक्षण दिले जाते, जेणेकरून मुले अधिक अनुभव समृद्ध होतात.
निसर्गविषयी आत्मीयता - निसर्गाची काळजी घेण्यासाठी आवश्यक कृती, निसर्ग, त्यातील होणारे बदल अनुभवत त्यावर आधारित शिक्षण हा देखील कृतियुक्त शिक्षणाचा एक भागच आहे.
अशाप्रकारे अविष्कारांच्या या देशात शिक्षणप्रवासाचा हा अनुभव एकंदरच ज्ञानात आणि अनुभवात भर पाडत आहे, हे नक्की!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.