रि-स्किलिंग : माझ्या कामाची दखल कोणीच का घेत नाही? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Reskilling

रि-स्किलिंग : माझ्या कामाची दखल कोणीच का घेत नाही?

आपल्याला असे वाटत राहते, की आपण काम (Work) तर खूप करतोय, पण आपल्या कामाची दखल (Notice) कोणी घेत नाही. जे लोक काम करत नाही त्यांना मात्र चांगल्या संधी मिळतात, चांगली इन्क्रिमेंट मिळतात. मी एवढे कष्ट करतो, पण माझी कोणालाच काही माहिती नाही. माझ्या कामाची कोणीच दखल घेत नाही. येथे सर्व चमचेगिरी वरच काम चालते. चमचेगिरी केल्याशिवाय, कार्पोरेट जगात (Corporate World) यशस्वी होता येईल असे वाटत नाही... हा सर्व विचार करत असताना आपण मात्र एक गोष्ट विसरतो आणि ती म्हणजे आपण जे काम करतो ते आपण योग्य पद्धतीने, योग्य व्यक्तीकडे, योग्य वेळी प्रदर्शित करतो का? आपण ज्या काही गोष्टी करतो त्याचा संस्थेला काय फायदा झाला, याबद्दल कधीतरी बोलतो का? आपल्या बॉसला (Boss) आणि बॉसच्या बॉसला आपल्या कामाची योग्य ती माहिती (Information) आहे का? (Vinod Bidwaik Writes about Notice my work)

काम नजरेस पडणे...

संस्थेमध्ये खूप लोक असतात. काही लोक स्वतःच्या कामाचा गवगवा करतात. काही लोक गवगवा करत नाही. परंतु असे म्हणतात, की न बोलणाऱ्याचे सोनेही खपत नाही, पण बोलणाऱ्याची मातीही खपते. आजच्या जगात ही म्हण ही तेवढीच महत्त्वाची आहे. पण आपले काम संस्थेला, संस्थेतील व्यवस्थापनातील मंडळींना, बॉसला, बॉसच्या बॉसला दाखवावे कसे, असा प्रश्न आपल्याला पडतो. एक अनामिक भीतीही असते, की जर मी असा स्वतःच्या कामाचा गवगवा करत बसलो, तर माझ्यावर ‘शो-मन’गिरीचा शिक्का बसू शकतो. किंवा मला असा शो करायला आवडत नाही, असे तुम्हाला वाटत असेल. व्यवस्थापनातील मंडळींचा माझ्याबद्दल काही गैरसमज होऊ शकतो, असे आपल्याला वाटू शकते. परंतु, स्वतःच्या कामाचा गवगवा स्वतः करणे आणि ते दुसऱ्याने करणे, यामध्ये फरक आहे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की तुमचे काम संस्थेमध्ये कोणीतरी आणि त्यातही वरिष्ठांच्या नजरेत पडणे अतिशय गरजेचे आहे. तुमच्या कामाबद्दल तुम्ही स्वतः सांगण्याऐवजी इतरांनी ते सांगितल्यास त्याची विश्वासार्हता जास्त असते.

संबंध प्रस्थापित करा

हे सर्व करण्यासाठी सर्वप्रथम आपण ज्या कर्मचाऱ्यांसोबत काम करतो, ज्या ग्राहकांसोबत काम करतो त्याचसोबत व्यक्तींसोबत अर्थपूर्ण संबंध वाढवणे गरजेचे ठरते. त्याच बरोबर या सर्वांचे प्रश्न चाकोरीबाहेर थोडे पुढे जाऊन सोडवणे शक्य झाल्यास तुमचे संबंध निश्चितच वाढू शकेल. त्यांना आलेल्या अनुभवावर ते तुमच्याबद्दल इतरांना चांगला अभिप्राय देऊ शकतील. त्यामुळे संस्थेमध्ये जास्तीत जास्त लोकांसोबत संबंध प्रस्थापित करा, त्यांना मदत करा, गरज असेल तेव्हा त्यांची मदत घ्या, निश्चितच तुम्हाला गरज असताना ते तुम्हाला मदत करू शकतील. योग्य त्या व्यासपीठावर ते निश्चितच चांगले बोलतील.

कामाचा अहवाल द्या

संस्थेमध्ये आपले काम वरिष्ठांपर्यंत जाण्यासाठीचा दुसरा मार्ग म्हणजे, वेळोवेळी स्वतःचा कामाचा अहवाल तयार करून तो आपल्या बॉसला पाठवणे. अर्थात, हा अहवाल केव्हा पाठवावा, कोणत्या परिस्थितीत पाठवावा याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल. हा अहवाल संस्थेतील वरिष्ठांपर्यंत जाईल ह्याची काळजी घ्या. तुम्हाला काही सूचना असेल, एखादी कल्पना सुचली असेल किंवा संस्थेला उपयोगी पडेल असे एखादा शोधनिबंध, एखादा अहवाल तुमच्या नजरेत पडला असेल तर तो तुम्ही निश्चितच बॉसला आणि इतर वरिष्ठांना पाठवू शकता.

टॅग्स :BossVinod Bidwaik