esakal | रि-स्किलिंग : कार्यसंस्कृती आणि भाषाशैली
sakal

बोलून बातमी शोधा

Reskilling

रि-स्किलिंग : कार्यसंस्कृती आणि भाषाशैली

sakal_logo
By
विनोद बिडवाईक

प्रत्येक संस्थेची स्वतःची अशी विकसित केलेली एक विशिष्ट भाषाशैली असते. ही भाषाशैली समजून घ्यायला थोडा वेळ लागतो. संस्थेच्या कार्यसंस्कृतीप्रमाणे ही भाषाशैली विकसित होत असते. संस्थेमध्ये वेगवेगळ्या परिभाषा, संज्ञा वापरण्यात येत असतात. इतरांना न समजणारे jargon, अस्पष्ट शब्द, विशिष्ट नावे अथवा संक्षिप्त शब्द हे सर्व रोजच्या कामाचे भाग असतात.

कॉर्पोरेट जगात वापरण्यात येणाऱ्या या भाषाशैलीचे दोन प्रकार आहेत

१) वरील प्रमाणे वेगवेळ्या संज्ञा अथवा परिभाषा : उदा. ASR, (annual sales revenue). हा तसा समजणारा सोपा शब्द आहे. परंतु ह्यापेक्षा किचकट शब्द आणि संज्ञा संस्थेमध्ये वापरल्या जातात.

२) एकमेकांसोबत बोलताना वापरण्यात येणारे शब्द आणि भाषा : कार्यसंस्कृतीचा प्रभाव ह्या भाषाशैलीवर खूप प्रमाणात पडत असतो.

पहिल्या प्रकारची भाषाशैली किंवा संज्ञा समजून घ्यायला फारसा वेळ लागत नाही, परंतु दुसऱ्या प्रकारची भाषाशैली समजून घेण्यासाठी कष्ट करावे लागतात. आपल्या बॉसला काय समजते, तो कोणते शब्द नेहमी वापरतो. वरिष्ठ नेहमी कोणत्या शब्दाचा जास्त उच्चार करतात. त्यांची भाषाशैली कशी आहे हे समजून घेऊन स्वतःची भाषाशैली विकसित करायला महत्त्व द्यायला हवे. एखाद्या संस्थेत वागताना आक्रमकता हा कामाचा भाग होऊन जातो, येथे तुम्ही मिळमिळीत वागत असाल, तर तुमची कामेच होणार नाहीत. आपल्या ऑफिसात कशा प्रकारची भाषा बोलली जाते, अतिशय शुद्ध मराठी, गावठी इंग्रजी, की शुद्ध इंग्रजी, की शुद्ध हिंदी हे समजून घ्या. अर्थात हे भाषेबद्दल झाले, पण मराठी असल्यास असे कोणते शब्द आहेत, जे प्रत्येकाच्या बोलण्यात येतात. भाषेचा टोन कसा आहे ह्याचे निरीक्षण करा.

काही संस्थेमध्ये मुत्सद्दीपणे भाषा वापरली जाते. शक्यतो आपण कोठे शब्दांत अडकणार नाही, आपले बोलणे हे कमिटमेन्ट म्हणून समजण्यात येणार नाही ह्याचा आटापिटा केला जातो. काही संस्थेतील वरिष्ठ आणि कर्मचारी मनापासून बोलतात. काही जागी बोलताना ओरडून सर्व सांगितले जाते.

अर्थात, आपल्या स्वतःच्या स्वभावानुसार आपण आपली भाषाशैली वापरात असतो. परंतु अशा वातावरणात आपली स्वतःची भाषाशैली संस्थेच्या भाषाशैलीसोबत अनुरूप नसेल, तर संस्थेत एकटे पडण्याची शक्यता असते. लोकांसोबत संबंध प्रस्थापित करण्यात अडचण येऊ शकते आणि ह्याचा परिणाम आपल्या कामगिरीवर पडू शकतो.

अर्थात, एखादी भाषाशैली आपल्या तत्त्वासोबत आणि व्यक्तिमत्वाला मानवत नसेल, तर अशा संस्थेमध्ये किती वेळ काम करायचे ह्याचा निर्णय तुम्हाला कधीतरी घ्यावाच लागेल.