esakal | रि-स्किलिंग : आपण मूल्यवर्धित नोकरीमध्ये आहात का?
sakal

बोलून बातमी शोधा

Reskilling

रि-स्किलिंग : आपण मूल्यवर्धित नोकरीमध्ये आहात का?

sakal_logo
By
विनोद बिडवाईक

मी तुम्हाला साधा प्रश्न विचारला, ‘तुमची करिअरची व्याख्या काय आहे?’ तर तुमचे उत्तर काय असेल? ‘चांगली कंपनी, चांगला मोबदला आणि उत्तम फायदे असलेली चांगली कंपनी,’असेच काहीतरी बहुतेक लोकांचे उत्तर असे असेल. वरिष्ठ पदावर बढती, नोकरीत मिळणारे समाधान हेही एखाद-दुसऱ्याचे उत्तर असू शकेल. ‘करिअर डेव्हलपमेंट’ हा व्यक्तिसापेक्ष शब्द आहे. आयुष्यातील प्राधान्यक्रम आणि करिअरच्या व्याख्या व्यक्तीभिमुख असतात. मूलभूत प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो, ‘आपल्या संस्थेस आपल्या नोकरीबद्दल काय वाटते आणि आपण आपल्या कारकिर्दीबद्दल काय विचार करता?’ वेगवेगळ्या नोकरी करण्याचा आणि बढतीची शिडी चढण्याचा हा फक्त एक क्रम आहे? की काहीतरी वेगळे?

दररोज, हजारो लोक नोकरीच्या शोधात अथवा दुसरी नोकरी शोधण्याच्या उद्देशाने आपले सीव्ही, बायोडाटा जॉब पोर्टलवर अपलोड करत असतात. त्यापैकी ७५% लोक नोकरी बदलण्याचा विचार करत असतील आणि ६०% लोक सक्रियपणे बाहेर नोकरी शोधत आहेत. कारण वेगवेगळी असू शकतात, चांगला पगार आणि करिअरचा विकास. आपल्याकडे टॅलेंट मार्केटकडे वास्तववादी नजरेने बघण्याची गरज आहे. एक गोष्ट निश्चित आहे, की योग्य ते टॅलेंट महाग झाले आहे. कर्मचाऱ्यांवर होणार खर्च (पगार आणि फायदे) वाढत चालला आहे. हा खर्च कंपनीच्या संपूर्ण ऑपरेटिंग बजेटच्या २० ते ६० टक्के दरम्यान कितीही असू शकतात.

अर्थात, हा खर्च परडवणारा तेव्हाच आहे, जेव्हा संस्थेचा महसूल (रेव्हेन्यू) तरी वाढायला हवा किंवा होणार खर्च कमी. याचाच अर्थ, कर्मचाऱ्यांचा खर्च हा त्यांची उत्पादकता वाढली तरच परवडू शकेल. बऱ्याच संस्था आता हा खर्च मोठ्या जबाबदारीने बघू लागली आहेत. अनावश्यक कामे बंद करणे आणि काही कामे आउटसोर्स करणे अशासारखे प्रयोग आता होत आहेत. संस्था स्पर्धेत टिकण्यासाठी महत्त्वपूर्ण नसलेल्या पदांचा खर्च कमी करत आहेत आणि संपत्ती निर्माण करण्याच्या भूमिकेत असणाऱ्या पदावर गुंतवणूक करत आहेत. कित्येक जॉब्स मानवी चुका टाळता येतील अशा ऑटोमेशन मशीनकडे अथवा रोबोकडे जात आहेत. संस्थेतील काही पदे अतिशय महत्त्वाची आहेत आणि त्याच पदांना भविष्य आहे.

सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण संस्थेस आवश्यक असणारे योगदान कसे देता? मूल्य तयार करणारे जॉब पुढे आवश्यक होणार आहेत. कारकीर्द दमदार करण्यासाठी भविष्यातील कौशल्ये विकसित करण्याची आवश्यकता आहे. आपण वर्षांचा अनुभव आणि कार्यकाळ याची गल्लत करतो. प्रश्न आहे, की आपण खरोखरच मौल्यवान रोलमध्ये आहात का? नसाल तर स्वत:ला आपल्या कारकिर्दीचे नियंत्रण घ्यावे लागेल.

कॉर्पोरेट जगतातील काही सत्ये अशी आहेत...

  • आपण आपल्या कारकिर्दीचे मालक आहात आणि नोकरीचे नाही. नोकरी आपल्या हातात नाही, पण कारकीर्द असू शकते. त्यासाठी आवश्यक कौशल्ये आपणास शिकून घ्यावी लागतील.

  • आपला व्यावसायिक आणि आर्थिक विकास कदाचित आपल्या संपूर्ण कारकिर्दीतून येईल आणि निव्वळ नोकरीवर अवलंबून राहिल्यावर नाही.

  • आपली व्यावसायिक परिपूर्णता आणि समाधान आपण तयार केलेल्या करिअरद्वारे येईल, आपल्याला मिळालेल्या नोकरीतील कधीतरी मिळणाऱ्या बढतीने नव्हे.

नवीन आणि आधुनिक कौशल्ये आणि क्षमता शिकून आपल्या व्यक्तिमत्त्वाचे सतत मूल्यवर्धन करून करिअर विकसित केले जाऊ शकते. आपल्या आवडी, आपली कौशल्ये, आपली शक्ती आणि कमकुवतपणा आणि आपल्या प्रेरकांचा विचार करा. बहुतेक लोक आपला वेळ असणाऱ्या कमतरतेवर केंद्रित करतात. सुधारणा नेहमीच चांगली असते, परंतु आपल्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित केल्याने करिअरच्या वाटा अधिक सुकर होऊ शकतात.

शेवटी आपल्याला आपल्या नोकरीत आणि संस्थेत काय व कसे मूल्यवर्धित योगदान देता येईल ह्याचा विचार म्हणजे भविष्याशी शाश्वती.

loading image