esakal | रि-स्किलिंग : संस्थेतील बदल पचवताना...
sakal

बोलून बातमी शोधा

Reskilling

रि-स्किलिंग : संस्थेतील बदल पचवताना...

sakal_logo
By
विनोद बिडवाईक

कोरोना साथीच्या काळात, संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे मूल्य समजण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांनी काही संस्थांना त्यांचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी मनापासून योगदान दिले, संसर्गाचा धोका पत्करला, काही कर्मचारी घरून काम करत होते, तथापि बहुसंख्य कामगार लोकांची सेवा करत होते, कारखान्यांमध्ये काम करत होते, अन्न आणि किराणा मालाचे वितरण करत होते. अर्थात, आणखी काही संस्थांकडून कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले, त्यांचे पगार कापण्यात आले आणि फायदे काढून घेण्यात आले. दुर्दैवाने, भारतात आपल्याकडे बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे, लोक हे विसरून जातील आणि त्यांच्याकडे परत कामाला जातील.

या काळात व्यवसायाच्या पद्धती बदलल्या, मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशन सुरू झाले. तंत्रज्ञानाचा वापर वाढला. कामाच्या पद्धती बदलल्यामुळे, नवीन कौशल्यांची गरज पडू लागली. ह्या सर्व बदलांचे वारे आधीच वाहू लागले होते, परंतु कोरोना साथीमुळे हा बदल अतिशय वेगवान झाला. संस्थांना बदलाचे व्यवस्थापन गरजेचे वाटू लागले. बदल कसा आत्मसात करावा हा कळीचा मुद्दा झाला.

कोणत्याही बदलामध्ये आपल्याकडे दोन पैलू असतात, भावनिक आणि तर्कसंगत. तर्कसंगत पैलू सांभाळणे सोपे आहे, भावनिक पैलू मात्र कमालीचा जटिल आहे. भावनिक पैलू योग्यरीत्या सांभाळले जात नाहीत, तेव्हा एखादा प्रकल्प अपयशी होण्याचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच कोणताही बदल करताना सर्वप्रथम भावनिक पैलू समजून घ्यावा लागतो. बदलांचे व्यवस्थापन (change management) संस्थेमध्ये घडत असताना कर्मचारी म्हणून आपली भूमिका काय आहे, हे निश्चित करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

बदल घडताना संस्थेतील कर्मचारी

आशावादी : आधीच्या घडलेल्या बदलांमध्ये अडथळे आणि त्यांचा वाईट अनुभव असूनही, हे लोक भविष्याबद्दल आशावादी असतात. ते संधीची वाट पाहतात. सभोवतालचे वातावरण सकारात्मक करण्यात त्याचा मोलाचा हात असतो. तुम्हाला काही शंका असेल, तर अशा कर्मचाऱ्यांसोबत राहा. तुम्हाला फायदाच होईल.

निराशावादी : हे लोक नकारात्मक असतात आणि नेहमीच प्रत्येक गोष्टीत सर्वांत वाईट भाग बघतात. संस्थेत बदलणाऱ्या परिस्थितीमुळे वाईटच होणार, असेच ह्या लोकांना वाटत असते. ही मंडळी भूतकाळातून कधीच बाहेर येत नाहीत.

कुंपणावर बसणारे : बहुसंख्य कर्मचारी कोणत्याही सकारात्मक किंवा नकारात्मक मताशिवाय कुंपणावर बसलेले असतात. ते बदलाकडे तटस्थप्रमाणे पाहतात, निरीक्षण करतात आणि मग काय करायचे किंवा कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवतात. तुम्ही त्यांना प्रक्रियेदरम्यान काही करायला सांगितले, तर ते त्यांच्या आवडीनुसार ते करतील किंवा निरुत्साहाने करतील. बहुतेक वेळा, हे लोक त्यांना काय वाटते किंवा ते बदलाबद्दल त्यांचा दृष्टिकोन काय आहे याबद्दल संवाद साधत नाहीत. काही लोक असुरक्षितता किंवा भीतीमुळे कुंपणावर बसणे पसंत करतात.

बदलाचा भाग होणारे कर्मचारी : हे संख्या खूप कमी असते, परंतु हे नेतृत्व गुण असणारे कर्मचारी असतात. सध्याच्या काळात बदलाचा भाग होणारे, बदल घडवण्यासाठी योगदान देणारे कर्मचारी आवश्यक ठरतात.

संस्थेमध्ये बदल होत असताना

काहीतरी नवीन घडत असते. बदल काहीतरी नावीन्यपूर्ण घेऊन येत असतात आणि शिकण्याच्या असंख्य संधीही घेऊन येतात. त्यामुळे ह्या बदलांचा आपण कसा भाग होऊ, ह्याचा विचार करायला हवा.

loading image
go to top