esakal | रि-स्किलिंग : टीकाकुशल असणे गरजेचेच
sakal

बोलून बातमी शोधा

Reskilling

रि-स्किलिंग : टीकाकुशल असणे गरजेचेच

sakal_logo
By
विनोद बिडवाईक

प्रत्येकाला असे वाटते, की आपण काम करत असताना अथवा एखादा निर्णय घेत असताना, खूप विचार करून निर्णय घेतो. असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, बऱ्याचदा आपण स्वतःच्या प्रेमात पडून, आपले विचार अंतिम समजायला लागतो. काही निर्णय अथवा विचार हे पक्षपाती, विकृत, अर्धवट माहितीवर आधारित, माहिती नसलेल्या क्षेत्रातील पूर्वग्रहदूषित असू शकतात. आपल्या जीवनाची गुणवत्ता आणि आपण जे उत्पादन करतो, बनवतो, त्याची गुणवत्ता आपल्या विचारांच्या गुणवत्तेवर तंतोतंत अवलंबून असते. अव्यवस्थित विचार अथवा निर्णय हे महाग पडू शकतात. त्यासाठी विचारातील समतोलपणा पद्धतशीरपणे जोपासला पाहिजे. हे टाळण्यासाठी कधीकधी टीकाकुशल अथवा दोषदर्शी असणे गरजेचे असते.

स्वतःच्या अभ्यासासाठी बुद्धीचे प्रबोधन करण्यासाठी टीकाकुशल विचार आवश्यक आहे. हा विचार म्हणजे स्पष्ट आणि तर्कशुद्धपणे विचार करण्याची क्षमता, कल्पनांमधील तार्किक संबंध समजून घेण्याची कुवत. आपल्या पुराणात, आपल्या संतांनी, अगदी तुकाराम महाराज आणि रामदास स्वामींनी टीकाकुशल विचारसरणीबद्दल सांगितले आहे. सध्या हा खूप चर्चेचा आणि विचारांचा विषय ठरत आहे. उदाहरण द्यायचेच झाले, तर बनावट बातम्या ओळखण्याची क्षमता हा टीकाकुशल विचारसरणीचा भाग आहे. चिंतनशील आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता म्हणून या विचारांचे वर्णन केले जाऊ शकते.

थोडक्यात, येथे तुम्हाला तर्क करण्याची क्षमता वापरावी लागते. गंभीर टीकाकुशल व्यक्ती कल्पना आणि गृहीतकांचा, दर्शनी अथवा बाह्य स्वरूपांवरून स्वीकार करण्याऐवजी कठोरपणे प्रश्न करतात. कल्पना, युक्तिवाद आणि निष्कर्ष संपूर्ण विषयाचे प्रतिनिधित्व करतात की नाही, हे शोधण्यासाठी ते नेहमीच प्रयत्न करतात.

टीकाकुशल व्यक्ती नेमके काय करतात?

ते वेगवेगळ्या संबंधित विषयातील अथवा कल्पनांमधील दुवे समजून घेतात.

युक्तिवाद आणि कल्पनांचे महत्त्व आणि त्याचा संबंध निश्चित करतात, त्याचे मूल्यमापन करतात.

तर्कातील विसंगती आणि त्रुटी ओळखतात.

समस्यांना सुसंगत आणि पद्धतशीर मार्गाने पाहतात.

त्यांच्या स्वतःच्या गृहीतके, भावना आणि मूल्यांचे योग्य ते मूल्यमापन करतात व त्याचा प्रभाव निर्णयावर पडणार नाही याची काळजी घेतात.

टीकाकुशल गंभीर विचाराचे एक उदाहरण आपण बघू.

समजा एखाद्याने अलीकडेच तुम्हाला सांगितलेल्या एखाद्या गोष्टीचा विचार करा आणि स्वतःला खालील प्रश्न विचारा

कोण म्हणाले?

तुमच्या ओळखीचे कोणी? अधिकार किंवा सत्तेच्या पदावर कोणी? हे तुम्हाला कोणी सांगितले हे महत्त्वाचे आहे का?

त्यांनी काय म्हटले?

त्यांनी तथ्य किंवा मते दिली आहेत का? त्यांनी सर्व तथ्य दिले आहे का? त्यांनी काही अर्धवट माहीत तर दिली नाही ना?

ते कुठे म्हणाले?

ती सार्वजनिक जागा होती की खासगी? इतरांना प्रतिसाद देण्याची संधी होती का?

ते कधी म्हणाले?

एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या आधी, दरम्यान किंवा नंतर होता का? वेळ महत्त्वाची आहे का?

ते का म्हणाले?

त्यांनी त्यांच्या मतामागील कारण स्पष्ट केले का? ते एखाद्याला चांगले किंवा वाईट दिसण्याचा प्रयत्न करत होते का?

ते कसे म्हणाले?

ते आनंदी किंवा दुःखी, रागावलेले किंवा उदासीन होते का? त्यांनी ते लिहिले की सांगितले? काय सांगितले होते ते तुम्ही समजू शकाल का?

नेपोलियन हिलने म्हटल्याप्रमाणे, ‘‘तुम्हाला तुमचा स्वतःचा मेंदू आणि मन आहे. त्याचा वापर करा आणि तुमच्या स्वतःच्या निर्णयापर्यंत पोहोचा.’’

loading image
go to top