esakal | संधी करिअरच्या... : नर्सिंगमधील उज्ज्वल भवितव्य I Career Opportunity
sakal

बोलून बातमी शोधा

Nursing

संधी करिअरच्या... : नर्सिंगमधील उज्ज्वल भवितव्य

sakal_logo
By
विवेक वेलणकर

बारावीनंतर ‘नीट’ची परीक्षा देऊन मेडिकल शाखेत करिअर करण्याची लाखो विद्यार्थ्यांची मनीषा असते. मात्र, यामध्ये त्यांचा कल मुख्यत्वे ॲलोपॅथी/ दंतवैद्यक/आयुर्वेद/ होमिओपॅथी/ पशुवैद्यकीय डॉक्टर किंवा फार तर फिजिओथेरपी/ स्पीच थेरपी यांकडे असतो. आज संपूर्ण जगात अनुभवी, प्रशिक्षित नर्सेसचा तुटवडा आहे आणि त्यांना प्रचंड मागणी आहे, मात्र तरीही आपल्याकडे वैद्यकीय क्षेत्राचे अविभाज्य भाग असलेल्या नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याबाबत उदासीनता आहे. आज भारतात जगातील सर्वांत जास्त, म्हणजे ऐंशी कोटी लोकांचे कोरोना लसीकरण करण्याचे शिवधनुष्य देशभरातील नर्सेसनी पेलले आहे. बारावीनंतर नर्सिंगमध्ये करिअरच्या दोन संधी उपलब्ध होतात.

बी.एस्सी. नर्सिंग

बारावीनंतर चार वर्षांचा हा पदवी अभ्यासक्रम असून, अनेक शासकीय व खासगी महाविद्यालयांत तो उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश ‘नीट’ परीक्षेच्या मार्कांवर मिळतो, तर अभिमत विद्यापीठे त्यासाठी स्वतःची प्रवेश परीक्षा घेतात. यानंतर काही महाविद्यालयात एम.एस्सी., तसेच अगदी ‘पीएचडी’पर्यंत शिकण्याची सोय आहे.

जीएनएम अर्थात डिप्लोमा इन नर्सिंग

बारावीनंतर साडेतीन वर्षांचा हा डिप्लोमा कोर्स असून, अनेक शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये यांमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. याचे प्रवेश बारावीच्या मार्कांवर होतात. काही खासगी महाविद्यालये बारावीच्या मार्कांबरोबर स्वतःची प्रवेश परीक्षाही घेतात. या डिप्लोमानंतर डिग्री कोर्स करण्याची संधी उपलब्ध आहे. आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये बी.एस्सी. नर्सिंग व जीएनएम हे दोन्ही कोर्सेस चालवले जातात. यासाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध होते. हे दोन्ही कोर्सेस या महाविद्यालयात मोफत शिकवले जातात व त्यानंतर विद्यार्थ्यांना भारतीय लष्करी सेवेत सामावून घेतले जाते.

अगदी दहावी पास विद्यार्थिनींसाठी अठरा महिन्यांचा एनएम नावाचा कोर्स अनेक रुग्णालयात उपलब्ध आहे , त्यानंतर विद्यार्थिनींना खासगी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे येथे नोकरी मिळू शकते.

नर्सिंग क्षेत्रात जसे उच्च शिक्षणही घेता येते तसेच बालरोग, मनोरुग्ण, सार्वजनिक आरोग्य यांसारख्या विषयांमध्ये विशेष प्रशिक्षण घेता येते. बी.एस्सी. नर्सिंग किंवा जीएनएम या दोन्ही कोर्सेसनंतर दोन-तीन वर्षे अनुभव घेतल्यानंतर मध्यपूर्वेतील देश, आफ्रिका खंडातील देशांत नोकरीच्या उत्तम संधी आहेत, IELTS ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नर्सेसना युरोप, ऑस्ट्रेलिया या देशांमध्येही उत्तम संधी उपलब्ध आहेत. परदेशात भारतीय नर्सेसना उत्तम पगाराबरोबरच सामाजिक प्रतिष्ठाही मिळते. भारतातही नर्सेसची जरुरी दिवसेंदिवस वाढतच आहे. किंबहुना एकही नर्स बेरोजगार बसल्याचे ऐकण्यात येत नाही. ज्या क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार आणि परदेशात जाण्याच्या संधी या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, अशा काही थोड्या क्षेत्रांत नर्सिंग क्षेत्राची गणना होते. मुलींबरोबरच मुलांनाही या क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य आहे. नर्सिंग करिअर विषयी जनमानसातील गैरसमज व उदासीनता असल्यामुळे गुणवान व कष्टाळू विद्यार्थी या क्षेत्राकडे कमी प्रमाणात आकर्षित होतात, ही मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे.

loading image
go to top