esakal | संधी करिअरच्या... : बारावीनंतर पशुवैद्यकीय शाखा

बोलून बातमी शोधा

Animal Doctor

संधी करिअरच्या... : बारावीनंतर पशुवैद्यकीय शाखा

sakal_logo
By
विवेक वेलणकर

बारावीनंतर वैद्यकीय क्षेत्रातील करिअर म्हणजे सामान्यतः विद्यार्थी आणि पालकांसमोर वैद्यकशास्त्र, दंतवैद्यकशास्त्र, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, पॅरामेडिकल यासारखेच पर्याय येतात. सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात चाललेला वैद्यकीय शिक्षणाचा खर्च पाहता एका अत्यंत उत्तम आणि अल्पखर्चिक अशा पर्यायाची अर्थात पशुवैद्यकीय शाखेची माहिती घेऊयात .

पशुवैद्यकशास्त्रातील पदवीधरांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होतात. केंद्र व राज्य शासनाच्या खात्यात नोकरी, डेअरी फार्म, पोल्ट्री, औषधनिर्मिती कारखाने, कत्तलखाने इत्यादी. इतकेच नव्हे, तर बॅंका, विमा कंपन्या, संरक्षण दले यांमध्येही नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. याशिवाय परदेशातही नोकरीच्या संधी उपलब्ध होतातच, शिवाय अमेरिका, युरोप ऑस्ट्रेलिया खंडातील देशांमध्ये या विषयात उच्च शिक्षणाच्या ही संधी उपलब्ध आहेत. याशिवाय स्वतःचा दवाखाना किंवा सल्ला सेवा केंद्र सुरू करणेही शक्य आहे.

पाच वर्षांचा पदवी अभ्यासक्रम

बारावीनंतर हा पाच वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे, ज्यात साडेचार वर्षे शिक्षणक्रम आणि सहा महिने इंटर्नशिप असते. महाराष्ट्रातील पाच शासकीय महाविद्यालयात हा कोर्स उपलब्ध असून, प्रवेशासाठी बारावीनंतर ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी आणि इंग्रजी या चार विषयांत मिळून किमान ५०% गुण मिळवणारे विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असतात. महाराष्ट्रातील पुणे (शिरवळ), मुंबई, उदगीर, परभणी व नागपूर अशा पाच शासकीय महाविद्यालयातील सुमारे पावणेतीनशे जागांच्या प्रवेशासाठी एकत्रित प्रवेशप्रक्रिया नागपूरच्या पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठामार्फत राबविण्यात येते. यासाठीची सविस्तर जाहिरात ‘नीट’ परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर वर्तमानपत्रांत तसेच विद्यापीठाच्या www.mafsu.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध होते. पशुवैद्यकीय पदवीनंतर अठरा विषयांत पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची सोय मुंबई, नागपूर, परभणी व अकोला या महाविद्यालयात उपलब्ध आहे. मुंबईचे महाविद्यालय १८८६मध्ये स्थापन झाले असून, आशियातील सर्वांत जुने पशुवैद्यकीय महाविद्यालय म्हणून ते ओळखले जाते.

मुंबईच्या या महाविद्यालयात पीएचडी करण्याचीही सोय आहे. संपूर्ण देशातील ४३ शासकीय व चार खासगी महाविद्यालयातील १५% जागांचे प्रवेश व्हेटर्नरी कौन्सिल ऑफ इंडिया मार्फत केले जातात. ‘नीट’ परीक्षेतील राष्ट्रीय मानांकनाच्या आधारे या जागा भरण्यात येतात. याकरिता विद्यार्थ्यांना aipvt.vci.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. भारतात आजमितीला असलेले पशुधन लक्षात घेता, पशुवैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना भरपूर वाव आहे, यात शंकाच नाही.