संधी करिअरच्या... : बारावीनंतर ‘बी व्होक’ पदवी

गेल्या काही वर्षांपासून ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ यां सारख्या अनेक योजना सुरू झाल्या आहेत.
Make in India
Make in IndiaSakal

गेल्या काही वर्षांपासून ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ यां सारख्या अनेक योजना सुरू झाल्या आहेत. यामध्ये मुख्यतः विविध तांत्रिक कौशल्ये आत्मसात केलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. बारावी सायन्स, कॉमर्स, आर्ट्स किंवा व्होकेशनल (एमसीव्हीसी) झालेल्या विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक क्षेत्रांत कुशल व पारंगत बनवण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाने या बी. व्होकेशनल कोर्सला मान्यता दिली आहे. ही व्यावसायिक शिक्षणाची पदवी असून व्यावसायिक जगतातील मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन कोर्सेसची रचना केली आहे.

हे कोर्सेस पारंपारिक कोर्सेसपेक्षा खूप वेगळे असून, त्यामध्ये ४० टक्के थिअरी व साठ टक्के प्रॅक्टिकल ट्रेनिंग देण्यात येते. या तीन वर्षांच्या कोर्सेसचे सगळ्यांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही वर्षी विद्यार्थ्यांना बाहेर पडावे वाटले, तरी किमान डिप्लोमा प्रमाणपत्र नक्की मिळते. प्रथम वर्ष पूर्ण केल्यानंतर ‘डिप्लोमा’, दुसरे वर्ष पूर्ण केल्यानंतर ‘ॲडव्हान्स्ड डिप्लोमा’, तर तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर ‘बी. व्होक’ पदवी विद्यार्थ्यांना मिळते. हे कोर्सेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठासह अनेक विद्यापीठांमध्ये व अनेक संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. या कोर्सेसमध्ये विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये प्रॅक्टिकल अनुभव घेताना स्टायपेंड मिळण्याची शक्यता भरपूर आहे. पदवी शिक्षण घेताना भरपूर कार्यानुभव विद्यार्थ्यांना मिळत असल्याने बी व्होक. पदवीनंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मुबलक संधी तर मिळतातच, शिवाय स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधीही मिळते. याशिवाय विद्यार्थ्यांना बी व्होक. पदवीनंतर इतर कोणत्याही पदवीधरांना उपलब्ध असणारे ‘एमबीए’पासून स्पर्धा परीक्षांपर्यंत सर्व पर्याय निश्चितपणे उपलब्ध आहेत. बी. व्होक कोर्समध्ये अनेक शाखा उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, रिटेल मॅनेजमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, रिन्युएबल एनर्जी, ग्राफिक डिझायनिंग व मल्टिमीडिया, रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग , सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, मेकॅट्रॉनिक्स वगैरे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात विद्यापीठाने स्वतःच हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. यात तीन शाखा आहेत. रिटेल मॅनेजमेंट, मॅन्युफॅक्चरिंग व रिन्युएबल एनर्जी या शाखांमध्ये बी. व्होक कोर्स उपलब्ध आहे. रिटेल मॅनेजमेंट कोर्समध्ये विद्यार्थ्यांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून विद्यापीठाने मारुती सुझुकी या कंपनीशी सामंजस्य करार केला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्टायपेंडसह ऑन जॉब ट्रेनिंग मिळणार आहे. कंपन्यांमधील तज्ज्ञ अधिकारी प्रशिक्षण देणार असल्याने विद्यार्थ्यांना उत्तम कौशल्य प्राप्त होऊ शकेल.

पुणे विद्यापीठातील या तीनही कोर्सेससाठी http://unipune.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना १० ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील, त्यानंतर विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रवेश परीक्षा होऊन कोर्सला प्रवेश दिला जाईल. इतर अनेक संस्थांमध्येही बी. व्होकचे दर्जेदार कोर्सेस उपलब्ध आहेत. कष्ट करायची तयारी असणाऱ्या आणि प्रॅक्टिकल शिक्षणात रुची असणाऱ्या कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बी. व्होक ही रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक वाटा निर्माण करणारी उत्तम संधी आहे, हे निर्विवाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com