esakal | संधी करिअरच्या... : बारावीनंतर विनामूल्य अभियांत्रिकी शिक्षण!
sakal

बोलून बातमी शोधा

College of Military Engineering Pune

संधी करिअरच्या... : बारावीनंतर विनामूल्य अभियांत्रिकी शिक्षण!

sakal_logo
By
विवेक वेलणकर

बारावीनंतर अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा आहे, मात्र यासाठी भरमसाट फी देऊनही हव्या त्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळेल का नाही याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सातत्याने भेडसावत असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर मोफत अभियांत्रिकी शिक्षण, शिवाय निवास, भोजन, पुस्तकेही मोफत व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मानाची आणि एक लाख रुपये महिना पगाराची नोकरी निश्चित देऊ शकणारी भारतात दोन महाविद्यालये आहेत, यावर कदाचित विश्वास बसणार नाही! भारतीय नौदल आणि भूदल यांमध्ये लागणारे अभियंते घडवण्यासाठी सैन्यदलांमार्फत ही महाविद्यालये चालवली जातात.

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे

पुण्यात दापोडी येथे असलेल्या या महाविद्यालयात हा पाच वर्षांचा अभ्यासक्रम चालवला जातो. यातील पहिल्या वर्षी इंडियन मिलिटरी ॲकॅडमी, डेहराडून येथे मूलभूत लष्करी प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतरची चार वर्षे पुणे, महू किंवा सिकंदराबाद येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी प्रशिक्षण दिले जाते. यानंतर विद्यार्थ्यांना भूदलामध्ये लेफ्टनंट म्हणून सामावून घेतले जाते. या महाविद्यालयात प्रवेशासाठी बारावीच्या परीक्षेनंतर जाहिरात प्रसिद्ध होईल. www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स या विषयांत मिळून किमान ७०% गुण असतील, ते हा अर्ज भरू शकतील. आलेल्या सर्व अर्जांची छाननी करून JEE (Mains) च्या मार्कांच्या आधारावर राष्ट्रीय पातळीवर गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि निवडलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.

आयएनएस झामरीन, केरळ

केरळमधील या महाविद्यालयात चार वर्षांचा अभियांत्रिकी कोर्स चालवला जातो. यामध्ये मरिन, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, या विषयात अभियांत्रिकी अभ्यासक्रम झामरीन येथे तर नेव्हल आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम कोची येथे घेतला जातो. अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देऊन भारतीय नौदलात सब लेफ्टनंट म्हणून सामावून घेतले जाते. या महाविद्यालयात प्रवेशासाठी बारावीच्या परीक्षेनंतर जाहिरात प्रसिद्ध होईल.

www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स या विषयात मिळून किमान ७०% गुण असतील ते हा अर्ज भरू शकतील. आलेल्या सर्व अर्जांची छाननी करून JEE (Mains) च्या मार्कांच्या आधारावर राष्ट्रीय पातळीवर गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि निवडलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.

वरील दोन्ही महाविद्यालयातील प्रवेशासाठी मुलाखत, ज्याला SSB interview म्हणतात, हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ही मुलाखत प्रदीर्घ, म्हणजे पाच दिवसांची असते, त्यात दोन टप्पे असतात. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला जातो. मुलाखतीतून तावून सुलाखून निघालेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते व त्यानंतर त्यांना या महाविद्यालयांत प्रवेश दिला जातो.