esakal | संधी करिअरच्या... : बारावीनंतर डेअरी टेक्नॉलॉजी I Dairy Technology
sakal

बोलून बातमी शोधा

Dairy Technology

संधी करिअरच्या... : बारावीनंतर डेअरी टेक्नॉलॉजी

sakal_logo
By
विवेक वेलणकर

भारतात धवल क्रांती होऊन अनेक वर्षे झाली आहेत. भारत हा जगातील सर्वांत जास्त दुग्धोत्पादन करणारा व दूध पिणारा देश म्हणून ओळखला जातो. आज भारतातील वार्षिक दुग्धोत्पादन १८ कोटी टन आहे, तर भारतात गाई म्हशींची संख्या पंचवीस कोटींच्या वर आहे.

दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मिती व विक्रीमध्ये भारतातील ‘अमूल’पासून ‘आरे’पर्यंत असंख्य उद्योग आहेत आणि सातत्याने वाढत आहेत. कोरोना महामारीच्या काळात व नंतरही ज्या इंडस्ट्रीमध्ये सुगीचे दिवस आहेत, ती म्हणजे डेअरी इंडस्ट्री. दुग्ध प्रक्रिया, पॅकेजिंग, वाहतूक व वितरण यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक असते व त्यासाठी बारावीनंतर डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये डिग्री व डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत. देशभरात अनेक महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये याचे कोर्सेस उपलब्ध आहेत. नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, कर्नाळ ही यातील अग्रगण्य संस्था.

महाराष्ट्रातही काही महाविद्यालयात डेअरी टेक्नॉलॉजी पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. यामध्ये दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, वरुड, ता. पुसद. जि. यवतमाळ आणि दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय उदगीर जि. लातूर ही दोन सरकारी महाविद्यालये आहेत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या एमएचटी सीईटीच्या (पीसीएम) गुणांच्या आधारे प्रवेश होतात. सीईटीचा निकाल घोषित झाल्यानंतर महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्याकडून डेअरी टेक्नॉलॉजी पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. या कोर्समध्ये डेअरी टेक्नॉलॉजी, डेअरी इंजिनिअरिंग, डेअरी मायक्रो बायॉलॉजी , डेअरी केमिस्ट्री व डेअरी बिझनेस मॅनेजमेंट या विषयांचा अभ्यास करावा लागतो. अनेक संस्थांमध्ये डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर्स डिग्री, तसेच पीएचडीची ही सोय आहे.

आरेमध्ये डेअरी टेक्नॉलॉजी डिप्लोमा

महाराष्ट्र शासनाच्या दुग्ध व्यवसाय विभागाच्या अंतर्गत मुंबई येथील आरे दूध कॉलनीमध्ये डेअरी सायन्स इन्स्टिट्यूट कार्यरत आहे. १९६०मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेत बारावी सायन्स झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांचा डिप्लोमा इन डेअरी टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम चालवला जातो. या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला जातो. त्यासाठी संस्थेमध्ये विद्यार्थी डेअरीची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी दहा हजार लिटर दुधाचे उत्पादन व प्रक्रियेची सुविधा आहे. याशिवाय पनीर, बटर, चीज, तूप, क्रीम अशा दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन केले जाते. दूध प्रक्रिया व पॅकेजिंगचे प्रशिक्षण देणारे विभाग कार्यरत आहेत.

डेअरी टेक्नॉलॉजी मध्ये पदवी/पदविका शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना डेअरी इंडस्ट्री, शासकीय विभाग, खासगी संस्था, सल्ला सेवा, संशोधन, स्वयंरोजगार अशा विविध क्षेत्रात करिअर संधी मिळू शकतात.

loading image
go to top