संधी करिअरच्या... : अभियांत्रिकीसाठी महाविद्यालय निवडताना...

अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या जेईई (मेन्स) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे; महाराष्ट्राची अभियांत्रिकी प्रवेशासाठी असणारी एमएच-सीईटी परीक्षेचा निकालही आता लागेल.
Engineering College
Engineering CollegeSakal

अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या जेईई (मेन्स) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे; महाराष्ट्राची अभियांत्रिकी प्रवेशासाठी असणारी एमएच-सीईटी परीक्षेचा निकालही आता लागेल. अभियांत्रिकीला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढचा आत्ता सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे, की कोरोनोत्तर काळात अभियांत्रिकीचा कोणता कोर्स आणि कोणते कॉलेज निवडावे, जेणेकरून भविष्यात करिअरच्या उत्तम संधी मिळतील. या संदर्भातील निर्णय घेताना उपयोगी पडतील, अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा परामर्श घेऊ या...

  • अभियांत्रिकी शाखा निवडताना विद्यार्थी ठराविक मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, कॉम्प्युटर आणि फार फार तर केमिकल एवढ्याच ठराविक शाखांचा विचार करतात. मुळात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या राज्यात ७० शाखा आहेत; त्यातील अनेक शाखा एक किंवा दोन महाविद्यालयात आहेत. या शाखांमध्येही करिअरच्या आणि नोकरीच्या भरपूर संधी आहेत आणि मुख्य म्हणजे एक किंवा दोनच कॉलेजेसमध्ये हे कोर्सेस असल्याने स्पर्धा कमी आहे. गरज आहे ती फक्त चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याची. पॉवर इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग अशा काही शाखांचा यात समावेश आहे.

  • कोणत्या शाखेला स्कोप जास्त आहे किंवा चार वर्षानंतर कोणत्या शाखेला स्कोप जास्त असणार आहे, असे प्रश्न विद्यार्थी आणि पालक कायम विचारतात. खरेतर अभियांत्रिकीच्या सर्वच शाखांना उत्तम स्कोप आहे, मात्र तो अशाच विद्यार्थ्यांसाठी आहे जे अभियांत्रिकीच्या पहिल्या सेमिस्टरपासून सातत्याने प्रथम वर्गात उत्तीर्ण होतात. एकदाही एकही विषयात नापास होत नाहीत. कारण कंपन्या कँपस इंटरव्ह्यूसाठी येतात त्यावेळी विद्यार्थ्यांना मुलाखतीला बोलावताना सर्व सेमिस्टरमध्ये फर्स्ट क्लास हे सूत्र लावतात. अभियांत्रिकीच्या चारही वर्षांत विद्यार्थ्यांनी याची जाणीव ठेवली, तर स्कोपचा विचार करण्याची गरजच भासणार नाही.

  • कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आयटी इंजिनिअरिंग या दोन शाखांच्या अभ्यासक्रमात फारसा फरक नसल्याने त्यातली कुठलीही शाखा निवडलेली चालू शकेल.

  • ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीनंतर एमबीए किंवा यूपीएससी किंवा एमपीएससीकडे वळायचे आहे, त्यांना कोणतीही शाखा किंवा कोणतेही महाविद्यालय निवडले तरी फारसा फरक पडत नाही, कारण त्या ठिकाणी मुख्यत्वे पदवी मिळवलेली असणे यालाच महत्त्व असते.

  • ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीनंतर नोकरी करायची आहे, त्यांनी अशा कॉलेजची निवड काळजीपूर्वक करायची आहे. ज्या कॉलेजमध्ये गेल्या काही वर्षांपासून कँपस रिक्रुटमेंट चांगली होत आहे, तेथे पदवीनंतर नोकरीसाठी प्रयत्न करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘सँडविच’ कोर्स निवडणे फायद्याचे ठरू शकते. कारण या कोर्समध्ये पदवीबरोबरच एक वर्ष प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो, जो नोकरी मिळताना उपयोगी पडतो. ज्या विद्यार्थ्यांना एमबीए करायचे आहे, त्यांनाही सँडविच कोर्स लाभदायक ठरू शकतो.

  • ज्या विद्यार्थ्यांना पुढे तांत्रिक विषयातच भारतात वा परदेशात उच्चशिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठी आवडत्या अभियांत्रिकी शाखेची निवड करणे जास्त महत्त्वाचे आहे. त्यासाठी कॉलेज निवडीमध्ये थोडी तडजोड करावी लागली तरी चालेल.

  • कॉलेज निवडताना त्या त्या कॉलेजच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली माहिती वाचावी, ज्यामध्ये कॉलेजमधील इन्फ्रास्ट्रक्चर, प्राध्यापक वर्ग, कँपस रिक्रुटमेंट याची माहिती असते. शक्य असेल त्या महाविद्यालयात समक्ष जाऊन प्राध्यापकांशी बोलले किंवा त्या कॉलेजमधे आत्ता शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करणे या गोष्टी फायद्याच्या ठरतात.

  • अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत प्रेफरन्स फॉर्म भरताना उगीचच मला काय मिळेल, गेल्या वर्षीचा कट ऑफ काय होता याचा फारसा विचार करत न बसता आपल्याला हव्या त्या कॉलेजचा व शाखेचा पर्याय आपल्या आवडीनुसार भरावा. फक्त भरताना पसंतीक्रम उलटसुलट भरू नये, तर जे जास्त आवडणारे कॉलेज/शाखा आहे ती प्रथम, त्याखालोखाल आवडणारी नंतर, या क्रमाने भरावेत. आपल्या मेरीट नंबरप्रमाणे कॉम्प्युटर जेव्हा आपला फॉर्म वाचेल, त्या वेळेला तो आपल्या पसंतीप्रमाणे पर्याय वाचत जाईल आणि जेथे आपली पसंती व जागांची उपलब्धता यांची सांगड बसेल ते कॉलेज आणि शाखा कॉम्पुटर ॲलॉट करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com