संधी करिअरच्या... : दहावीनंतर एनडीए तयारीसाठी एसपीआय संस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NDA
संधी करिअरच्या... : दहावीनंतर एनडीए तयारीसाठी एसपीआय संस्था

संधी करिअरच्या... : दहावीनंतर एनडीए तयारीसाठी एसपीआय संस्था

संरक्षण दलांसाठी सक्षम प्रशिक्षित अधिकारी घडवणारी एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची स्थापना पुण्यात झाली. मात्र, ही संस्था महाराष्ट्रात असूनही महाराष्ट्रातील मुले या संस्थेत फारच कमी का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने लेफ्ट. जनरल थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशींप्रमाणे एनडीए प्रवेशासाठी तयारी करून घेणारी एसपीआय नावाची संस्था १९७७मध्ये राज्य सरकारने औरंगाबाद येथे स्थापन केली. राज्याचे रहिवासी असलेल्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी बारावी या दोन वर्षांसाठी या संस्थेत प्रवेश देऊन एनडीए प्रवेशासाठी आवश्यक तयारी त्यांच्याकडून करून घेतली जाते. ही निवासी संस्था असून अकरावी बारावी शास्त्र शाखेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

या दोन वर्षांत विद्यार्थ्यांची एनडीए प्रवेश परीक्षेसाठी तयारी करून घेतली जातेच, पण त्याशिवाय एनडीए प्रवेश परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना द्याव्या लागणाऱ्या एसएसबी मुलाखतीसाठी ही विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक तयारी करून घेतली जाते. गेल्या चाळीस वर्षांत या संस्थेतून तयारी केलेले पाचशेहून अधिक विद्यार्थी बारावीनंतर एनडीए आणि आर्मी व नेव्ही अभियांत्रिकी महाविद्यालयात निवडले गेले आहेत. संरक्षण दलांमधील अतिवरीष्ठ निवृत्त अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली २४ लोकांची टीम या संस्थेत कार्यरत आहे. सुसज्ज ग्रंथालय, जिम्नॅशिअम, मैदानी खेळांसाठी मैदाने अशा अनेक सोयींनी युक्त कॅंपसमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.

राज्य सरकारतर्फे परीक्षा

महाराष्ट्र राज्य सरकारच्या या संस्थेत दहावीनंतर प्रवेशासाठी एक प्रवेश परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा फक्त इंग्रजी भाषेत घेतली जात असून, त्यात ७५ गुणांचे दोन पेपर असतात जे सोडविण्यासाठी तीन तासांचा वेळ मिळतो. आठवी ते दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न या परीक्षेत विचारले जातात. एक पेपर गणिताचा असतो तर दुसरा पेपर जनरल ॲबिलिटीचा असतो. जनरल ॲबिलिटीच्या पेपरमध्ये इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता कसोटी या विषयांवर प्रश्न असतात. परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची असून, चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जातात. परीक्षेचा निकाल संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जातो. लेखी परीक्षेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुणे/ औरंगाबाद येथे मुलाखतीला सामोरे जावे लागते, त्यातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी होऊन अंतिम निवड केली जाते. दहावीच्याच नव्हे, तर सातवी, आठवी व नववी या सर्व वर्षांत विद्यार्थ्यांना किमान ६०% गुण मिळणे या संस्थेतील प्रवेशासाठी अनिवार्य आहे . या संस्थेतील प्रवेशपरीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. त्यासाठी तसेच संस्थेच्या संपूर्ण माहिती साठी संस्थेच्या www spiaurangabad.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

ज्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर एनडीए किंवा आर्मी/नेव्हीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी त्या दृष्टीने दहावीनंतरच तयारी सुरू करणे फायद्याचे ठरते. यासाठीची उत्तम तयारी करून घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या एसपीआय या संस्थेत दहावीनंतर प्रवेशासाठी प्रयत्न करणे विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे.

टॅग्स :Vivek VelankarNDA