मातृभूमीचे महन्मंगल स्तोत्र

आपल्या सर्वांना आता वेध लागले आहेत ते नवरात्रोत्सवाचे. या नऊ दिवसांच्या काळात आपण चराचरांत वसलेल्या मातृशक्तीची आराधना करतो.
Worships mother power navratri cultural significance
Worships mother power navratri cultural significancesakal
Updated on

आपल्या सर्वांना आता वेध लागले आहेत ते नवरात्रोत्सवाचे. या नऊ दिवसांच्या काळात आपण चराचरांत वसलेल्या मातृशक्तीची आराधना करतो. मातृशक्तीच्या या विविध रूपांपैकी भारतीयांना प्रिय असणारे एक विशेष रूप म्हणजे भारतभूमी. याच भारतमातेच्या साकार रूपाचे वर्णन योगी अरविंद यांनी भवानी भारती या त्यांच्या काव्यातून केले आहे. या अप्रतिम आणि भावपूर्ण काव्याचा मराठी अनुवाद अरुण मराठे यांनी केला आहे.

क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळखल्या गेलेल्या वंगभूमीत १८७२ मध्ये जन्मलेले आधुनिक ऋषी, महान दार्शनिक आणि प्रखर देशभक्त व्यक्तिमत्त्व म्हणजे बाबू अरविंद घोष अर्थात योगी अरविंद. पूर्वायुष्यात प्रखर क्रांतिकार्य करणाऱ्या योगी अरविंदांनी भारतमातेचे साकार वर्णन करणारे ९९ श्लोक लिहिले आहेत. तेच भवानी भारती या पुस्तकाच्या स्वरूपात अरविंद आश्रमाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले.

मूळ संस्कृतमध्ये असणारे हे श्लोक भारत मातेचे यथार्थ वर्णन करतात. मात्र, हे श्लोक केवळ भारत मातेची स्तुती करणे नाहीत. भारत पारतंत्र्यात असताना योगी अरविंद यांना स्फुरलेल्या या श्लोकात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांतीचे आवाहन करणारी बीजेदेखील पेरली गेली आहेत. आज देश स्वतंत्र झाला असला तरी मातृभूमीचे ऋण न फेडता केवळ स्वार्थ साधणाऱ्या सर्वांसाठीच यातील मातृभूमीच्या सेवेचे आवाहन करणारे श्लोक डोळे उघडणारे आहेत.

या श्लोक रचनांमध्ये योगी अरविंदांनी भारतमातेच्या सगुण रूपाचे जे वर्णन केले आहे ते प्रत्येक भारतीयाने तोंडपाठ करावे इतके सुंदर आहे. भारतीयांना गुलामीतून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करणारी देवी, असुररूपी इंग्रजांचा वध करणारी भारतमाता आणि आपल्या लेकरांना म्हणजेच भारतीयांना धनधान्य समृद्धी देणारी भारतमाता अशी विविध रूपे अरविंदांनी शब्दबद्ध केली आहेत. या काव्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे लवकरच भारत स्वतंत्र होईल, असा विश्वासही अरविंदांनी पारतंत्र्याच्या काळात यात व्यक्त केला आहे.

पारतंत्र्याच्या काळात लिहिल्या गेलेल्या या काव्यामध्ये तत्कालीन देशस्थितीचे आणि भारतीय यांच्या गुलामीचे वर्णन वाचताना मन खिन्न होते. याच खिन्नतेतून अरविंदांनी स्वतः गृहत्याग करून राष्ट्रकार्यासाठी आपले जीवन समर्पित केले होते.

इतरांनीदेखील यथाशक्य मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही अरविंदांनी या काव्यातून केले होते. आज भारत स्वतंत्र झाला असून, अरविंद यांनी स्वतंत्र आणि सुजलाम सुफलाम भारताचे जे स्वप्न पाहिले होते त्या दिशेने आपण नक्कीच वाटचाल करत आहोत. मात्र, जे स्वातंत्र्याचे सुख आज आपण उपभोगत आहोत त्यासाठी आपल्या पूर्वसुरींनी सर्वस्वाचा त्याग करून स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली होती, याची जाणीव हे काव्य आपल्याला करून देते. भारताचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी प्रेरणा देते!

(संकलन : रोहित वाळिंबे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.