दिसामाजी काही तरी लिहावे

जोहारी खिडक्यांमध्ये आपण असे पहिले की, चार खिडक्यांपैकी तीन खिडक्यांमधली आपल्याला आपल्याबद्दलची माहिती काही ना काही प्रकारे, काही ना काही प्रमाणात ठाऊक असते किंवा इतरांकडून ती मिळवता येते.
Write something daily
Write something dailysakal

जोहारी खिडक्यांमध्ये आपण असे पहिले की, चार खिडक्यांपैकी तीन खिडक्यांमधली आपल्याला आपल्याबद्दलची माहिती काही ना काही प्रकारे, काही ना काही प्रमाणात ठाऊक असते किंवा इतरांकडून ती मिळवता येते. मात्र, चौथ्या खिडकीतील (I don’t know, you don’t know) माहिती सध्या तरी कोणाचकडे उपलब्ध नाही. ना आपल्या स्वतःला, ना इतरांना! ती माहिती मिळणे-मिळवणे हे कठीण काम असते.

त्यासाठी स्वतःच प्रयत्न करायला हवेत. मात्र, स्वतःच स्वतःचे निरीक्षण करणे ही तितकी सोपी गोष्ट नसते. प्रत्यक्ष काम करणारे, वागणारे, जगणारे आपणच आणि निरीक्षण करणारेही आपणच असे असल्याने निरीक्षणांची वस्तुनिष्ठ नोंद घेणे अवघड असते. ‘निरीक्ष्य’ आणि ‘निरीक्षक’ एकच असल्याने निरीक्षण करणे अवघड असते. मग त्यासाठी आत्मपरीक्षणाची चांगली साधने उपयोगात आणावी लागतात. दैनंदिनी लेखन करणे हा त्यासाठी चांगला उपाय आहे.

पुनरावलोकन

दैनंदिनी लेखन करताना दिनक्रमाबरोबरच महत्त्वाच्या घटना, प्रसंग त्यांना सामोरे जाताना आपण काय शिकलो? कोणत्या गोष्टी योग्य केल्या? काय चुका केल्या? इत्यादी गोष्टींची नोंद आपण करतो. याच नोंदी काही काळानंतर आपण पुन्हा वाचतो, तेव्हा आपल्याला आपल्याबद्दलच्या अनेक नवीन गोष्टी कळतात. उदाहरणार्थ, पुष्कळ वेळेला आपल्याला असे वाटत असते की, आपण नियमित व्यायाम करतो. ‘राहून जातो हे खरं आहे, पण क्वचितच !’, ‘माणूस आहोत, यंत्र थोडेच आहोत.

होणारच असे कधी तरी’ अशी आपणच आपली समजूत घालत असतो. पण हे खरे नसते! ते नसते ते कसे लक्षात येते? जेव्हा आपण स्वतःच केलेल्या नोंदी तपासतो तेव्हा! नोंदींचे पुनरावलोकन करतो तेव्हा! एखाद्याच वेळी चुकतो असे वाटणे हे आठवड्यातून एक-दोन वेळा म्हणजे महिन्यातून सात आठ वेळा म्हणजे जवळ जवळ पंचवीस टक्के वेळा! आपले मन हे स्वीकारायला सहजासहजी तयार नसते पण ते दैनंदिनीतल्या नोंदीवरून उलगडते.

आत्मपरीक्षण

कधी-कधी इच्छा असूनही आपण आपल्या मनातलं व्यक्त करू शकत नाही आणि अनेक वेळा असंही घडतं की, समोरच्या माणसाची भीती किंवा लाज वाटून आपण आपलं मत व्यक्त करू शकत नाही. अशा परिस्थितीत जर दैनंदिनी लिहिण्याची सवय लावून घेतली, तर आपण आपल्या भावना किंवा गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकू, हे तर खरेच, पण नियमित नोंदणीनंतरच्या दैनंदिनी वाचनाने कोणत्या परिस्थितीत आपण कसे भावूक होतो? हे लक्षात येते.

भावनांच्या भरात आपल्याला आपले तेच खरे वाटत असते. रागाच्या भरात सगळ्यांचा बदला घ्यायचा असतो. म्हणून तर त्यालाच आपण सत्य नाही, तर भावणारे म्हणजे भावना म्हणतो. एकदा का आपण कोणत्या परिस्थितीत कसे वागतो, हे लक्षात येऊ लागले, की मग आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रणही मिळवता येऊ लागते. म्हणूनच दैनंदिनी लेखन करणे आत्मपरीक्षणासाठी उपयुक्त ठरते.

तिसरा पंच

क्रिकेटमधे खेळाडू खेळत असताना स्वतःच आऊट आहे किंवा नाही हा निर्णय देऊ शकत नाहीत, कारण ते स्वतः खेळण्यात मग्न असतात किंवा कुठल्या तरी एका संघाचे सदस्य असतात. त्यांचा निर्णय चुकीचा किंवा एकतर्फी असू शकतो. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी या दोन्ही संघातील सदस्यांपेक्षा वेगळे असे दोन पंच नियुक्त केलेले असतात. ते योग्य निर्णय देतील अशी अपेक्षा असते.

असे असूनही कधी कधी निर्णयासाठी मैदानावरचे दोन पंच क्रीडांगणाबाहेरच्या तिसऱ्या पंचाची मदत घेतात, कारण तो मैदानाबाहेरून, अधिक उंचावरून व तंत्राचा उपयोग करून अचूक निरीक्षण करू शकत असल्याने अधिक बरोबर निर्णय देऊ शकतो. म्हणूनच तिसऱ्याही पंचाची नियुक्ती केलेली असते. आपल्यासाठी हा तिसरा पंच म्हणजे दैनंदिनी होय.

यावरूनच आयुष्यात खूप काही मोठे करून दाखवलेल्या अनेक मंडळींना दैनंदिनी लेखनाची जी सवय होती, ती का महत्त्वाची हे लक्षात येते. समर्थ रामदासांनीसुद्धा ‘दिसामाजी काही तरी ते लिहावे’ असे म्हटले आहे. याने आपल्याला आपल्या जगण्याचे आकलन होत जाते. आपण जसे आहोत तसे दिसू लागतो आणि जे आपल्याबद्दल माहीत नाही तेही उलगडायला लागते!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com