नोकरी, बाजारपेठ : स्पोर्ट्स... करिअरसाठी मोकळे आकाश! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cricket Sports

महिला क्रिकेट आजही तुलनेने दुर्लक्षितच. या खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय. १९ वयोगटाखालील मुलींनी टी २० क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. फुटबॉलमध्येही मुलींनी चमकदार कामगिरी केली.

नोकरी, बाजारपेठ : स्पोर्ट्स... करिअरसाठी मोकळे आकाश!

- यश लाहोटी

महिला क्रिकेट आजही तुलनेने दुर्लक्षितच. या खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय. १९ वयोगटाखालील मुलींनी टी २० क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. फुटबॉलमध्येही मुलींनी चमकदार कामगिरी केली. भारतीय मुली आता विविध क्रीडा प्रकारात भाग घेऊन देशाचे नाव उंचावत आहेत. मेहनती मुलींसाठी क्रीडा क्षेत्र करिअर म्हणून अनेक संधी घेऊन आले आहे. प्रत्यक्ष खेळाडू म्हणूनच नाही तर स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन, मार्केटिंग, फायनान्स, ऑपरेशन्स अशी अनेक क्षेत्र आता सर्वांसाठी खुली आहेत. गरज आहे ती ‘पॅशन’ आणि वेगळे काहीतरी करण्याची.

नवोदित खेळाडूंना आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेणाऱ्या मुलींना सोशल मीडिया सारख्या नवमाध्यमातून व्यासपीठ देण्याचे काम ‘वुमन्स क्रीक झोन’ने सुरू केले. ‘वुमन्स क्रीक झोन’ २०१८ पासून माध्यमक्षेत्रातील यशस्वी स्टार्ट अप म्हणून आकार घेऊ लागले आणि यशस्वी स्पोर्ट्स मीडिया कंपनी म्हणून कार्यरत आहे.

इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी एका खासगी कंपनीत नोकरी करत होतो. मला क्रिकेटची विशेषत- महिला क्रिकेटची पहिल्यापासून आवड होती. महिला क्रिकेटमधील विविध देशांचे खेळाडू, त्यांची कामगिरी, भारतीय खेळाडू, त्यांची पार्श्वभूमी याविषयी उत्सुकता होती. त्यांची विविध माहिती मिळवण्याचा माझा छंद होता. ती माहिती कुठे उपलब्ध होत नव्हती. २०१७मध्ये महिला क्रिकेट वर्ल्ड कप सुरू झाला, त्याचे फारसे कुठे कव्हरेज होत नव्हते. त्यावेळी माझ्या मनात एक कल्पना आली ही माहिती मिळविण्यासाठी मला एवढी शोधाशोध करावी लागतेय, म्हणजे ही अनेकांची अडचण असेल.

त्यावेळी खेळाडूंची माहिती मिळवायची आणि ती सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या हँडलवर टाकण्यास सुरवात केली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातूनच २०१८मध्ये या क्षेत्रात पूर्ण वेळ हे काम करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला वेबसाइट तयार झाली. त्यावर वेगवेगळ्या प्रकारची माहिती देऊ लागलो. या कामासाठी खरी चालना मिळाली ती मार्च २०१८मध्ये. मुंबईत ऑस्ट्रेलिया इंग्लंडची मॅच सुरू होती. त्यावेळी एका मुलीला समालोचकांना भेटण्याची खूप इच्छा होती. सुरक्षारक्षक तिला सोडत नव्हते. स्टेडियममध्ये मी तिची धडपड पाहिली. तिच्या वडिलांना विचारून तिचा एक फोटो काढला आणि तिला समालोचकांना भेटायचंय अशी पोस्ट ट्विटरवर टाकली. काही वेळातच स्वत- समालोचक त्या मुलीला भेटण्यासाठी आले, त्यांनी तिची खेळाडूंची ही भेट घडवून दिली. दुर्गा नावाच्या त्या मुलीला क्रिकेटर व्हायचे होते. दुर्गासाठी खेळाडूंची भेट खूपच प्रेरणादायी होती.

त्यामुळेच खेळाडूंची सर्व माहिती उपलब्ध होईल, अशी स्पोर्ट्स मीडिया कंपनीच स्थापन करण्याचा निर्णय झाला. वेबसाइट, सोशल मीडिया, मासिक, विविध मुलाखती यांच्या माध्यमातून खेळाडूंची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तिचा फायदा खेळाडू आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन या क्षेत्रात येणाऱ्यांना होतोय. हे सांगण्याचा हेतू हाच आहे की, तुमच्याकडे एखादी आयडिया असेल, काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कोणताही बिझनेस उभा करू शकता. तुमच्या आवडीला तुम्ही व्यवसायाचे स्वरूप देऊ शकता. त्यातून स्वत-चा आनंद, पैसे तर कमवता येतीलच पण समाजासाठी आपले काम प्रेरक बनेल.

स्टार्ट अप हे स्वत-च्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे चांगले साधन आहे. त्यात रिस्क घेण्याची तयारी हवी. स्पोर्ट्स हे स्टार्टअप आणि करिअर या दोन्हीसाठी काही चांगला पर्याय आहे. एखाद्या गोष्टीची तुम्हाला चांगली माहिती असेल आणि ती गोष्ट तुम्ही मोठी करू शकता असा विश्वास असेल तर स्टार्ट अप हा चांगला पर्याय राहू शकतो. हे पर्याय काय असतील हे आपण पुढच्या भागात पाहू.‌

(लेखक हे ‘वुमन्स क्रीक झोन’ या स्पोर्ट्स मीडिया कंपनीचे संस्थापक आहेत.)