
गेवराईः २२८ गेवराई विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी काका बदामराव पंडित यांचा तब्बल ४२ हजार २३३ मते आधिकचे घेत बाजीगर ठरले असून, विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हे तिस-या स्थानावर राहिले.
बीड जिल्ह्यातल्या गेवराई विधानसभा मतदारसंघसाठी २ लाख ७६ हजार २८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शनिवार (ता. २३) गढी येथील नवोदय विद्यालयात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या फेरीपासून महायुतीचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह पंडित हे आघाडी घेत आले.
मोजणीच्या एकुण २९ फे-या पूर्ण झाल्या असताना विजयसिंह पंडित यांना १ लाख १५ हजार ८५१ मते पडली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे बदामराव पंडित यांना ७३ हजार ७१९ मते मिळाली.तर विद्यमान आमदार लक्ष्मण पवार तिस-या स्थानावर राहीले.वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका खेडकर यांनी देखील आमदार लक्ष्मण पवार यांच्या बरोबरीचे मते घेतली. दरम्यान, महायुतीचे विजयसिंह पंडित हे विजयी होताच मतमोजणी केंद्रावर बाहेर मोठा जल्लोष करण्यात आला.
२००४ साली भाजप कडून अमरसिंह पंडित हे विजयी झाले होते.२००९ च्या पंचवार्षिक निवडणूकीत त्यांचा अल्पशा मताने पराभव झाला होता.त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत विजयसिंह पंडित यांची अल्पशा मताने आमदारकी हुलकावणी दिली होती.मात्र या निवडणुकीत विजयसिंह पंडित यांनी बदामराव पंडित यांचा पराभव करून विस वर्षानंतर शिवछत्र परिवारात आमदारकी मिळाली आहे.
गेवराई तालुक्यात आतापर्यंत पंडित पवार या घराण्यात राजकारण होत आलेले आहे.२०१९ च्या झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत लक्ष्मण पवार यांनी विजयसिंह पंडित यांचा पराभव केला होता.तर यंदाच्या निवडणुकीत विजयसिंह पंडित यांनी काका बदामराव पंडित यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत बाजीगर ठरले आहेत.
तसेच तालुक्यात बहुतांश शेती क्षेत्र कोरडवाहू असल्यामुळे पाण्याचे नियोजन करता आले नसल्यामुळे शेतकरीवर्ग आमदारांच्या कार्यावर खुश नसल्याचे दिसून आहेत. तर, तालुक्यातील तरुण वर्गाला बेरोजगारीचा सामना करावा लागत असून यासाठी आमदारांनी कोणतेच पाऊल मागील दहा वर्षांत उचलले नसल्याचे येथील बेरोजगार तरुणांकडे पाहून दिसून येत आहे. दहा वर्षांत कोणतेच शैक्षणिक काम केले नसल्यामुळे अनेक तरुण शिक्षणापासून वंचित असल्याचे विदारक चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे. यामुळे मागील दहा वर्षांत केलेल्या कामाचा गाजावाजा करणारे आमदार कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर मत मागत आहेत याच प्रश्न सामान्य जनतेला व तरुण वर्गाला पडला आहे.