कोरेगाव : आमदार झाल्यानंतर लगेचच आलेल्या कोविडच्या महामारीत हजारो रुग्णांचे स्वखर्चाने वाचवलेले प्राण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा महायुतीच्या माध्यमातून मतदारसंघात केलेली हजारो कोटिंची विविध विकासकामे आणि रात्रंदिवस जनतेच्या संपर्काच्या जोरावर आज महायुतीचे तथा शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी सलग दुसऱ्यावेळी महाविकास तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषद सदस्य तथा आमदार शशिकांत शिंदे यांचा दारुण पराभव करत पुन्हा एकदा आमदारकी पदरात पाडून घेतली आहे.
पारंपरिक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या परंतु, मागील विधानसभा निवडणुकीत मूळ शिवसेनेने आपल्याकडे खेचून घेतलेल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघात (Koregaon Assembly Constituency) या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ताकद लावलेली होती. लोकसभा निवडणुकीत कोरेगावातून महायुतीमधील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना दिलेल्या मताधिक्यापेक्षा अधिक मताधिक्य मिळवण्यासाठी महायुतीमधील शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी जोरदार फिल्डिंग लावलेली होती.