
जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा मुंब्य्राचा गड राखला असं म्हणावं लागेल. त्यांनी नजीब मुल्ला यांचा पराभव केलाय. जितेंद्र आव्हाड यांनी तब्बल ९६ हजार मतांनी नायब मुल्ला यांचा पराभव केलाय. आता मुंब्रा विधानसभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची सत्ता असणार आहे. लोकसभेच्या निकालानंतर प्रत्येक पक्षाला धडा मिळाला होता. त्यामुळे विधानसभेचं बिगुल वाजल्यापासून सगळेच पक्ष जोरदार तयारीला लागले.
कल्याण मतदार संघातल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी कळवा-मुंब्रा मतदारसंघ चर्चेतला ठरला. कारण इथे स्वत:ला स्वत:समोर उभे करण्यासारखीच गोष्ट घडली आहे. इथे लढत होती, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची. शरद पवार गटातून उभे होते, माजी आमदार आणि आक्रमक राजकारणी जितेंद्र आव्हाड तर अजित पवार गटातून उभे होते, नजीब मुल्ला.
आता गंमत अशी की, राष्ट्रवादी एक पक्ष असताना दोघेही पूर्वी एकाच पक्षात होते. एकाच चिन्हामागे होते. नजीब मुल्ला तर आव्हाडांच्या अगदी जिवश्चकंठश्च सहकाऱ्यांपैकी एक होते. पण मधल्या काळात सगळीच राजकीय समीकरणं बदलली आणि आव्हाड आणि मुल्ला एकमेकांविरुद्ध उभे राहिले. आव्हाडांचा खासा पठ्याच आता त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून ठाकला होता.