
Dhananajay Munde: महाराष्ट्रातील महायुती सरकारला पहिल्यांदाच मोठ्या वादाचा सामना करावा लागत असून, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून, मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराडवर हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. या प्रकरणामुळे महायुती सरकारवर राजकीय दबाव वाढला असून, संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार राजीनामा दिला.