काळ्या ठिपक्याचा त्रास

Age-related macular degeneration
Age-related macular degeneration

ज्येष्ठ नागरिकांना दृष्टीपुढे काळा ठिपका निर्माण होण्याचा त्रास सतावण्याची शक्यता असते. हा काळा ठिपका समोरच्या गोष्टी धूसर करू लागतो. तसेच आपली वाट वाकडीतिकडी करून टाकतो. त्यामुळे चालताना त्रास तर होतोच, पण ७४ टक्के रुग्णांना पडण्याची भीती वाटते. 

वृद्धांमध्ये नजरेची क्षमता कमी होते. पण त्याहून वेगळा असा ‘एज-रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन’ (एएमडी) हा डोळ्यांचा विकार आहे. किंबहुना एएमडी हे साठीच्या पुढच्या व्यक्तींच्या दृष्टिदोषाचे मुख्य कारण आहे. या दृष्टिदोषामुळे रुग्णांना पडण्याची भीती वाटू लागते. हा विकार पडण्याबद्दल दीर्घकाळ वाटत राहणारी चिंता घेऊन येतो. स्वाभाविकच ही चिंता वाटणारी व्यक्ती काही कृती करण्याचे टाळू लागते. दैनंदिन आयुष्यात एखादी व्यक्ती ज्या कृती सहज करू शकते, त्या करणेच या चिंतेमुळे टाळले जाते. ही वय वाढत चाललेल्या प्रौढांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारी आणि गंभीर समस्या आहे. हा विकार जिवावर थेट बेतत नाही, पण या विकारामुळे उद्‍भवणाऱ्या दृष्टिदोषामुळे रुग्ण पडतो आणि त्यामुळे गंभीर दुखापतीं होतात, त्यामुळे जिवावर बेतू शकते. 

एएमडी म्हणजे काय? 
डोळ्यातील पडद्यावरचा (रेटिनावरचा) ठिपका (मॅकुला) सुस्पष्ट केंद्रीय दृष्टीसाठी आवश्यक असतो. एएमडीमुळे या ठिपक्यात फरक पडतो आणि केंद्रीय दृष्टीची हानी होते. काय होते की, मुळातल्या या ठिपक्यापुढे, म्हणजे केंद्रीय दृष्टीपुढे एक काळा ठिपका निर्माण होतो व तो वाढत जातो. त्यामुळे जशा आपल्याला पुढे सरळ रेषेत असलेल्या वस्तू (ऑब्जेक्टस) स्पष्ट दिसतात, तशा त्या या रुग्णांना दिसत नाहीत. तर केंद्रीय दृष्टीमध्ये समोरचे दृश्य अंधुक किंवा अस्पष्ट दिसते. एकीकडे दृश्य धूसर होत जातानाच त्या दृश्याकडून येणाऱ्या सरळरेषा नागमोडी किंवा वाकड्या दिसतात, विरोधाभासी रंगसंगती किंवा एकंदर रंगांबाबतची संवेदनशीलताच कमी होते. तसेच, दूर अंतरावरचे दिसणेही कठीण होते. 

एएमडीमुळे पडण्याची भीती कशी निर्माण होते? 

वय वाढत चाललेल्या प्रौढांच्या दृष्टीमध्ये दुरुस्त न होण्याजोगे दोष निर्माण होण्याचे एएमडी हे सर्वाधिक आढळणारे कारण आहे. वाढत्या वयाशी निगडित मॅक्युलर हानीमुळे दृष्टी कमी होते आणि परिणामी संबंधित व्यक्ती अपघाताने पडण्याचे प्रसंग वारंवार घडतात. त्यातून काही वेळा गंभीर दुखापती होऊ शकतात. या संबंधीच्या एका अभ्यासात सहभागी झालेल्या एकूण ७४ टक्के लोकांनी त्यांना पडल्यामुळे किंवा न पडता काही दुखापत झाल्याचे नमूद केले. एएमडीच्या रुग्णांमध्ये, दृष्टीदोष जसा वाढत गेला, तसे पडल्यामुळे होणाऱ्या किंवा अन्य कारणांमुळे होणाऱ्या दुखापतींचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत गेले आहे, असे आढळले. एएमडीमुळे शरीराचा समतोल कमी होतो, दैनंदिन कामे करण्यात अडथळे येतात, रुग्णाचे आयुष्य सीमित होते, आयुष्याचा दर्जा खालावतो. या सगळ्याचा संबंध कुठेतरी पडण्याशी किंवा पडण्याच्या भीतीशी असतो. 

पडण्याच्या भीतीतून बाहेर येण्याचे प्रभावी मार्ग 
१. कुटुंबीयांनी अशा व्यक्तींना शारीरिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यात मदत करणे आणि त्यांच्यासाठी घरातील परिस्थिती सुरक्षित करणे– पडण्याची भीती वाटणाऱ्यांबाबत सर्वांत महत्त्वाचा ठरतो तो कुटुंबीयांनी दिलेला पाठिंबा. त्यामुळे ही समस्या दूर होण्यात मदत होऊ शकते. कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे केवळ आत्मविश्वासच वाढत नाही, तर त्यांना शारीरिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यातही मदत होते. घरात त्यांची काळजी घेणारी व्यक्ती सुरक्षित परिस्थिती निर्माण करू शकते, जेणेकरून, या समस्येला तोंड देणारी व्यक्ती कोणत्याही अडथळ्यांशिवाय मुक्तपणे फिरू शकेल. 
२. सशक्तपणा व समतोल यांच्यात सुधारणा– सशक्तपणा व समतोल योग्य राखणे हा आत्मविश्वास प्राप्त करण्याच्या तसेच भीती मागे सारण्याच्या सर्वोत्तम मार्गांपैकी एक आहे. रुग्णांना व्यक्तीनुरूप धोके समजावून देण्यासाठी, तसेच पडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी धडे देण्यासाठी काही सत्रे उपलब्ध आहेत. 
३. प्रकाशयोजना सुधारणे– अंधुक प्रकाश असलेल्या मार्गांतील दिवे बदलण्याच्या पर्यायावर कुटुंबीयांनी चर्चा करावी. शिवाय, मोटर-सेन्सर लायटिंग बसवून घेण्याच्या पर्यायावरही विचार करावा, जेणेकरून, रुग्णाला संभाव्य अडथळा लक्षात येईल. 
४. घरातील अडथळे दूर करणे– घरातील सामान, टेबले, स्टुल्‍स आणि अन्य वस्तूंमध्ये सुसंगत बदल करावेत. त्यामुळे रुग्णाला शारीरिक हालचाली करण्यास भीती वाटणार नाही. 
५. असुरक्षित पादत्राणांचा वापर टाळावा- अर्ध्या इंचाहून अधिक उंचीच्या टाचा असलेले बूट वापरू नयेत, मागून बंद नसलेले सॅण्डल्स किंवा स्लिपर्स वापरू नयेत. त्याचप्रमाणे व्यवस्थित मापाची नसलेली कोणतेही पादत्राणे वापरू नयेत. 

एएमडीचे निदान व उपचार वेळेत झाल्यास वयोवृद्ध रुग्णांमधील पडण्याची भीती दूर करण्यात त्याची मदत होऊ शकते. म्हणूनच, नेत्ररोगतज्ज्ञाकडून वैद्यकीय उपचार घेणे सर्वांत महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे साठ वर्षांवरील वयोवृद्धांनी रेटिनाची स्थिती बघण्यासाठी दर सहा महिन्यांनी नियमित तपासणी करून घेणे इष्ट ठरते. 
एएमडीबाबत आशेचा किरण 
एज-रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन अर्थात एएमडीसारखे रेटिनाचे विकार दीर्घकालीन असतात, पण त्यांचे व्यवस्थापन करता येते. पण रुग्ण डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये सल्ला घेण्यासाठी येतात तेव्हा त्यांचा विकार पुढील अवस्थेला पोचलेला असतो. याचा अर्थ रुग्णांमधील जागरूकता व विकारावरील उपचारांचे उपलब्ध पर्याय यांतील दुवा हरवलेला आहे. अगदी विकसित देशांमध्येही एएमडीबद्दल जागरूकता नाही, असे आढळले आहे. 

काही रुग्णांमध्ये आजाराची वाढ संथ करू शकतात किंवा थांबवू शकतात, असे काही उपचार एएमडीसाठी उपलब्ध आहेत. या अवस्थेचे निदान लवकर झाले, तर उपचार अधिक प्रभावी ठरू शकतात. भारतात उपलब्ध उपचारांमध्ये लेसर फोटोकोअग्लुलेशन, अँटि-व्हीईजीएफ (व्हस्क्युलर एण्डोथेलिअल ग्रोथ फॅक्टर) इंजेक्शन्स आणि लेसर व अँटि-व्हीईजीएफ या दोन्हींचा संयोग साधून दिल्या जाणाऱ्या उपचारपद्धती एएमडीसाठी उपलब्ध आहेत. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com