अल्झायमर (स्मृतिभ्रंश)

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 21 September 2018

मेंदूत साठविलेल्या माहितीची फेररचना करणे आवश्‍यक असते. आज केस विंचरले, तरी दुसऱ्या दिवसापर्यंत केसांमध्ये पुन्हा गुंता तयार होतो. गुंता झालेले केस विंचरून पुन्हा नीट करून घ्यावे लागतात, तसे मेंदूच्या कार्यपद्धतीचे जाळे योग्य उपाययोजना करून व्यवस्थित ठेवावे लागते. स्मृती थोडी कमी झाली, ज्या गोष्टी आठवणे अपेक्षित आहे, त्या लक्षात राहात नाहीत असे वाटले, तर तेव्हाच त्रास बरा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असते. असे उपचार केले गेले नाहीत, तर संपूर्ण स्मृतिनाश होऊ शकतो, असे झाल्यावर मात्र उपचार करणे अवघड होते.

मेंदूत साठविलेल्या माहितीची फेररचना करणे आवश्‍यक असते. आज केस विंचरले, तरी दुसऱ्या दिवसापर्यंत केसांमध्ये पुन्हा गुंता तयार होतो. गुंता झालेले केस विंचरून पुन्हा नीट करून घ्यावे लागतात, तसे मेंदूच्या कार्यपद्धतीचे जाळे योग्य उपाययोजना करून व्यवस्थित ठेवावे लागते. स्मृती थोडी कमी झाली, ज्या गोष्टी आठवणे अपेक्षित आहे, त्या लक्षात राहात नाहीत असे वाटले, तर तेव्हाच त्रास बरा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असते. असे उपचार केले गेले नाहीत, तर संपूर्ण स्मृतिनाश होऊ शकतो, असे झाल्यावर मात्र उपचार करणे अवघड होते.

रोगाला नाव काहीही दिले, तरी विशिष्ट रोगात विशिष्ट प्रकारचा त्रास होतोच. श्रीमद्‌भगवद्‌गीतेत ‘स्मृतिभ्रंशाद्‌ बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्‍यति’ असे म्हटलेले आहे. स्मृतिभ्रंशामुळे मनुष्याची स्मरणशक्‍ती कमी होते; इतकी की त्याला स्वतःचे नाव लक्षात राहात नाही, तो स्वतःच्या नातेवाइकांना ओळखू शकत नाही, स्वतःचा पत्ता त्याला आठवत नाही.

अशा व्यक्‍तीची स्थिती आकाशात दोर तुटलेल्या पतंगाप्रमाणे होते, तो ‘मुक्‍त जीव’ तयार होतो. ‘मुक्‍त जीव’ म्हणजे त्याला मुक्‍ती मिळालेली असते असे नव्हे, तर त्याला कुठे आधार नसतो. त्याचे पृथ्वीशी असलेले संधान सुटलेले असते. एखादा वेड लागलेला मनुष्य जसे रस्त्याने जाताना त्याला काही समजत नाही, तो कुठेही जातो, कुठेही पाहतो, चालताना ठेचकाळून पडतो. त्याचे डोळे उघडे असतात, पण तो काही पाहतो का हे कळत नाही, तो असंबद्ध हातवारे करत असतो. त्याला आजूबाजूचे जग दिसत नसावे, असे वाटते. वायुमय देह असलेल्या माणसाला इंद्रिये नसतील किंवा इंद्रिये असली, तरी त्यात दर प्रतिबिंबित होण्याची क्षमता नसेल, तर त्याला कसे  दिसणार? स्मृतिभ्रंश झालेल्याची अवस्था अशीच होत असावी, असे म्हणायला हरकत नाही. स्मृतिभ्रंश झालेला माणूस रस्त्यात भटकत असताना नातेवाइकांना सापडला किंवा त्याला कोणी ओळखले व घरी आणून सोडले, तर गोष्ट वेगळी, परंतु तो स्टेशनवर पोचला, समोर आलेल्या कुठल्या तरी गाडीत बसला, कुठेतरी निघून गेला, त्याच्या अंगावरचे बऱ्यापैकी असलेले कपडे कोणी तरी काढून घेतले व त्याला खड्ड्यात ढकलून दिले, तर स्मृतिभ्रंशाद्‌ विनश्‍यति हे आपल्याला समजू शकेल.

अल्झायमर झालेला रोगी जवळ जवळ सर्व प्रकारच्या स्मृती हरवून बसलेला असल्यामुळे तो अशाच विचित्र अवस्थेला प्राप्त होतो. त्याची खूप प्रकारे काळजी घ्यावी लागते. अशा प्रकारच्या त्रासावर हमखास इलाज सापडणे खूप अवघड असते. अशा प्रकारच्या त्रासासाठी आयुर्वेदाकडेच धाव घ्यायला हवी. 
आयुर्वेदाची सुरुवात स्वस्थवृत्ताने म्हणजे मुळात रोग होऊच याची खबरदारी कशी घ्यावी, यापासून होते. स्वस्थवृत्ताचे पालन केलेले नसले, वेळोवेळी बेताल वागणूक ठेवलेली असली, ‘मनःपूतं समाचरेत्‌’ म्हणजे मनाला वाटेल तसे शरीराने वागावे, अशी दिनचर्या ठेवलेली असली, तर रोग येणे, पर्यायाने शरीराचा नाश होणे अटळ असते.

स्मृती आहे कुठे, ती कशी चालते, याबद्दल माहिती असणे आवश्‍यक आहे. मेंदूतील कॉर्टेक्‍स या भागात स्मृती साठविलेली असते. कॉर्टेक्‍समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी स्मृती साठवलेली असते, जणू स्मृती साठवण्यासाठी कॉर्टेक्‍सचे वेगवेगळे कप्पे असतात. अशा स्मृतिकेंद्रापर्यंत पोचून, स्मृतीत साठविलेले आपल्याला काय हवे ते शोधून, ते बाहेर आणून त्यानुसार कार्य केले जाते. 

अचानक काही कारण नसताना अल्झायमर कसा काय सुरू होतो? तो कुठून येतो? इतकी वर्षे असा विकार का नव्हता? म्हातारपणी काही गोष्टी लक्षात राहात नाही, नको त्या गोष्टी मात्र लक्षात राहतात, हे सर्वसामान्यपणे दिसणारे लक्षण आहे. पण, म्हातारपण न येताच स्मृतिनाश होणे, हे सर्वसामान्य नव्हे. 

येथे लक्षात घ्यायची एक गोष्ट म्हणजे मेंदू हा आपल्या अस्तित्वाला कार्यरत ठेवण्यासाठी योजना करणे, कार्यवाटप करणे, कार्य करण्यासाठी आज्ञा देणे व शक्‍ती पुरवणे वगैरे कामे करत असतो. मेंदू हा जणू सर्व कामे करणारा ‘जनरल मॅनेजर’ असतो. 

एकूण जीवन व त्याचे कार्य म्हटले, की एक असते बाहेरचे जग व या ठिकाणी असलेले कार्य किंवा जीवनमान आणि दुसरे असते स्वतःचे शरीर व त्या शरीराला पचनापासून ते झोपेपर्यंत, विश्रांतीपासून ते कार्यरत ठेवण्यापर्यंत सर्व कार्यांचे व्यवस्थित नियोजन करणे हे त्यात येते आणि ही जबाबदारीसुद्धा मेंदूवर असते. 

मनुष्य एकदा का बाह्यजगत जिंकण्याच्या मागे लागला व तो हे हवे, तेही हवे, अशा इच्छा ठेवून बाहेर फिरू लागला, तर साहजिकच त्याच्या शरीराच्या आतील व्यवस्थेवर ताण पडतो. असा ताण हाच खरा रोग आहे. म्हणून डोके शांत म्हणजे ताणरहित ठेवावे. 

एक गोष्ट निश्‍चित, की स्मृती साठविण्यासाठी स्मृती साठविता येईल, अशा पद्धतीच्या पेशी असणे आवश्‍यक असते. स्मृती साठविण्यासाठी विचार वा प्रसंग व्यवस्थितपणे नोंद झालेला असणे आवश्‍यक असते. ही ‘रेकॉर्ड’ झालेली नोंद स्मृतीच्या रूपात मेंदूत योग्य जागी जाऊन साठविली गेली पाहिजे. मेंदूच्या स्मृतिकेंद्रात साठविलेली माहिती हवी असेल तेव्हा काढून घेऊन उपयोगात आणण्यासाठी पण योजना हवी. 

आपण मेंदूची नीट काळजी घेत नाही. भौतिकतेकडे, पैसा-पैसा जमविण्याकडे आपले लक्ष असते.  एखाद्या मुलाने एखाद्या विषयाची घोकंपट्टी केली, तरी त्या विषयाचे मर्म त्याला समजलेले नसते. आवश्‍यकता असेल तेव्हा या घोकंपट्टीचा काही उपयोग होत नाही. म्हणजे विषय नीट समजून घेणेच आवश्‍यक असते. विषय समजून घेण्यासाठी स्थिर मनाची आवश्‍यकता असते. मन भरकटणारे असले, मनाच्या वृत्ती सैरावैरा धावणाऱ्या असल्या, तर ऐकलेले वा पाहिलेले नोंद होत नाही, पर्यायाने ते स्मृतीत साठवलेही जात नाही. 

एखाद्याने खूप भाजी खरेदी केली, पण ती घेतली फाटक्‍या पिशवीत; तर घरी पोचल्यावर त्यातील बरीचशी भाजी गायब झाल्याचे लक्षात येते. कारण फाटकी पिशवी भाजीच्या ओझ्याने आणखीनच फाटून रस्त्यात भाजी पडून गेलेली असते. भाजी घेण्यासाठी पिशवी चांगली असणे आवश्‍यक असते त्याचप्रमाणे स्मृती ज्या पेशींमध्ये साठवली जाते त्या पेशींची ताकद चांगली असणे, तसेच पेशींची संख्या योग्य असणेही महत्त्वाचे असते. मेंदूच्या आरोग्याकडे लक्ष न दिल्यास मेंदूची क्षमता कमी कमी होत जाते. मेंदूला कार्यक्षम ठेवण्यासाठी मेंदूच्या पेशींचे आरोग्य नीट राहील, हे पाहणे आवश्‍यक असते. शरीर मजबूत राहावे, स्टॅमिना टिकावा, या हेतूने उपाय केले जातात, तसे मेंदू चांगला राहण्यासाठीही काही योजना करणे आवश्‍यक असते. अशी काही योजना न करता जिभेला आवडेल असा आहार ठेवला, तर मेंदूचे आरोग्य बिघडण्याची शक्‍यता वाढते. पंचामृत, अधिक कस असलेले अन्न मेंदूला उपयोगी ठरते. चटक-मटक पदार्थ, रुक्ष व निःसत्त्व आहार घेण्याने मेंदूला काहीही पोषण मिळत नाही. असे फार काळ होत राहिले, तर  विस्मृतीचा त्रास सुरू झालेला दिसतो.

मेंदूत साठविलेल्या माहितीची फेररचना करणे आवश्‍यक असते. आज केस विंचरले, तरी दुसऱ्या दिवसापर्यंत केसांमध्ये पुन्हा गुंता तयार होतो. गुंता झालेले केस विंचरून पुन्हा नीट करून घ्यावे लागतात, तसे मेंदूच्या कार्यपद्धतीचे जाळे योग्य उपाययोजना करून व्यवस्थित ठेवावे लागते. यासाठी पाठांतर करणे खूप फायद्याचे ठरते. यासाठी संस्कृत भाषेतील काही रचनांचा उपयोग करून घेता येतो. एकूणच मेंदूची नीट काळजी घेणे व त्याकडे लक्ष पुरविणे ही आवश्‍यकता लक्षात घेऊन आचरण ठेवावे.
स्मृती थोडी कमी झाली, ज्या गोष्टी आठवणे अपेक्षित आहे त्या लक्षात राहात नाहीत असे वाटले, तर तेव्हाच त्रास बरा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असते. असे उपचार केले गेले नाहीत, तर संपूर्ण स्मृतिनाश होऊ शकतो. असे झाल्यावर मात्र उपचार करणे अवघड होते. 

आयुर्वेदाने सुचविलेल्या औषधांची व द्रव्यांची योजना करून मेंदूचे आरोग्य सांभाळावे. रोग झाल्यावर उपचार करणे हे मेंदूच्या बाबतीत अवघड असते, तेव्हा रोग होऊ नये म्हणून प्रत्येकाने लहानपणापासून योग्य ती काळजी घेणे आवश्‍यक आहे व त्यासाठी भारतीय परंपरेने सांगितलेले आहार-आचरण आणि दैनंदिन जीवनातील शिस्त सांभाळणे आवश्‍यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alzheimer Sickness Dr. Balaji Tambe