अन्नपानविधी- शाकवर्ग 

Annapaanvidhi Shakvarga
Annapaanvidhi Shakvarga

भाजी व सूप करण्यासाठी कोवळा पडवळच वापरायचा असतो. जून किंवा शिळा पडवळ अजीर्णास कारण ठरतो. रक्‍तदोष दूर करणारा असल्याने पडवळ त्वचाविकारांत पथ्यकर असतो. मलावष्टंभाची प्रवृत्ती असणाऱ्यांना पडवळ वाफवून त्यावर चवीनुसार सैंधव, जिऱ्याची पूड, मिरपूड टाकून रात्रीच्या जेवणात घेणे चांगले असते. 


मागच्या वेळी आपण शाकवर्गातील दुधी या भाजीची माहिती घेतली. आज यानंतरच्या पडवळ या भाजीचे गुणधर्म पाहू या. 

पथ्यकर भाज्यांमध्ये पडवळ भाजी अग्रणी असते. संस्कृतात पडवळास 'पटोल' म्हणतात. हिचे कडू व गोड असे दोन प्रकार असतात. कडू पडवळ औषधात वापरतात तर गोड पडवळाची भाजी केली जाते. 
फलं वृष्यं रुचिप्रदम्‌ । 
मधुरं स्वादु पथ्यं च पाचकं लघु दीपकम्‌ ।। 
हृद्यं स्निग्धं तथोष्णं च कफरक्‍तत्रिदोषनुत्‌ । 
कासज्वरक्रिमीन्हन्ति ।।

....निघण्टु रत्नाकर 
पडवळाची भाजी चवीला गोड, पचायला हलकी व पथ्यकर असते, रुचकर, पाचक तसेच हृदयाला हितकर असते, रक्‍तदोष दूर करते व त्रिदोषांचे शमन करते, वृष्य म्हणजे शुक्रधातूसाठी पोषक असते, गुणांनी स्निग्ध, वीर्याने उष्ण आणि खोकला, ताप व जंतांचा नाश करणारी असते. 

रक्‍तदोष दूर करणारा असल्याने पडवळ त्वचाविकारांत पथ्यकर असतो. विशेषतः अंगावर खाज, आग, चट्टे उठणे वगैरे त्रास असले तर पडवळाच्या वेलीच्या पानांचा रस बाहेरून लावण्याचा आणि पडवळाची जिरे, हळद, धणे वगैरे लावून तयार केलेली साधी भाजी खाण्याचा उत्तम उपयोग होतो. पडवळाची भाजी पोट साफ होण्यास मदत करणारी असते. त्यामुळे मलावष्टंभाची प्रवृत्ती असणाऱ्यांना पडवळ वाफवून त्यावर चवीनुसार सैंधव, जिऱ्याची पूड, मिरपूड टाकून रात्रीच्या जेवणात घेणे चांगले असते. 

पथ्यकर, पचायला हलका आणि अग्नी प्रदीप्त करणारा असल्याने पडवळ वजन कमी होण्यास मदत करतो आणि तरीही शक्‍ती कमी होऊ देत नाही. यामुळे मेद कमी करायचा असल्यास दररोज संध्याकाळी फक्‍त पडवळ व मुगाच्या डाळीचे किंवा पडवळ व कुळथाचे सूप घेणे उत्तम असते. यात चवीसाठी आल्याचा रस, आमसूल, सैंधव, जिरे, मिरपूड वगैरे गोष्टी टाकता येतात. भूक असेल त्या मानाने सूप घेतले तर भूकही भागते, पण वजन कमी होण्यासही मदत मिळते. 

पडवळाची भाजी तापातही हितकर असते. अगदी सुरुवातीला तापामध्ये लंघन करणे उत्तम असते, मात्र भूक लागली तर पडवळ व मुगाचे कढण करून गरम गरम घेण्याचा उपयोग होतो. तापामध्ये मलावष्टंभ असला तर पडवळ व मनुका एकत्र शिजवून त्याचे पातळ कढण करून घेता येते. यामुळे एक-दोन जुलाब झाले की तापही उतरतो. 

तापामध्ये हातापायांची आग होत असली तर पडवळाची पाने वाटून तयार केलेली चटणी मेंदीप्रमाणे तळव्यांवर लावून ठेवता येते. 

लहान मुलांना वारंवार खोकला होत असल्यास त्यांच्या आहारात पडवळाच्या भाजीचा नियमित समावेश असू द्यावा. यामुळे खोकला होण्याचे प्रमाण कमी होईल, मात्र तरीही खोकला आला, छातीत कफ भरून राहात असेल तर पडवळाच्या पानांचा एक चमचा रसात मध मिसळून देता येतो, यामुळे कफ बाहेर पडण्यास मदत मिळते, क्वचित एखादी उलटी झाली तर त्यामुळेही लगेच बरे वाटते. 

मोठ्या माणसांना खोकला झाला असल्यास पडवळाची भाजी व जवाची भाकरी आहार म्हणून घेता येते. 

तोंडाला चव नसेल, भूक लागत नसेल, पोटात जडपणा वाटत असेल तर लंघन करणे म्हणजे काही न खाणे, फक्‍त तहान लागेल त्या प्रमाणात उकळलेले गरम पाणी पिणे श्रेयस्कर असते. यामुळे थोडी भूक जाणवू लागली की पडवळाचे सूप त्यात लिंबू, ओवा, हिंग, जिरे पूड टाकून घेण्याचा उपयोग होतो. 

भाजी व सूप करण्यासाठी कोवळा पडवळच वापरायचा असतो. जून किंवा शिळा पडवळ अजीर्णास कारण ठरतो. पडवळ वाहत्या पाण्याखाली धुवून वरची साल काढून टाकणे चांगले. सूप तयार करण्यासाठी साधारण पाव किलो पडवळ तुकडे करून सव्वा लिटर पाण्यात भांड्यांत शिजवण्यास ठेवावा. पडवळ नीट शिजला की रवीच्या मदतीने सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे, गाळणीच्या मदतीने आतल्या बिया, धागे वगैरे वेगळे करावे आणि याला वरून साजूक तुपाची जिरे, भिंग, हळद वगैरे टाकून फोडणी द्यावी. चवीनुसार सैंधव, आल्याचा रस, लिंबू किंवा आमसूल टाकावे. 

जून पडवळातील बिया वेगळ्या काढून ठेवता येतात, त्या सुकवल्या की फोडून आतला मगज काढता येतो. हा मगज जंतनाशक असतो. अर्धा चमचा मगज घेऊन वरून दीड ते दोन चमचे एरंडेल घेण्याने जंत पडून जातात. 

अन्नपानविधी अध्यायातील यापुढचा भाग पुढच्या वेळी पाहू या. 

 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com