अन्नपानविधी- शाकवर्ग

Annapaanvidhi Shakvarga
Annapaanvidhi Shakvarga

कोहळा धातूंची ताकद वाढवतो, विशेषतः शुक्रधातूला पोषक असतो. पित्तनाशक, रक्‍तदोष दूर करणारा आणि वातसंतुलन करणारा असतो. तो अग्नीला प्रदीप्त करतो, मूत्राशयाची शुद्धी करतो, सर्व दोषांना संतुलित करतो, पथ्यकर असतो आणि सर्व प्रकारच्या मानसिक रोगांवर उपयोगी असतो. 

दुधी, पडवळ, तोंडली आणि कारले या अतिशय पथ्यकर असणाऱ्या भाज्यांची आपण माहिती घेतली. आज आपण कोहळा या फळभाजीचे आरोग्यासाठीचे योगदान जाणून घेऊ. 
कोहळ्याची वेल असते, पाने खरखरीत असतात तर फुले पिवळ्या रंगाची असतात. वसंत ऋतूमध्ये फुले येतात, ग्रीष्मात फळे धरतात, ही फळे तयार होईपर्यंत शरद-हेमंत ऋतू उजाडतो. भोपळ्यासारखे दिसणारे हे फळ अंड्याच्या आकाराचे पण साधारण दहा-बारा पट मोठे असते. ताज्या फळावर पांढरी दाट लव असते, काही काळाने ही लव गळून जाते. कोवळा कोहळा खाण्यास निषिद्ध समजला जातो. पूर्ण वाढ झालेला, तयार झालेला कोहळा वापरण्यास योग्य असतो. असा कोहळा वेलावरून काढून घेतल्यावर वर्षभर टिकू शकतो. 

कोहळ्याला संस्कृत भाषेत कुष्मांड असे म्हणतात, ज्याच्या बीजात किंचितही उष्णता नाही तो कुष्मांड. अर्थातच कोहळा शीतल गुणाचा असतो. आयुर्वेदाच्या ग्रंथात कोहळ्याचे गुणधर्म पुढीलप्रमाणे सांगितले आहेत, 
कुष्माण्डं बृंहणं वृष्यं गुरु पित्तास्रवातनुत्‌ ।
बालं पित्तापहं शीतं मध्यमं कफकारकम्‌ ।। 
वृद्धं नातिहिमं स्वादु सक्षारं दीपनं लघु । बस्तिशुद्धिकरं चेतोरोगहृत्सर्वदोषजित्‌ ।। 

...भावप्रकाश 
कोहळा धातूंची ताकद वाढवतो, विशेषतः शुक्रधातूला पोषक असतो, पित्तनाशक, रक्‍तदोष दूर करणारा आणि वातसंतुलन करणारा असतो. तयार झालेला ताजा कोहळा अतिशय थंड असल्याने पितशमनास उत्तम असतो, तोच काही दिवसांनी मध्यम पिकला की प्राकृत कफाचे पोषण करतो, तर साधारण जून झाला असता पचण्यास हलका होतो, साधारण थंड असतो, चवीला गोड, क्षारयुक्‍त असतो, अग्नीला प्रदीप्त करतो, बस्ती (मूत्राशयाची) शुद्धी करतो, सर्व दोषांना संतुलित करतो, पथ्यकर असतो आणि सर्व प्रकारच्या मानसिक रोगांवर उपयोगी असतो. 

- कोहळा बस्तीशुद्धिकर व शीतवीर्याचा असल्याने लघवी साफ होण्यास मदत करतो. त्यामुळे लघवीला जळजळ होत असल्यास, लघवी अडखळत किंवा पूर्ण होत नसल्यास व्यवस्थित तयार झालेल्या कोहळ्याच्या गराचा चार-पाच चमचे रस, त्यात चिमूटभर जिरे पूड व चिमूटभर धणे पूड टाकून घेण्याचा उपयोग होतो. 

- आम्लपित्ताचा त्रास होण्याची सवय असणाऱ्यांनी सकाळी कोहळ्याचा चार-पाच चमचे रस साखरेसह घेणे चांगले असते. डोके दुखणे, मळमळणे, उलट्या होणे यांसारखे त्रास बंद होतात. 

- मूतखडा किंवा लघवीतून खर जाते त्या विकारावर कोहळ्याचा चार-पाच चमचे रस, त्यात चिमूटभर जवखार टाकून घेण्याचा फायदा होतो. 

- लघवी अडली असल्यास किंवा पूर्ण साफ होत नसल्यास किसलेला कोहळ्याचा गर ओटीपोटावर ठेवण्याचा उपयोग होतो. 

- शरीरात उष्णता अतिप्रमाणात वाढल्याने नाकातून रक्‍त येते, लघवीतून रक्‍त जाते किंवा शौचावाटे रक्‍तस्राव होतो, यावर चार चमचे कोहळ्याचा रस व दोन चमचे ताज्या आवळ्याचा रस हे मिश्रण खडीसाखरेसह घेण्याचा उपयोग होतो. 

- तीव्र प्रकाशात, संगणकावर दीर्घकाळ काम करण्याने किंवा प्रदूषणामुळे डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे, दुखणे, प्रकाश सहन न होणे, डोळ्यांतून पाणी येणे यांसारख्या तक्रारींवर डोळ्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या ठेवण्याचा व नाकात साजूक तुपाचे थेंब टाकण्याचा उपयोग होतो. 

- तापामुळे हाता-पायांच्या तळव्यांची तीव्र जळजळ होते, अशा वेळी तळव्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या ठेवल्याने बरे वाटते. 

- कोहळ्याचे बी सोलून घेऊन व्यवस्थित सुकवून ठेवता येते. हे बी दुधात शिजवून तयार झालेली खीर खाल्ल्यास धातूंचे पोषण होते, शरीर भरण्यास मदत मिळते. 

- वीर्यवृद्धीसाठी कोहळ्याचा पाक उत्तम असतो. शुक्राणूंची संख्या किंवा गती कमी असणे, अशक्‍तपणा जाणवणे वगैरे त्रासांवर तसेच कोणत्याही दीर्घ आजारपणामुळे येणारी अशक्‍तता दूर होण्यास, शस्त्रकर्मानंतर कोहळ्यापासून तयारी केलेले धात्री रसायनासारखे रसायन घेणे उत्तम असते. 

- पेठा ही उत्तर भारतातील, आग्रा येथील प्रसिद्ध मिठाई कोहळ्यापासून बनविलेली असते. गुलाबाच्या अर्कासह तयार केलेला पेठा अतिशय चविष्ट असतो, तसेच पौष्टिकही असतो. 

- दक्षिण भारतात सांबार करताना त्यात कोहळा टाकण्याची पद्धत आहे, कोहळ्याचे सांडगे करून ठेवता येतात. तसेच कोहळ्याची भाजी, रायता, सूप वगैरेही बनवता येते.

पथ्यकर असा कोहळा स्वयंपाकात या प्रकारे वापरला तर त्याचा आरोग्य राखण्यास निश्चित हातभार लागतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com