अन्नपानविधी- शाकवर्ग 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 8 November 2019

दिवसभर खूप धावपळ, दगदग होणाऱ्यांनी रात्रीच्या जेवणात तांबड्या भोपळ्याचे सूप घेतले तर बरे वाटते, थकवा कमी होतो. शुक्राणूंची संख्या कमी असेल तर तांबड्या भोपळ्यातील बी सोलून आतला गर तुपावर परतून घेऊन त्यात साखर मिसळून लहान सुपारीच्या आकाराचा लाडू रोज सकाळी खाण्याचा उपयोग होतो. लहान मुलांचे अंग भरत नसेल, वजन वाढत नसेल तर त्यांच्यासाठीही असे लाडू हितकर असतात. 

दिवसभर खूप धावपळ, दगदग होणाऱ्यांनी रात्रीच्या जेवणात तांबड्या भोपळ्याचे सूप घेतले तर बरे वाटते, थकवा कमी होतो. शुक्राणूंची संख्या कमी असेल तर तांबड्या भोपळ्यातील बी सोलून आतला गर तुपावर परतून घेऊन त्यात साखर मिसळून लहान सुपारीच्या आकाराचा लाडू रोज सकाळी खाण्याचा उपयोग होतो. लहान मुलांचे अंग भरत नसेल, वजन वाढत नसेल तर त्यांच्यासाठीही असे लाडू हितकर असतात. 

आजार होऊ नये म्हणून, तसेच आजार झाला तरी त्यातून लवकरात लवकर बरे होता यावे म्हणून, आहारयोजना महत्त्वाची असते. चरकसंहितेमध्ये अन्नपानविधी नावाचा विस्तृत अध्याय दिलेला आहे, यातील सध्या उपलब्ध असणाऱ्या भाज्यांचे गुणधर्म आपण पाहतो आहोत. मागच्या वेळी आपण घोसाळे या भाजीची माहिती घेतली. आज दोडके या भाजीचे गुणधर्म पाहू. 

‘लाडकी-दोडकी’ या अर्थाने सुद्धा ही भाजी फारशी आवडीने खाल्ली जात नाही. मात्र पथ्यकर भाज्यांच्या यादीमध्ये हिचे स्थान वरचे आहे. दोडक्‍याच्या फळांच्या कडा उंचावलेल्या दिसतात व त्यावर खूप शिरा असतात. म्हणून मराठीत दोडक्‍याला ‘शिराळे’ असेही म्हटले जाते. 
राजकोशातकी शीता मधुरा कफवातकृत्‌ । 
पित्तघ्नी दीपनी श्वासज्वरकासकृमिप्रणुत्‌ ।।
 
...निघण्टु रत्नाकर 
दोडकी चवीला गोड, वीर्याने शीत व पित्तशामक असते, कफ तसेच वातदोषाचे शमन करते, अग्नीचे दीपन करते, दमा, ताप, खोकला व कृमीरोगात हितकर असते. 

दोडक्‍याची भाजी त्यावरील शिरा काढून व व्यवस्थित शिजवून करायची असते. जून दोडका न खाणेच श्रेयस्कर. दोडक्‍याची भाजी मलशुद्धी होण्यास मदत करणारी आहे. त्यामुळे रात्रीच्या जेवणात दोडक्‍याची पातळ भाजी घेण्याने हळूहळू मलावरोधाची प्रवृत्ती दूर होते. तोंडाला रुची येण्यासाठी दोडक्‍याचे तुकडे करून ते परतून त्यावर जिरेपूड, मिरेपूड, किसलेले आले व चवीपुरते मीठ-लिंबू मिसळून घेणे प्रशस्त असते. 

जंत होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी हळद, ओवा, आले वगैरे टाकून केलेली भाजी आठवड्यातून एक-दोन वेळा खाणे श्रेयस्कर असते. 

ताप आला असता जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत लंघन करणे उत्तम असते. मात्र भूक लागते असे जाणवले, की काळी मिरी, सैंधव टाकून केलेले दोडक्‍याचे सूप घेण्याचा फायदा होतो. 

भाजी करताना काढून टाकलेल्या दोडक्‍याच्या शिरा वाळवून त्यात मीठ, मिरची, आले, लिंबू मिसळून रुचकर चटणी बनविण्याची पद्धत आहे, ही चटणी तोंडाला रुची आणणारी व पचनाला मदत करणारी असते. 

वारंवार खोकला, दमा होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी आठवड्यातून दोन-तीन वेळा दोडक्‍याची भाजी आहारात समाविष्ट करणे चांगले होय. 

तांबडा भोपळा 
तांबड्या भोपळ्याचे जमिनीवर पसरणारे वेल असतात. हे भोपळे वजनाला जास्ती असल्याने जमिनीवरच वाढू देतात. तांबडा भोपळा आतून पोकळ असतो. मंडईत सहसा कापलेल्या तांबड्या भोपळ्याचे तुकडे विकत मिळतात. तांबडा भोपळा ही सुद्धा एक पथ्यकर भाजी होय. 
अलाबु शीतला रुच्या तृप्तिकृन्मधुरा स्मृता । 
शोषं जाड्यं मूत्ररोधं दाहं रक्‍तरुजं तथा ।। 
हरतेऽस्या बालफलं शीतलं चातिमधुरम्‌ । 
रुचिकृत्‌ तर्पणं पुष्टिबलवीर्यस्य कारकम्‌ ।। 

...निघण्टु रत्नाकर 
तांबडा भोपळा वीर्याने शीत, चवीला मधुर व रुचकर असतो, शरीराला तृप्त करतो, शोष (अंग सुकणे), जाड्य (अंग जड वाटणे), लघवी साफ न होणे, दाह, रक्‍तदोष वगैरे त्रासात उत्तम असतो. कोवळा तांबडा भोपळा पौष्टिक, वीर्यवर्धक, ताकद वाढविणारा असतो; परंतु जून तांबडा भोपळा पचायला जड, कफदोष वाढविणारा, दाह करणारा तसेच रक्‍तविकार उत्पन्न करणारा असतो. 

सर्व प्रकारच्या मूत्रविकारांत तांबडा भोपळा पथ्यकर असतो. तुपामध्ये जिरे, हळद, मिरपूड, आले टाकून बनविलेली भाजी खाता येते. 

तांबडा भोपळ्याचे दह्यात केलेले भरीत हे सुद्धा रुचकर असते. तोंडाला रुची आणण्यासाठी जेवणाच्या सुरवातीला हे भरीत खाता येते. 
दिवसभर खूप धावपळ, दगदग होणाऱ्यांनी रात्रीच्या जेवणात तांबड्या भोपळ्याचे सूप घेतले तर बरे वाटते, थकवा कमी होतो. 

शुक्राणूंची संख्या कमी असेल तर तांबड्या भोपळ्यातील बी सोलून आतला गर तुपावर परतून घेऊन त्यात साखर मिसळून लहान सुपारीच्या आकाराचा लाडू रोज सकाळी खाण्याचा उपयोग होतो. लहान मुलांचे अंग भरत नसेल, वजन वाढत नसेल तर त्यांच्यासाठीही असे लाडू हितकर असतात.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Annapaanvidhi Shakvarga article written by Dr Shri Balaji Tambe