अन्नपानविधी- शाकवर्ग 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 15 November 2019

हृदयासंबंधित रोग, मधुमेह, कोलेस्टेरॉल, स्थूलता, त्वचाविकार, मूत्रपिंडाचे रोग वगैरे आधुनिक काळातील सर्वच विकारांवर परवर ही एक पथ्यकर भाजी होय. हे रोग होऊ नयेत म्हणूनही परवरचा आहारात समावेश करता येतो व रोग असताना तो बरा होण्यासाठीही ही भाजी सहायक असते. वर्षभर मिळणारी आणि पचण्यास अतिशय हलकी असणारी ही भाजी लहान मुलापासून ते ज्येष्ठ व्यक्‍तीपर्यंत सर्वांसाठी अनुकूल असते. साल काढून भाजी केली तर ती अतिशय रुचकर लागते. 

हृदयासंबंधित रोग, मधुमेह, कोलेस्टेरॉल, स्थूलता, त्वचाविकार, मूत्रपिंडाचे रोग वगैरे आधुनिक काळातील सर्वच विकारांवर परवर ही एक पथ्यकर भाजी होय. हे रोग होऊ नयेत म्हणूनही परवरचा आहारात समावेश करता येतो व रोग असताना तो बरा होण्यासाठीही ही भाजी सहायक असते. वर्षभर मिळणारी आणि पचण्यास अतिशय हलकी असणारी ही भाजी लहान मुलापासून ते ज्येष्ठ व्यक्‍तीपर्यंत सर्वांसाठी अनुकूल असते. साल काढून भाजी केली तर ती अतिशय रुचकर लागते. 

घोसाळे, दोडके, तांबडा भोपळा या भाज्यांनंतर आज आपण परवर या भाजीची माहिती करून घेऊ या. परवर ही भाजी अनेकांना माहितीसुद्धा नसते. परंतु पथ्यकर भाज्यांमध्ये परवर अग्रणी आहे. तोंडल्यांपेक्षा थोडी मोठी व कडक आणि उभ्या पांढऱ्या रेघा असणारी अशी ही भाजी वर्षभर सेवन करण्यास योग्य असते. 
पर्वरं पाचनं हृद्यं वृष्यं वह्निकरं लघु ।
दीपनं स्निग्धमुष्णं च कासरक्‍तत्रिदोषपहम्‌ । कृमिजिन्मदने प्रोक्‍तं वैद्यैर्विद्याविचक्षणैः ।।
 
....निघण्टु रत्नाकर 
परवर हृदयाला हितकर, शुक्रधातूसाठी पोषक व पाचक असते, पचायला हलके असते, अग्नीचे संदीपन करते, गुणाने स्निग्ध तर वीर्याने उष्ण असते, खोकला कमी करते, रक्‍तदोषात हितकर असते, कृमी नष्ट करते व तिन्ही दोषांना संतुलित ठेवते. 

पचण्यास अतिशय हलकी असणारी ही भाजी लहान मुलापासून ते ज्येष्ठ व्यक्‍तीपर्यंत सर्वांसाठी अनुकूल असते. साल काढून भाजी केली तर ती अतिशय रुचकर लागते. 

सर्दी, खोकला, तापाची लक्षणे दिसू लागली की सहसा भूक मंदावते. अशा वेळी बाकी काही न खाता फक्‍त परवर उकडून त्यावर जिरेपूड, मिरी व सैंधव टाकून खाणे औषधाप्रमाणे उपयोगी पडते. 

शुक्रधातुपोषक असल्याने गर्भधारणेपूर्वी उभयतांनी ही भाजी आहारात ठेवणे चांगले. विशेषतः तुपावर परतून घेऊन जर याची भाजी केलेली असली तर त्यामुळे धातुपुष्टी होण्यास मदत मिळते. 

वजन कमी करायचे म्हणजे उपासमार करायची असा प्रघात सध्या पडलेला दिसतो. मात्र एक तर हे कायम करता येत नाही व त्यामुळे कमी झालेले वजन लागलीच वाढते, शिवाय वजनाच्या बरोबरीने ताकद सुद्धा कमी होते. तेव्हा वजन कमी व्हावे पण ताकद कमी होऊ नये यासाठी संध्याकाळच्या जेवणात परवर, पडवळ, दुधी, यांचे एकत्रित सूप, त्यात आले, हिंग, हळद, कोकम, सैंधव, कोथिंबीर टाकून घेणे उत्तम होय. असे सूप घेतल्याने भूक भागते पण वजन कमी होण्यासही मदत मिळते. 

जंत होण्याची प्रवृत्ती असेल तर आठवड्यातून दोन वेळा परवरची भाजी आणि एकदा कारल्याची भाजी खाण्याचा उपयोग होतो. यात बरोबरीने ओवा, हळद, हिंग, कढीपत्ता वगैरे मसाल्याच्या द्रव्यांचा वापर केला तर अधिक चांगला गुण येतो. 

त्वचाविकार, विशेषतः अंगावर पित्त उटणे, खाज येणे वगैरे त्रासांवर औषधांच्या बरोबरीने पथ्य काटेकोरपणे सांभाळणे गरजेचे असते. अशा वेळी पथ्यकर भाज्यांमध्ये परवरचा समावेश करता येतो. 

आधुनिक संशोधनानुसार यात व्हिटॅमिन ए, बी१, बी२ तसेच कॅल्शियम सापडते. तसेच मॅग्नेशियम, पोटॅशियम वगैरे तत्त्वेही सापडतात. परवर नियमित सेवन करण्याने कोलेस्टेरॉलची मात्रा नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

पोट साफ होण्यासाठी परवर उपयुक्‍त असते. विशेषतः रात्रीच्या जेवणात तुपामध्ये केलेली परवरची भाजी आणि तांदळाची वा ज्वारीची भाकरी घेतली तर सकाळी पोट साफ होण्यास मदत मिळते. 

हृदयासंबंधित रोग, मधुमेह, कोलेस्टेरॉल, स्थूलता, त्वचाविकार, मूत्रपिंडाचे रोग वगैरे आधुनिक काळातील सर्वच विकारांवर परवर ही एक पथ्यकर भाजी होय. हे रोग होऊ नयेत म्हणूनही परवरचा आहारात समावेश करता येतो व रोग असताना तो बरा होण्यासाठीही ही भाजी सहायक असते. 

परवरची भाजी बनविण्याची साधी कृती 
चांगले परवर धुवून घ्यावे. साल फार कडक असली तर काढून घ्यावी. उभे बारीक काप करावेत. कढईमध्ये तूप घेऊन त्यात जिरे, हळद, हिंग, किसलेले आले, चवीनुसार तिखट टाकून फोडणी करावी. यात कापलेले परवर टाकावे. वरून सैंधव मीठ व धणे पूड मिसळावे. झाकण ठेवून त्यात पाणी ठेवून मंद आचेवर शिजवावे. नीट शिजली की काढून घ्यावी. चवीनुसार लिंबू पिळून वाढावी. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Annapaanvidhi Shakvarga article written by Dr Shri Balaji Tambe