अन्नपानविधी- शाकवर्ग

Annapaanvidhi Shakvarga
Annapaanvidhi Shakvarga

शेवग्याच्या शेंगा भाजीत किंवा आमटीत टाकण्याची पद्धत आहे. शेवग्याच्या पानांची, फुलांची भाजीही करून खाल्ली जाते. अनेक आजारांत शेवगा औषधांसारखा गुणकारी आहे. 
 
‘मोरिंगा’ या नावाने सध्या गाजत असलेले सुपर फूड म्हणजे आपल्या नित्य परिचयाचा शेवगा. शेवग्याच्या पानांची पूड करून ती नुसती खाण्याने किंवा तिचा चहा करून पिण्याने अनेकानेक फायदे मिळतात, असे आज आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेले आहे. आपण आज याच शेवग्याची आरोग्यमाहिती करून घेऊया. 

शेवग्याचे मध्यम आकाराचे झाड असते. याचे खोड ठिसूळ असते, पाने छोटी छोटी असतात. फुले पांढऱ्या रंगाची असतात. लाल रंगाच्या फुलांचाही शेवगा असतो, पण तो दुर्मीळ आहे. शेंगा एक ते दीड फूट लांबीच्या, बोटाएवढ्या जाडीच्या असतात. शेवग्याच्या कोवळ्या शेंगा भाजीसाठी किंवा आमटी-कढीमध्ये टाकण्याची पद्धत असते. जून शेंगा पित्तकर असतात, त्यामुळे त्या टाळणेच इष्ट. शेवग्याच्या कोवळ्या पानांची व फुलांची भाजी केली जाते. शरद ऋतूत तसेच पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी शेवगा खाणे टाळणे चांगले. 

शेवग्याच्या शेंगा भूक वाढविणाऱ्या असतात. तसेच तापातही हितकारक असतात. त्यामुळे तापात थोडी भूक लागू लागली, की शेवग्याच्या शेंगांची भाजी तोंडी लावायला घेणे हितकर असते. तुपामध्ये जिरे, आले, हळद यांची फोडणी करून त्यात शेवग्याच्या शेंगांचे दोन-दोन इंचांचे तुकडे टाकावेत, पुरेसे पाणी व मीठ घालून शेंगा शिजू द्याव्यात. शेंग आतून नीट शिजली की वरून मिरपूड व लिंबू पिळून खायला द्यावी. 
- शेवगा उत्तम वातशामक असतो. त्यामुळे अर्दित (तोंड वाकडे होणे), अर्धांगवायू या रोगांमध्ये मुगाच्या कढणामध्ये शेवग्याच्या शेंगा घालून बनविलेले सूप आठवड्यातून दोन-तीन वेळा घेत राहणे श्रेयस्कर असते. 
- अर्दित म्हणजे चेहरा वाकडा होणे, चेहऱ्याचे स्नायू शिथिल होणे. या तक्रारीवर शेवग्याच्या शेंगांचा काढा तोंडात धरून ठेवण्याचाही उपयोग होतो. काढा करण्यासाठी शेवग्याची एक कोवळी शेंग घेऊन तिचे छोटे तुकडे करावे. दोन ग्लास पाण्यात उकळण्यास ठेवावे. अर्धा ग्लास पाणी शिल्लक राहिले की हाताने कोळून घेऊन गाळून घ्यावे. 
- याच काढ्यात अर्धा चमचा हळद व चवीनुसार सैंधव मिसळून त्याचा गंडूष केल्याने घसा खवखवणे, दुखणे, सतत खाकरावा लागणे, अति प्रमाणात लाळ सुटणे वगैरे तक्रारींवर फायदा होतो. 
- हिवाळ्यात थंडीमुळे सांधे दुखू लागले किंवा मुका मार लागल्यामुळे अंग दुखत असेल, तर शेवग्याच्या शेंगांपासून वरीलप्रमाणे तयार केलेल्या काढ्यात पाव चमचा सुंठ पूड, पाव चमचा ओवा पूड चवीनुसार सैंधव मिसळून घेण्याने वेदना कमी होण्यास मदत मिळते. 
- स्त्रियांमध्ये पाळी उशिरा येणे, रक्‍तस्राव कमी प्रमाणात होणे, पाळी येण्याआधी किंवा पाळीदरम्यान पोट-कंबर दुखणे वगैरे तक्रारी असताना शेवग्याच्या शेंगांचा काढा करून त्यात बडीशेप व जिरेपूड मिसळून घेण्याने बरे वाटते. 
- शेवग्याच्या शेंगा जंतांवर औषधाप्रमाणे गुणकारी असतात. चेहऱ्यावर तसेच त्वचेवर पांढरट डाग पडणे, अन्न अंगी न लागणे, वारंवार सर्दी-ताप-खोकला होणे, अशक्‍तपणा जाणवणे, अशी लक्षणे असताना आहारात शेवग्याच्या शेंगा ठेवण्याचा उपयोग होतो. 
- शेवग्याच्या झाडाची पाने वाफवून त्यांचा शेक केला असता, दुखणाऱ्या सांध्यांमध्ये आराम मिळतो. 
- डोके जड होऊन दुखत असेल, सायनसमध्ये कफ साठून राहिला असेल, तर शेवग्याच्या पानांचा रस कपाळावर जिरवण्याने लागलीच बरे वाटते. 
- जखम पटकन बरी होत नसेल, उलट त्यात पू, चिकटपणा तयार होत असेल, तर शेवग्याची पाने बारीक वाटून तयार केलेली चटणी जखमेवर बांधून ठेवण्याचा उपयोग होतो. 
- शेवग्याची सालही वातशामक असते. कंबर दुखत असेल तर शेवग्याची साल कुटून तयार केलेली चटणी गरम करून दुखणाऱ्या भागावर लावून ठेवण्याने बरे वाटते. 
- शेवग्याचे बी वाळवून ठेवता येते. गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी शेवग्याचे बी वापरण्याची पद्धत आहे. 
- सांधे दुखत असतील तर शेवग्याची बी उगाळून तयार केलेले गंध गरम करून लावण्याचा उपयोग होतो. 
- शरीरावर चरबीच्या गाठी येतात, त्यावर गोमूत्रामध्ये शेवग्याची बी उगाळून तयार केलेले गंध लावण्याचा उपयोग होतो. 
- वजन कमी होण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश करणे उत्तम असते.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com