अन्नपानविधी- शाकवर्ग 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 20 December 2019

वांग्याची भाजी रुचकर लागते खरी, पण वांगे सर्वांनाच हितकर असत नाही. नित्य सेवनात तर ते नसावेच. तसेच रक्‍तदोष वा त्वचाविकार असणाऱ्यांनी त्यापासून दूरच राहावे. भोपळी मिरची, कोबी, फ्लॉवर याही भाज्या तारतम्याने खाव्यात. 

वांग्याची भाजी रुचकर लागते खरी, पण वांगे सर्वांनाच हितकर असत नाही. नित्य सेवनात तर ते नसावेच. तसेच रक्‍तदोष वा त्वचाविकार असणाऱ्यांनी त्यापासून दूरच राहावे. भोपळी मिरची, कोबी, फ्लॉवर याही भाज्या तारतम्याने खाव्यात. 

आता आपण अशा काही भाज्यांची माहिती करून घेणार आहोत, ज्या युक्‍तिपूर्वक, प्रकृतीचा विचार करून व उचित प्रमाणात सेवन करण्याजोग्या असतात. दुधी, कोहळा, परवर, पडवळ वगैरे फळभाज्या ज्याप्रमाणे सर्वांना अनुकूल व पथ्यकर असतात, तशा या नसतात. उदा. वांगे. वांग्याच्या बऱ्याच जाती आहेत. वांग्याची भाजी रुचकर लागते, त्यामुळे ती लोकप्रिय असते. मात्र सरसकट सर्वांना वांगे हितकर असतेच असे नाही. 
 

वांगे 
वृन्ताकं स्वादु तीक्ष्णोष्णं पाके कटु च दीपनम्‌।अपित्तलं लघु क्षारं शुक्रलं ज्वरनाशनम्‌।। 

...निघण्टु रत्नाकर 
वांगे चवीला गोड, स्वादिष्ट असले तरी गुणाने तीक्ष्ण असते, वीर्याने उष्ण असते, तसेच विपाकाने तिखट असते. पचायला हलके असले तरी क्षारयुक्‍त असते. थोड्या प्रमाणात खाल्ले तर पित्तकर नसते, शुक्रप्रवर्तक असते. 
वांगे तीक्ष्ण, उष्ण व विपाकाने तिखट असल्याने रक्‍तदोष वा त्वचाविकार असणाऱ्यांसाठी अपथ्यकर असते असा वृद्धवैद्याधार आहे. 

वांगे नित्य सेवनात नसावेच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे पिकलेले वांगे खाऊ नये. कोवळे वांगेच खाण्यासाठी वापरावे. पांढरे वांगे मूळव्याधीवर गुणकारी असते. त्यातल्या त्यात वांगे भाजून खाल्ले, तर कफ-वातशामक असते, पचण्यास हलके होते. 

भूक लागत नसेल, तोंडाला चव नसेल, शरीरात जडपणा जाणवत असेल तर कोवळे वांगे भाजून, वरची साल काढून टाकून त्यात थोडी मिरपूड व चवीपुरते सैंधव टाकून बनविलेले भरीत व भाकरी खाण्याने बरे वाटते. 

वांगे झोप येण्यास मदत करते. कोवळे मोठे वांगे निखाऱ्यावर भाजून मधात मिसळून रात्रीच्या जेवणात घेतले तर झोप चांगली लागते. वांग्याच्या झाडाची पाने धुवून त्यांचा रस काढावा. चमचाभर रस खडीसाखर मिसळून घेण्यानेही झोप चांगली लागते. 

यकृताची किंवा प्लीहेची वृद्धी झालेली असताना पांढरे वांगे भाजून लेप तयार करावा व सोसवण्याइतपत गरम असताना वरून बांधावा. असे काही दिवस नियमित करण्याने आराम वाटतो. 

गंडमाळा म्हणजे गळ्याभोवतीच्या ग्रंथी सुजणे, यावर वांग्याच्या झाडाचे मूळ उगाळून केलेला लेप गरम करून त्याचा दाट लेप लावण्याने गुण येतो. 

शरीरावर कुठेही गळू झाले असेल तर ते लवकर पिकण्यासाठी वांगे भाजून तयार केलेले पोटीस बांधून ठेवण्याचा उपयोग होतो. 

भोपळी मिरची 
जगभरात उपलब्ध असणारी ढोबळी किंवा भोपळी मिरची म्हणून ओळखली जाणारी भाजी पित्तकर असते, तसेच वातवृद्धीसुद्धा करते. डोकेदुखी, उलटी, आम्लपित्त, पोटात वायू धरून पोट डब्ब होणे, वारंवार पोट दुखणे वगैरे तक्रारीमध्ये भोपळी मिरची अपथ्यकर असते. इतरांनी हिवाळ्यात व वसंत ऋतूत तारतम्याने ही भाजी खाता येते. 

वसंत ऋतूत म्हणजे थंडी संपून गरम होण्यास सुरुवात झाली की, ज्यांना हमखास सर्दी-खोकला होतो, त्यांच्यासाठी अगोदरच्या शिशिर ऋतूत व वसंत ऋतूत ही भाजी आठवड्यातून एखाद्या वेळी खाण्यास योग्य असते. 

जंत होण्याची सवय असेल, वजन खूप वाढलेले असेल, शरीरात उष्णता जाणवत असेल त्यांनी आठवड्यातून एकदा ढोबळी मिरचीची भाजी खाणे चांगले. 

कोबी-फ्लॉवर 
कोबी-फ्लॉवर या दोन्ही भाज्या मूळच्या भारतातील नव्हेत. तसेच त्या जमिनीवर गड्ड्याच्या रूपात तयार होत असल्याने जमिनीतील रासायनिक खते, कीटकनाशके सर्वाधिक प्रमाणात शोषून घेणाऱ्या असतात. या भाज्या खाल्ल्याने पोटात वायू धरतो, असेही दिसते. मूत्रवहसंस्थेवरही याचे दुष्परिणाम होतात. तेव्हा क्वचित कधीतरी, त्यातही सेंद्रिय पद्धतीने जोपासलेले कोबी-फ्लॉवर खाल्ल्यास चालू शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Annapaanvidhi Shakvarga article written by Dr Shri Balaji Tambe