अन्नपानविधी - शाकवर्ग 

Annapaanvidhi Shakvarga
Annapaanvidhi Shakvarga

वेलीवर वाढणाऱ्या फळभाज्यांच्या मानाने पालेभाज्यांची उपयुक्‍तता कमी असते, त्यामुळे फळभाज्यांवर अधिक भर देणे श्रेयस्कर. पालेभाज्या खाण्यापूर्वी त्या चांगल्या पाण्यावर पोसलेल्या आहेत, सेंद्रिय पद्धतीने जोपासलेल्या आहेत, याची खात्री करणे अनिवार्य ठरते. पालेभाज्या ताज्याच वापरणे, नीट धुऊन घेणे व शिजवूनच सेवन करणे आवश्‍यक आहे. 

आत्तापर्यंत आपण फळभाज्यांची माहिती घेतली. आता पालेभाज्यांबद्दल जाणून घेऊया. आयुर्वेदात फळभाज्या, विशेषतः वेलीवर वाढणाऱ्या फळभाज्या अधिक प्रशस्त व पथ्यकर समजल्या जातात. त्यामानाने पालेभाज्यांची उपयुक्‍तता कमी असते. त्यामुळे आहारयोजना करताना फळभाज्यांवर अधिक भर देणे श्रेयस्कर होय. पालेभाज्या खाण्यापूर्वी त्या चांगल्या पाण्यावर पोसलेल्या आहेत, सेंद्रिय पद्धतीने जोपासलेल्या आहेत, याची खात्री करणे सध्या अनिवार्य होय. पालेभाज्या ताज्याच वापरणे, नीट धुऊन घेणे व शिजवूनच सेवन करणे आवश्‍यक होय. 
आज आपण चाकवत या पालेभाजीची माहिती घेणार आहोत. चाकवत महाराष्ट्रात तर आवडीने खाल्ली जातेच; पण भारतात सर्वत्र परिचयाची असते. पालेभाज्यांमध्ये चाकवत श्रेष्ठ समजली जाते. याची पाने कोवळी व लहानशी असतात. ही साधारणपणे हातभर उंच वाढते. 

वास्तुकं मधुरं शीतं क्षारं रुचिकरं सरम्‌ । 
पाचकं मलमूत्राणां शोधकं चाग्निदीपनम्‌ ।। 
लघु शुक्रप्रदं बल्यं हृद्यं त ज्वरनाशनम्‌ । 
त्रिदोषार्शः कृमिप्लीहारक्‍तरुक्‌ कुष्ठपित्तनुत्‌ ।
उदावर्तं भवं वातं नाशयेत्‌ इति कीर्तितम्‌ ।। 

...निघण्टु रत्नाकर 
चाकवत चवीला गोड, थोडा क्षारयुक्‍त व चविष्ट असतो, वीर्याने थंड असतो, सारक असतो, अग्नी संदीपन करतो, तसेच पचनासही मदत करतो, पचायला हलका असतो, मल-मूत्र प्रवर्तन सहजपणे होण्यास मदत करतो, ताकद वाढवतो, हृदयासाठी हितकर असतो. वात, जंत, प्लीहावृद्धी, रक्‍तविकार, त्वचाविकार, मूळव्याध यात हितावह असतो. चाकवत पित्ताचे शमन करतो, गती बिघडलेल्या वातालाही सुधारतो. 

चाकवताच्या पानांमध्ये एक विशेष गुण असा, की एखाद्या वेळी कडधान्य किंवा धान्य पटकन शिजत नसले तर त्यात चाकवताची थोडी पाने टाकली तर ते लवकर व नीट शिजते. 

भाजल्यामुळे त्वचेचा दाह होत असेल तर त्यावर चाकवताच्या पानांचा रस काढून लावला की बरे वाटते. 

मलबद्धतेची प्रवृत्ती असणाऱ्यांनी रात्रीच्या जेवणात चाकवताची भाजी किंवा सूप समाविष्ट करणे फायद्याचे असते. 

मूळव्याधीचा त्रास असल्यास, शौचावाटे रक्‍त पडत असल्यास चाकवताची ताकात केलेली पातळ भाजी आहारात घेण्याचा उपयोग होतो. या भाजीत तिखट, हिंग, लसूण वगैरे तीक्ष्ण द्रव्ये टाकणे टाळावे. 

आतड्यांची अन्नातील सत्त्वांश शोषण्याची क्षमता कमी झाली तर अन्न अंगी लागेनासे होते, हळूहळू वजन कमी होत जाते. अशा वेळी चाकवताच्या भाजीचा आहारात समावेश करणे चांगले होय. 

अपचन, वारंवार पोटात वायू धरणे, पोट दुखणे वगैरे तक्रारींमध्ये चाकवताचे सूप करून, त्याला लसणाची फोडणी देऊन भूक असेल तितक्‍या प्रमाणात घेण्याचा उपयोग होतो. 

यकृतासंबंधी काही विकार असला, नुकतीच कावीळ होऊन गेलेली असली, तर चाकवताची भाजी पथ्यकर समजावी. रासायनिक औषधांमुळे किंवा अतिताण, अतिचिडचिड यामुळे यकृताला अतिउत्तेजना मिळू शकते. परिणामी पोटात जळजळ जाणवते, उष्णता वाढते. अशा वेळी चाकवताची भाजी खाणे चांगले. 

चाकवत कृमिनाशक असल्याने जंत होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी हळद, हिंग, ओवा, लसूण टाकून केलेली भाजी खाण्याचा उपयोग होतो. 
चाकवतामध्ये लघवी साफ करण्याचा गुणधर्म असल्याने लघवी कमी होत असेल; जळजळ, वेदना वगैरे त्रास असतील तर चाकवताचे सूप, त्यात धणेपूड, जिरेपूड मिसळून घेण्याचा उपयोग होतो. 

भूक लागत नसेल, पोट साफ होत नसेल, अंगात जडपणा, आळस जाणवत असेल, तर काही दिवस सूर्यास्तानंतर दुसरे काही न खाता फक्‍त चाकवताचे सूप आले, लिंबू, जिरे, चवीनुसार सैंधव घालून, गरम गरम घेतले तर लवकरच बरे वाटू लागते. 

औषध म्हणून चाकवताची भाजी किंवा सूप करायचे असेल तर त्यात मसाले, बेसन, शेंगदाणे वगैरे टाकणे टाळावे. सूप करताना दाटपणा आणण्यासाठी मुगाची डाळ वापरायला हरकत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com