अन्नपानविधी- शाकवर्ग 

Annapaanvidhi Shakvarga
Annapaanvidhi Shakvarga

चवळईचा सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे ती विषाचा नाश करण्यात श्रेष्ठ आहे. कोणतेही विष पोटात गेले तर ही भाजी खाणे हितावह असते. सध्या हवेतील प्रदूषण, पाण्यातील दोष यामुळे शरीरात जाणाऱ्या विषतत्त्वांचा वेळीच निचरा होण्यासाठी चवळई आहारात समाविष्ट करणे किंवा तिच्या पानांचा रस काढून तो तुपासह घेणे चांगले असते. 
 

मागच्या वेळी आपण चाकवत या पथ्यकर पालेभाजीची माहिती घेतली. अजून एक पथ्यकर भाजी म्हणजे तांदुळजा. याला काही जण चवळई वा चवळीची भाजी असेही म्हणतात. मात्र चवळी या कडधान्याशी तिचा काही संबंध नसतो. औषधातही तांदुळजा ही भाजी बऱ्याच प्रमाणात वापरली जाते. 
तांदुळजा बाराही महिने उगवता येतो. हिची पाने लहान लहान असतात आणि उंचीने ती दोन-तीन वीत इतकीच वाढते. 


तांदुळजा - चवळई 
तण्डुलीयो लघुः शीतो रुक्षः पित्तकफास्रजित्‌ । 
सृष्टमूत्रमलो रुच्यो दीपनो विषहारकः ।। 

...भावप्रकाश 
तांदुळजा पचायला हलका, वीर्याने थंड व रुचकर असतो. पित्तदोष, कफदोष व रक्‍तदोषात हितकर असतो, मलमूत्रप्रवर्तनास मदत करतो, अग्नी प्रदीप्त करतो व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विषाचा नाश करतो. 
तांदुळजा ज्वरघ्न म्हणजे ताप कमी करणारा आहे. तसेच अग्नी प्रदीप्त करणाराही आहे. त्यामुळे ताप आलेला असताना तांदुळजाची भाजी खाण्याने ताप कमी होतो, भूक सुधारते, तोंडाला चव येण्यास मदत मिळते. 

तांदुळजा सारक म्हणजे पोट साफ होण्यास मदत करणारा आणि अतिसारनाशक म्हणजे जुलाब होत असल्यास थांबवणारा असतो.थोडक्‍यात पोट साफ व्हावे यासाठी तांदुळजाची भाजी उत्तम होय. 

तांदुळजाचा सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे ती विषाचा नाश करण्यात श्रेष्ठ आहे. कोणतेही विष पोटात गेले तर तांदुळजाची भाजी खाणे हितावह असते. सध्या हवेतील प्रदूषण, पाण्यातील दोष यामुळे शरीरात जाणाऱ्या विषतत्त्वांचा वेळीच निचरा होण्यासाठी तांदुळजा आहारात समाविष्ट करणे किंवा तांदुळजाच्या पानांचा रस काढून तो तुपासह घेणे चांगले असते. 

तांदुळजा लघवी साफ होण्यास मदत करणारी आहे. लघवी कमी होत असली किंवा अडखळत होत असली तर तांदुळजाची भाजी-भाकरी खाण्याचा किंवा तांदुळजा भाजीचे सूप करून त्यात धण्याची पूड मिसळून घेण्याचा उपयोग होतो. 

भाजल्यामुळे जखम झाली असेल तर त्यावर तांदुळजाचा रस नुसता लावण्याचा किंवा तांदुळजाच्या रसात हळकुंड उगाळून लावण्याचा उपयोग होतो. यामुळे दाह शांत होतो, तसेच जखम लवकर भरून येते. 

तांदुळजाचे मूळ गर्भाशयावर औषधाप्रमाणे उपयोगी असते. विशेषतः गर्भाशयातील उष्णता कमी होण्यासाठी तांदुळजाचे मूळ तांदुळजाच्या धुवणात उगाळून तयार केलेली पेस्ट रोज एक चमचा या प्रमाणात घेण्याचा उत्तम फायदा होतो. मासिक पाळी अलीकडे येणे, अंगावरून जास्त प्रमाणात व जास्त दिवस जाणे, अधून मधून काळपट जाणे या सर्व तक्रारींवरही ही पेस्ट घेणे हितावह असते. 
गर्भारपणात रक्‍तस्राव होतो त्यावरही तांदुळजाचे मूळ तांदळाच्या धुवणात वाटून तयार केलेली चटणी एक-एक चमचा प्रमाणात दिवसातून दोन-तीन वेळा घेता येते. 

विषारी प्राणी चावला असता त्याचे विष शरीराबाहेर निघून जावे यासाठी तांदुळजा उपयोगी असतो. म्हणून विंचू, उंदीर, गांधीलमाशी, मधमाशी वगैरेंच्या दंशावर तांदुळजाच्या मुळाची रस काढून तो तूप-साखरेसह काही दिवस घेणे चांगले असते. या दरम्यान अधून मधून तांदुळजाची भाजी आहारात होणे हे सुद्धा चांगले. 

तांदुळजाची भाजी थंड असते त्यामुळे हातापायांची जळजळ, लघवीला दाह, डोळे लाल होणे वगैरे तक्रारींवर तांदुळजाचा दोन-तीन चमचे रस, खडीसाखर व तूप मिसळून घेण्याचा उपयोग होतो. 

अंगावर पित्ताच्या गांधी उठत असल्या, पित्तामुळे पुळ्या येत असल्या, खाज येत असली तर त्यावर मसुराचे पीठ, ज्येष्ठमध, अनंतमूळ, वाळा यापैकी मिळतील ती द्रव्ये समभाग एकत्र करून ठेवावीत. स्नानाच्या वेळी मिश्रणातील दोन चमचे चूर्ण तांदुळजाच्या रसात मिसळावे व साबणाच्या ऐवजी वापरावे. 

अँटिबायॉटिक, स्टिरॉइडस्‌, वेदनाशामक गोळ्या घेण्याची गरज न पडणे सर्वोत्तम, मात्र काही अपरिहार्य कारणाने अशी तीव्र औषधे घ्यावी लागली असतील तर ती घेताना तांदुळजाच्या भाजीचा आहारात समावेश करणे आणि औषध घेऊन झाल्यावर रोज दोन-तीन चमचे प्रमाणात तांदुळजाच्या पानांचा रस त्यात खडीसाखर मिसळून घेणे उत्तम होय.

जितके दिवस औषधे घेतली असतील त्याच्या दुप्पट दिवसांपर्यंत हा रस घेणे चांगले होय. तांदुळजाची भाजी तेलात करू नये असा वृद्ध वैद्यादेश आहे. तुपामध्ये जिरे घालून त्यात कापलेली भाजी परतून वरून सैंधव, मिरे, आले वगैरे टाकून भाजी बनवावी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com