अन्नपानविधी- शाकवर्ग 

Annapaanvidhi Shakvarga
Annapaanvidhi Shakvarga

माठ आणि शेपू या दोन्ही भाज्या आपल्या आहारात समाविष्ट असायला हव्यात. विशेषतः ज्यांना सतत प्रवास करावा लागतो, जागरणे होतात, खाण्यात सतत बदल होतात त्यांनी पांढऱ्या माठाचा रस घ्यावा. मात्र, पित्ताचा त्रास असलेल्यांनी आणि गर्भवतींनी शेपू टाळावा. 

मागच्या वेळी आपण तांदुळजा या पालेभाजीची माहिती घेतली. आता माठ व शेपू या भाजीचे गुणधर्म पाहू या. 

माठ
माठ दोन प्रकारचा असतो. एक पांढरा व दुसरा लाल. भाजीसाठी दोन्ही प्रकार वापरले जातात. माठाची भाजी शेतात लावली की तीन आठवड्यात तयार होते व खाण्यासाठी वापरता येते. 

मारिषो मधुरः शीतः विष्टम्भी पित्तनुत्‌ गुरुः ।वातश्‍लेष्मकरो रक्‍तपित्तनुत्‌ विषमाग्निजित्‌ 
...भावप्रकाश 
माठ चवीला गोड व वीर्याने थंड असतो, त्यामुळे पित्ताचे शमन करतो. मात्र पचायला थोडा जड असल्याने विष्टंभकर असतो. वात तसेच कफदोष वाढवतो, रक्‍तदोषात, रक्‍तपित्तासारख्या रक्‍तस्राव होणाऱ्या विकारात हितावह असतो. 


रक्‍तर्माषो गुरुर्नाति सक्षारो मधुरः सरः । 
श्‍लेष्मलः कटुकः पाके स्वल्पदोष उदीरितः ।। 

लाल रंगाचा माठ पचायला जरा जड असतो, पण सारक असतो. लाल माठात थोडे क्षाराचे प्रमाण असते, त्याचा विपाकही तिखट असतो. तसेच तो कफदोष वाढविणारा असतो, म्हणूनच थोड्या प्रमाणात दोषकारक समजला जातो. 

- माठाची भाजी पोट साफ होण्यास मदत करणारी असते. त्यामुळे पोटात वायू होणे, शौचाला कडक होणे, गाठी पडणे वगैरे त्रासांवर काही दिवस रात्रीच्या जेवणात माठाची भाजी समाविष्ट करण्याचा उपयोग होतो. 
- सतत प्रवास, त्यामुळे जागरणे, खाण्यात बदल यामुळे यकृताची कार्यक्षमता कमी होते, लघवी साफ होत नाही, शौचालाही पूर्णपणे होत नाही. अशा वेळी पांढऱ्या माठाचा रस दोन-तीन चमचे, त्यात धणे-जिऱ्याची पूड मिसळून घेण्याचा फायदा होतो. 
- लघवीला जळजळ, लघवी करण्यासाठी वेळ लागणे, वारंवार लघवीचा भावना होणे यावर पांढऱ्या माठाचा रस त्यात धणे पूड, जिरे पूड आणि खडीसाखर मिसळून घेण्याने बरे वाटते. सदर रस दिवसातून दोन वेळा दोन-तीन चमचे या प्रमाणात घेता येतो. 
- फार दिवस ‘केमिकल’ औषधे घ्यावी लागली असल्यास त्याचे विषार शरीरात राहू नयेत यासाठी माठाची उकडून केलेली भाजी आहारात ठेवण्याचा उपयोग होतो. यात चवीनुसार खोडी हळद, आले, सैंधव टाकता येते, मात्र फोडणी देऊ नये. 
- मलप्रवृत्ती कडक झाल्याने मूळव्याधीतून रक्‍त पडते, त्यावर पाणथळ जागेत वाढलेला माठ उपयोगी पडतो. माठाचे सूप करून त्यात तूप टाकून घेण्याचा फायदा होतो. 
- शरीरावर गळू झाले असेल तर ते लवकर पिकण्यासाठी व फुटण्यासाठी माठाच्या पानांच्या चटणीत हळद, मीठ मिसळून तयार केलेले पोटीस वरून लावण्याचा उपयोग होतो. 

शेपू 
शेपूची भाजी तिच्या उग्र गंधामुळे फारशी आवडीने खाल्ली जात नाही. बाळंतशोपा म्हणजे शेपूला येणारे फळ होय. शेपू पित्तकर असतो, त्यामुळे गर्भवतीने तो खाणे टाळणे चांगले. तसेच शरद ऋतूत, ऐन उन्हाळ्यात तसेच पित्ताच्या विकार असणाऱ्यांनी शेपू खाणे टाळणे चांगले. 
- भाजी करण्यासाठी शेपूची कोवळी पाने वापरणे चांगले. चांगल्या पाण्यावर पोसली असेल तर शेपूची कोवळी पाने नुसती किंवा कच्ची खाल्ली तरी चालतात. 
- जिभेवर पांढरा थर जमणे, तोंडात चिकटपणा जाणवणे, चव नीट न समजणे वगैरे तक्रारींवर शेपूचा कोवळा पाला चावून सुचलेली लाळ थुंकून देण्याचा उपयोग होतो. 
- अग्नी मंदावल्यामुळे पचनक्षमता कमी झाल्यामुळे जुलाब होत असतील तर शेपूची उकडलेली भाजी खाण्याचा उपयोग होतो. 
- बाळंतिणीने बाळंतशोप खावी तसेच शेपूची भाजीही खावी. यामुळे रक्‍तस्राव कमी होण्यास व स्तन्य व्यवस्थित होण्यास मदत मिळते. 
- अशक्‍तपणामुळे पाळी येत नसेल, ओटीपोटात दुखून पाळी येईल असे वाटूनही पाळी येत नसेल तर शेपूच्या पानांचे सूप त्यात जिरे, सैंधव, मिसळून काही दिवस नियमित घेण्याने बरे वाटते. 
- लहान बाळ अकारण रडत असेल, अस्वस्थ राहात असेल, नीट झोपत नसेल तर बाळाला शेपूची पाने टाकून उकळलेले पाणी थोडे-थोडे पाजण्याचा उपयोग होतो. कपभर पाण्यात दोन-तीन शेपूच्या काड्यांची कोवळी पाने पाच मिनिटांसाठी उकळून गाळून घेतलेले पाणी एक-एक चमचा या प्रमाणात बाळाला पाजता येते. 
- संधिवात किंवा मार लागल्यामुळे दुखत असलेल्या ठिकाणी शेपूच्या वाफावलेल्या पानांचा लेप लावून ठेवण्याचा उपयोग होतो. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com