अन्नपानविधी- शाकवर्ग 

Annapaanvidhi Shakvarga
Annapaanvidhi Shakvarga

कोणतीही पालेभाजी कोवळी आणि ताजी असावी. मोठी, निबर पाने असलेली पालेभाजी आरोग्याच्या दृष्टीने टाळणे इष्ट. पालेभाज्या चांगल्या पाण्यावर पोसल्या गेल्या आहेत, सेंद्रिय पद्धतीने आणि देशी बियाणे वापरून उगवलेल्या आहेत याची खात्री करून घेऊन वापराव्या. 
 

सध्या आपण पालेभाज्यांचे औषधी उपयोग पाहतो आहोत. आयुर्वेदाने पालेभाज्यांपेक्षा फळभाज्यांची अधिक प्रशस्ती केलेली आहे. त्यामुळे रोजच्या आहारात प्रकृतीनुरूप फळभाज्या आणि अधूनमधून पालेभाज्या, त्याही चांगल्या पाण्यावर पोसल्या गेल्या आहेत, सेंद्रिय पद्धतीने आणि देशी बियाणे वापरून उगवलेल्या आहेत याची खात्री करून घेऊन वापराव्या. कोणतीही पालेभाजी कोवळी आणि ताजी असावी. मोठी, निबर पाने असलेली पालेभाजी आरोग्याच्या दृष्टीने टाळणे इष्ट. आज आपण मेथी या भाजीचे गुणधर्म पाहणार आहोत. 

मेथीची भाजी दीड ते दोन वीत उंच असते. कोवळ्या पानांची आणि छान हिरव्या रंगाची मेथीची भाजी विकत घेणे चांगले. मेथीची भाजी रुचकर व पथ्यकर समजली जाते. 
मेथिका वातशमनी श्‍लेष्मघ्नी ज्वरनाशिनी । 
मेथ्या योग्य प्रमाणात सेवन केल्यास वातशामक असतात, कफदोष कमी करतात, तसेच तापही दूर करतात; मात्र अतिप्रमाणात सेवन केल्यास शुक्रधातू कमी करतात. 
भूक लागत नाही, पोटात वायू होतो. तोंडाला रुची वाटत नाही अशा वेळी मेथीची हरभऱ्याचे पीठ वगैरे न लावता केलेली भाजी खाण्याचा उपयोग होतो. 

आव पडणे, मलप्रवृत्ती नीट बांधून न होणे, फेसकट पांढऱ्या रंगाची मलप्रवृत्ती होणे वगैरे तक्रारींवर मेथीच्या पानांचा रस दोन चमचे, त्यात चवीनुसार खडीसाखर व जिऱ्याची पूड मिसळून जेवणाच्या सुरुवातीला किंवा मध्ये घेण्याने बरे वाटते. 

अंगात फार दिवस कसकस वाटत असेल तर मेथीची भाजी व भाकरी खाण्याचा वृद्धवैद्यादेश आहे. बरोबरीने तापावरची औषधे घ्यायची असतात. खोकला असताना मेथीची भाजी खाल्ल्यास तो वाढत नाही, उलट कमी होतो. वरचेवर सर्दी-खोकला, भूक न लागणे, शरीरात जडपणा वाटणे वगैरे तक्रारींवर मेथीची भाजी, लसणाची फोडणी देऊन घेण्याचा उपयोग होतो. 

जेवण झाल्यावर आळस येणे, काम करण्यात लक्ष केंद्रित न होणे, डोळ्यांवर झापड येणे वगैरे तक्रारींवर भूक लागेल तेव्हा मेथीच्या भाजीचे लसूण, आले वगैरे लावून तयार केलेले सूप घेण्याचा, एरवी फक्‍त कोमट पाणी पिण्याचा उत्तम उपयोग होताना दिसतो. 

वारंवार लघवीला जावे लागत असेल, विशेषतः रात्री लघवीमुळे बऱ्याच वेळा झोपमोड होत असेल, तर रात्री झोपताना मेथीच्या पानांचा रस दोन चमचे, त्यात दोन चिमूट काथ व चवीनुसार खडीसाखर मिसळून घेण्याचा उपयोग होतो. 

उन्हाच्या झळा लागल्यामुळे लघवीच्या ठिकाणी दाह होतो, डोके दुखते, अस्वस्थ वाटते, त्यावर वाळवून ठेवलेली मेथीची भाजी थंड पाण्यात अर्ध्या-एक तासासाठी भिजत ठेवावी, चांगली भिजली की हाताने कोळून घेऊन गाळून घ्यावे. या पाण्यात मध मिसळून घ्यावे. यामुळे ऊन लागल्याने होणारे त्रास लगेच कमी होतात. 

मेथीची पाने वाटून तयार केलेला लेप हा चरबी कमी करणारा असतो. चरबीच्या गाठीवर किंवा शरीरावर कुठेही वाढलेला मेद कमी करायचा असेल तर त्या ठिकाणी मेथीच्या पानांचा लेप 30-40 मिनिटांसाठी लावून ठेवण्याचा उपयोग होतो. 

चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी करण्यासाठी मेथीच्या पानांचा रस चेहऱ्यावर चोळण्याचा उपयोग होतो. 

मेथी उष्ण वीर्याची असते, त्यामुळे पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी, म्हणजे जळजळ, उलटी, डोकेदुखी, नागीण, नाकातून रक्‍त येणे वगैरे उष्णतेचे त्रास असणाऱ्यांनी मेथीची भाजी जपून सेवन करणे चांगले. 

मधुमेह असला की सध्या मेथीची भाजी खाण्याचा प्रघात पडलेला दिसतो; पण मेथीचा अतिरेक न करणेच चांगले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com