अन्नपानविधी- शाकवर्ग 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 24 January 2020

आंबट चुका आंबट चवीचा व उष्ण वीर्याचा असल्याने काही प्रमाणात पित्त वाढवतो. अन्नाचे पचन व शोषण योग्य प्रकारे होत नसताना चुक्‍याची भाजी आहारात ठेवणे चांगले असते, मात्र पित्तदोषाचा संबंध असताना किंवा आम्लपित्ताचा त्रास होणाऱ्यांनी ही भाजी जपून वापरावी. 
 
मागच्या वेळी आपण मेथी या भाजीचे औषधी गुणधर्म पाहिले. आज आंबट चुका या भाजीचा आहारात कधी व कसा समावेश करता येतो याची माहिती घेऊया. 

आंबट चुका कुंडीत सुद्धा लावता येतो. वरची पाने खुडून वापरली तरी पुन्हा पुन्हा फुटत राहतो. जाता येता दोन-तीन पाने खाल्ली तरी चवदार लागतात. आंबट चुका वर्षभर मिळू शकतो. संस्कृतमध्ये हिला ‘चुक्रा’ असे म्हणतात. ‘चांगेरी’ नावाची एक औषधी वनस्पती आयुर्वेदात सांगितलेली आहे, तिच्याशी आंबट चुक्‍याचे गुणधर्म खूप मिळते जुळते आहेत. 

चुक्रा त्वम्लतरा स्वाद्वी वातघ्नी कफपित्तकृत्‌ ।
रुच्या लघुतरा पाके वृन्ताकेनातिरोचनी ।। 

...भावप्रकाश 
आंबट पानांची ही भाजी स्वादिष्ट असते, वातशामक असते, मात्र कफपित्तकारक असते, पचायला हलकी असते व वांग्याच्या भाजीसह खाल्ल्यास खूप रुचकर असते. 

आंबट चुका अनुलोमक म्हणजे वायू सरण्यास मदत करणारा व शूलनाशक असल्याने पोटात वायू धरला असला, जडपणा जाणवत असला, पोटात दुखत असले, काही खायची इच्छा होत नसली तर आंबट चुक्‍याचा रस दोन-तीन चमचे, त्यात गूळ मिसळून घेण्याचा उपयोग होतो. 

माकडहाड किंवा त्याच्याही खाली वेदना होत असल्या, कंबर-पाठ दुखत असली, सायटिकामुळे वेदना होत असल्या तर आंबट चुक्‍याची भाजी हितकर असते. मुगाच्या डाळीबरोबर आंबट चुक्‍याचे सूप करून घेतले तर वायूचे शमन होऊन हे सर्व त्रास कमी होण्यास मुख्य उपचाराला हातभार लागतो. 
ज्या मूळव्याधीत रक्‍त पडत नाही; पण त्या ठिकाणी वेदना होतात, मलप्रवृत्ती फार घट्ट, कडक होण्याची प्रवृत्ती असते त्याच्यासाठी आठवड्यातून दोन-तीन वेळा आंबट चुक्‍याची भाजी खाणे, जेवणानंतर ताज्या ताकात दोन-तीन चमचे आंबट चुक्‍याचा रस, पाव चमचा जिरे पूड व चवीनुसार सैंधव मीठ मिसळून घेण्याचा फायदा होतो. 

अन्न अंगी लागत नाही असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा सहसा लहान आतड्याची शोषणशक्‍ती कमी पडत असते. याकडे दुर्लक्ष झाले तर हळूहळू भसर, चिकट मलप्रवृत्ती होणे, आव पडणे, फेस पडणे असे त्रास सुरू होतात. यावर आंबट चुका व मुगाची डाळ यांचे सूप करून घेण्याचा फायदा होतो. 

अरुची म्हणजे तोंडाला चव नसणे, अनेक मोठ्या विकारांमध्ये किंवा केमोथेरपीसारखे उपचार घेताना हे एक मुख्य व फार त्रासदायक लक्षण असते. यावर आंबट चुक्‍याच्या रसाच्या गुळण्या करण्याचा फायदा होतो. तोंडातील चिकटपणा अथवा जडपणा सुद्धा कमी होतो. 
अनेक त्वचाविकारांत खाज हे मुख्य लक्षण असते. कधी कधी खाज इतकी तीव्र असते की त्यामुळे रक्‍त येऊ लागते. अशा त्वचाविकारांत आंबट चुक्‍याची पाने चोळून लावण्याने खाज कमी होते. बरोबरीने त्वचाविकारावर योग्य औषधोपचार घेणे चांगले. 

गांधीलमाशी वा मधमाशी चावली तर त्यावर आंबट चुक्‍याच्या पानाचा रस चोळून लावण्याचा उपयोग होतो. 

मूळव्याधीचे मोड बाहेरून जाणवत असले व त्या ठिकाणी वेदना होत असल्या तर आंबट चुक्‍याची पाने वाफवून तयार केलेल्या पोटलीचा शेक करण्याने दुखणे कमी होते. 
आंबट चुका आंबट चवीचा व उष्ण वीर्याचा असल्याने काही प्रमाणात पित्त वाढवतो. अन्नाचे पचन व शोषण योग्य प्रकारे होत नसताना चुक्‍याची भाजी आहारात ठेवणे चांगले असते, मात्र पित्तदोषाचा संबंध असताना किंवा आम्लपित्ताचा त्रास होणाऱ्यांनी ही भाजी जपून वापरावी.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Annapaanvidhi Shakvarga article written by Dr Shri Balaji Tambe