अन्नपानविधी- शाकवर्ग 

Annapaanvidhi Shakvarga
Annapaanvidhi Shakvarga

औषधी उपयोग पाहता पानओव्याचे झाड कुंडी, परसबागेत लावणे चांगले होय. शरीरावरची चरबी कमी करण्यासाठी करडईच्या पानांचा रस शरीरावर चोळून, नंतर स्नान करण्याचा फायदा होतो. फॅटी लिव्हरचे निदान झालेले असल्यास अंबाडीची भाजी अधून मधून आहारात समाविष्ट करणे चांगले. 


पानओवा म्हणून एक छोटे झुडूप असते. याची पाने गोलाकार, मांसल अशी असतात. या पानांना ओव्याचा वास येतो म्हणून या झुडपाला पानओवा असे म्हणतात. याच्या पानांची भजी सुरेख लागतात. काही प्रांतांमध्ये याची भाजीसुद्धा केली जाते. याचे औषधी उपयोग पाहता पानओव्याचे झाड कुंडी, परसबागेत लावणे चांगले होय. याची छोटी फांदी पावसाळ्यात जमिनीत लावली तर त्यापासून बघता बघता नवीन झाड तयार होते. 

गुदभागी कंड येणे, त्या ठिकाणी कायम ओलसरपणा जाणवणे, भूक कधी लागणे कधी न लागणे ही लक्षणे पोटात जंत असल्याचे होत. यावर पानओव्याच्या पानांचा रस घेण्याचा उपयोग होतो. दोन चमचे रसात दोन चिमूट हळद, दोन चमचे धणे, चवीनुसार काळे मीठ मिसळून घेणे चांगले. 

जेवणानंतर पोटात जडपणा जाणवणे, डोळ्यांवर झापड येणे, ढेकर येत राहणे, छातीत अस्वस्थ वाटत राहणे वगैरे तक्रारींवर जेवणानंतर पानओव्याची दोन पाने चावून खाण्याने बरे वाटते. 

भूक लागत नसली, तोंडाला चव नसली तर जेवणाच्या सुरुवातीला पानओवा, कडुनिंब, आले, काळी मिरी, लिंबू, सैंधव एकत्र करून बनविलेली चटणी अर्धा चमचा प्रमाणात खाण्याने व जेवतानाही अधून मधून खाण्याने लगेच गुण येतो. 

जिभेवर पांढरा थर साठणे, अन्नाची चव व्यवस्थित न लागणे, तोंडात चिकटपणा जाणवणे वगैरे तक्रारींवर पानओव्याचे पान चावावे व सुटलेली लाळ थुंकून टाकावी. याने वरील तक्रारी कमी होतात. 

सूप बनविताना ओव्याची एक-दोन पाने ठेचून टाकण्याने ते अधिक रुचकर बनते व पचण्यासही हलके बनते. वारंवार सर्दी-खोकला होणाऱ्यांनी अधून मधून ओव्याच्या पानांचा आहारात समावेश करणे चांगले. 

 

करडई 
करडईचे झाड कंबरेइतके उंच वाढते. याची पाने लांबट असून कडेला कारतलेली असतात. करडईचे फूल पिवळ्या रंगाचे असते. या फुलापासून रंग तयार करतात. करडईच्या बियांचे तेल काढतात. करडईच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. 

कुसुम्भपत्रं मधुरमनेत्र्यमुष्णं कटु स्मृतम्‌ । 
अग्निदीप्तिकरं चातिरुच्यं रुक्षं गुरु स्मृतम्‌ ।। 
सरं पित्तकरं चाम्लं गुदरोगकरं मतम्‌ ।। 

...निघण्टु रत्नाकर 
करडईची भाजी चवीला आंबटगोड पण विपाकाने तिखट असते, म्हणूनच उष्ण स्वभावाची असते, डोळ्यांसाठी अहितकर असते, अग्नी प्रदीप्त करते, रुचकर असते, रुक्ष गुणांची असते, पचायला जड असते, पित्त वाढवते, सारक असते, अति प्रमाणात सेवन केल्यास गुदरोग तयार करू शकते. 

करडई उष्ण, पित्त वाढविणारी असते, तसेच विदाह करणारी म्हणजे शरीरात गेल्यावर दाह उत्पन्न करणारी असते. त्यामुळे उन्हाळ्यात, शरद ऋतूत व पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी करडई भाजी खाणे टाळणे चांगले. 

सध्या स्वयंपाकात करडईचे तेल वापरण्याचा पायंडा पडलेला दिसतो. करडईचे तेल अचक्षुष्य म्हणजे डोळ्यांसाठी अपायकारक सांगितलेले आहे. करडईचे तेल सर्व तेलात निकृष्ट तसेच त्रिदोषकार असते. 

करडईची भाजी पचायला जड व विदाही असल्याने ती खाल्ल्यावर ज्यांच्या पोटात आग होते, त्यांनी ती निश्चित टाळावी, तसेच शक्‍यतो ही भाजी रात्री खाऊ नये. 

शरीरावरची चरबी कमी करण्यासाठी करडईच्या पानांचा रस शरीरावर चोळून, नंतर स्नान करण्याचा फायदा होतो. वारंवार जंत होणाऱ्या व्यक्‍तींसाठी करडईची भाजी पथ्यकर असते. यामुळे गुदभागी खाज येणे, गुदभागी ओलसरपणा जाणवणे या तक्रारी कमी होतात. परंतु बरोबरीने बाकी काही त्रास होत नाहीत ना याची खात्री असावी. 

 

अंबाडी 
स्याद्‌ अम्लवाटी कटुकाम्लतिक्‍ता 
तीक्ष्णा तथोष्णा मुखपाककर्ती । 
विदाहपित्तास्रविकोपनी 
चविष्टम्भदा वातनिबर्हणी च ।। 

...निघण्टु रत्नाकर 
अंबाडीची भाजी चवीला आंबट, तिखट व कडवट असते, उष्ण, तीक्ष्ण गुणाची असते, बद्धकोष्ठता निर्माण करू शकते. अंबाडीची भाजी नियमितपणे खाल्ल्यास तोंड येऊ शकते, रक्‍तपित्ताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शरद ऋतूत, ग्रीष्म ऋतूत अंबाडीची भाजी खाणे टाळणे चांगले होय. अंबाडीची जून झालेली भाजी अजिबात खाऊ नये, त्यामुळे पोटदुखी, शौचाला खडा होणे वगैरे त्रास होऊ शकतो. 

मुका मार लागला असता अंबाडीची पाने वाटून तयार केलेला लेप गरम करून लावून ठेवण्याने वेदना कमी होतात. 

यकृताची कार्यक्षमता कमी झालेली असल्यास, विशेषतः फॅटी लिव्हरचे निदान झालेले असल्यास अंबाडीची भाजी अधून मधून आहारात समाविष्ट करणे चांगले. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com