अन्नपानविधी- शाकवर्ग 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 21 February 2020

हादगा कफप्रकृतीच्या व्यक्‍तींसाठी पथ्यकर असतो. पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तींनी मात्र हादगा जपून वापरावा, विशेषतः हादग्याच्या शेंगा पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तींनी न वापरणे चांगले. 
 

मागच्या वेळी टाकळा या भाजीची माहिती घेतली. आज हादगा या भाजीचे गुणधर्म काय असतात हे पाहू या. 

हादगा कफप्रकृतीच्या व्यक्‍तींसाठी पथ्यकर असतो. पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तींनी मात्र हादगा जपून वापरावा, विशेषतः हादग्याच्या शेंगा पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तींनी न वापरणे चांगले. 
 

मागच्या वेळी टाकळा या भाजीची माहिती घेतली. आज हादगा या भाजीचे गुणधर्म काय असतात हे पाहू या. 

हादगा या कोकण प्रांतात अधिक आढळतो. याचे झाड बऱ्यापैकी मोठे होते, पांढऱ्या रंगाची फुले येणारा आणि लाल रंगाची फुले येणारा असे याचे दोन मुख्य प्रकार असतात. पिवळी व निळी फुले येणारा हादगाही क्वचित आढळतो. हादग्याच्या कोवळ्या पानांची, फुलांची व शेंगांची भाजी करता येते. हादग्याला संस्कृतमध्ये अगस्ति असे म्हटले जाते. 
अगस्तिपुष्पं तुवरं तिक्‍तं किंचित्‌ च शीतलम्‌ 
पाके कटु च विज्ञेयं वातलं परिकीर्तितम्‌ ।। 
नक्‍ताध्यं च प्रतिश्‍यायं ज्वरं चातुर्थिकं कफम्‌ । पित्तं च नाशयति तदित्यमुक्‍तं महर्षिभिः ।। 

...निघण्टु रत्नाकर 
हादग्याची फुले तुरट, किंचित कडवट असतात, वीर्याने थंड असतात व विपाकाने तिखट असतात, वात वाढवितात. ही फुले रातांधळेपणा, सर्दी, ताप, कफ व पित्तदोष कमी करतात. 

हादगा उत्तम कफनाशक असतो. फार जुनाट खोकला असला तर हादग्याच्या पानांचा रस एक चमचा आणि मध अर्धा चमचा हे मिश्रण दोन वेळा घेण्याचा उपयोग होतो. 

ज्या लहान मुलांना वारंवार सर्दी होण्याची प्रवृत्ती असते त्यांच्या कपाळावर पानांचा रस चोळण्याचा उपयोग होतो. 

डोके जड होऊन दुखत असेल, कफ दाटून राहिल्यासारखे वाटत असेल तर हादग्याच्या पानांचा रस दोन थेंब या प्रमाणात नाकात टाकल्याने कफ पडून जातो आणि डोके हलके होते. वैद्यांच्या देखरेखीखाली हा प्रयोग करणे चांगले. 

हादग्याची पाने जंतनाशक असतात. चेहऱ्यावर पांढरे डाग येणे, भूक न लागणे, गुदभागी खाज येणे वगैरे तक्रारींवर हादग्याच्या पानांची भाजी आहारात ठेवण्याचा उपयोग होतो. 

रातांधळेपणा म्हणजे रात्रीच्या वेळी न दिसणे या समस्येसाठी हादग्याच्या पानांची, फुलांची तुपावर परतून केलेली भाजी खावी व पानांचा रस दोन-दोन थेंब या प्रमाणात घालावा असा वृद्ध वैद्याधार आहे. 

हादग्याच्या फुलांची भाजी किंवा वड्या करण्याची पद्धत असते. पानांप्रमाणे हादग्याची फुले सुद्धा कफशामक असतात. 

अंगावरून पांढरे जात असेल तर हादग्याची पांढरी फुले तुपात तळून घेण्याचा फायदा होतो. 

दर चौथ्या दिवशी ताप येणे हा विषमज्वराचा एक प्रकार होय. यात खूप अशक्‍तपणा येतो, शरीर कृश होते जाते. यावर हादग्याच्या फुलांची भाजी पथ्यकर असते. मात्र बरोबरीने वैद्यांचा सल्ला घेणे श्रेयस्कर होय. 

हादग्याच्या कोवळ्या शेंगांचीही भाजी केली जाते. पोटात वायू होणे, पोट दुखणे, शौचाला खडा होणे या तक्रारींवर ही भाजी उपयोगी पडते. 

अंगावर चरबीच्या गाठी येतात, त्यांच्यासाठी सुद्धा हादग्याच्या शेंगांची भाजी पथ्यकर असते. 

अर्धशिशीवर ज्या बाजूचे डोके दुखत असेल, त्याच्या विरुद्ध नाकपुडीत हादग्याच्या फुलांचा रस टाकण्याचा फायदा होतो. 

हादगा कफप्रकृतीच्या व्यक्‍तींसाठी पथ्यकर असतो. पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तींनी मात्र हादगा जपून वापरावा, विशेषतः हादग्याच्या शेंगा पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तींनी न वापरणे चांगले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Annapaanvidhi Shakvarga article written by Dr Shri Balaji Tambe