लठ्ठ आहात? सडपातळ व्हायचंय

डॉ. जयश्री तोडकर, सई लेले, डॉ. नीता सावंत 
Friday, 30 August 2019

 लठ्ठपणा हे एक प्रकारचे अपंगत्व व आजारपण आहे. लठ्ठपणाने केवळ सौंदर्य बिघडते असे नाही, तर अन्य आजारांनाही घर मिळते. त्यावर वेळीच उपचार करून घेतले पाहिजेत. 

 लठ्ठपणा हे एक प्रकारचे अपंगत्व व आजारपण आहे. लठ्ठपणाने केवळ सौंदर्य बिघडते असे नाही, तर अन्य आजारांनाही घर मिळते. त्यावर वेळीच उपचार करून घेतले पाहिजेत. 

लठ्ठपणा देहसौंदर्याला बाधा पोचवतो. आरशात आपलेच रूप आपल्याला दिसते तेव्हा हा वरवर होणारा परिणाम आपल्याही नजरेला खुपतो. पण एवढ्यावरच थांबत नाही. लठ्ठपणा कधी एकटा येत नाही. तो आपल्याबरोबर शंभर व्याधींना घेऊन येतो. त्यामुळेच लठ्ठपणा हाच आजार आहे हे मान्य करून योग्य वेळेत निदान आणि उपचार करणे आवश्यक आहे. असे उपचार झाले तर लठ्ठपणामुळे होणाऱ्या सर्व व्याधीही अत्यंत परिणामकारक पद्धतीने नियंत्रणात येऊ शकतात आणि कायमच्या बऱ्याही होऊ शकतात. योग्य प्रमाणात आणि दीर्घ काळासाठी वजन प्रमाणित ठेवण्यासाठी असलेले शास्त्रीय उपचार पुढील प्रमाणे आहेत - 
- तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि विविध आजारांचे संभाव्य धोके लक्षात घेऊन योग्य आहाराची आखणी करणे व ती कायम स्वरूपी पाळणे. 
- हृदय आणि सांधे यांची प्रकृती व ताण सहन करण्याची क्षमता लक्षात घेऊन योग्य व नियमित व्यायामाचे अंतर्भाव दैनंदिन जीवनात करणे. 

- लठ्ठपणावर उपाय योजनेअंतर्गत कोणत्याही पद्धतीची सुरक्षित व प्रभावी औषधे आज भारतात आणि जगात उपलब्ध नाहीत हे माहीत नसल्यामुळे अशा पद्धतीच्या आमिषाला बळी पडून फसणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आढळते. अशामुळे जीव गमावण्याची शक्यता सुद्धा असते. प्रत्येक व्यक्तीचे संपूर्ण आरोग्य शास्त्रानुसार मूल्यमापन करून कोणता उपचार योग्य आहे याविषयी सविस्तर सल्ला देणे आवश्यक असते. यामध्ये दोन पद्धतीच्या उपचारांचा समावेश होतो - 
१. औषधोपचार (मेडिकल ट्रीटमेंट) 
२. शस्त्रक्रियात्मक उपचार (सर्जिकल ट्रीटमेंट) 

औषधोपचार 
एका विशिष्ट पातळीपर्यंत डाएट, व्यायाम व योग्य औषधे यांचा उपयोग होऊ शकतो. 

आहारासंबंधीच्या सूचना 
- शरीरामधील जास्तीचे चरबीचे प्रमाण घटवण्यासाठी आहारामध्ये काही बदल करणे आवश्यक असते. पण हे बदल करून घेण्याआधी शरीराबद्दलची माहिती, शरीरातील ठिसूळपणा, शरीराची कार्यक्षमता हे जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. आहारामध्ये विचित्र बदल करून किंवा क्रॅश डाएट करून वजन किंवा चरबी कमी करणे ही पद्धत योग्य नसून त्याचे उलट विघातक परिणाम शरीरावर होऊ शकतात. 
- डाएट करणे म्हणजे बिना चवीचे, फक्त उकडलेले, खूप महाग पदार्थ खाणे म्हणजे डाएट करणे असे नव्हे. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आहारामध्ये छोटे छोटे बदल करून आपल्या शरीराची काळजी घेऊ शकतो. 
- आहाराविषयी सल्ला घेताना वैद्यकीय सल्ल्यानुसारच किंवा आहारतज्ज्ञांकडूनच आहार घेणे आवश्यक आहे. 
- आजकाल व्हॉट्सॲप किंवा मेसेज मधून किंवा वृत्तपत्रांमधून आहाराबाबत खूप लिखाण होत आहे. पण अशा प्रकारचे सल्ले घेताना किंवा आचरणात आणताना त्या सल्ल्यांची पडताळणी करणे आवश्यक आहे. 
- आहार हे एक औषध आहे, ज्यामुळे आपले शरीर व्यवस्थित चालण्यासाठी खूप उपयोग होतो. पण याच आहाराचा अतिरेक सुद्धा करू नये की ज्यामुळे त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होऊ देता कामा नये. 
- शरीरामधील चरबी कमी करणे किंवा वजन घटवणे हे सुंदर किंवा चांगले दिसणे यापुरते मर्यादित कधीच नसावे. आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढविणे, आजारांचे प्रमाण कमी करणे, शरीरातील ठिसूळपणा कमी करणे हे असावे. 
- डाएट करणे म्हणजे उपाशी राहणे नव्हे. प्रत्येक माणसानुसार, त्याच्या शरीरानुसार, त्याच्या व्याधींनुसार किंवा आजारांनुसार आहारामध्ये बदल करणे गरजेचे आहे. सरसकट सगळ्या माणसांना किंवा रुग्णांना एकाच पद्धतीचे डाएट लागू होत नाही. प्रत्येकासाठी वैयक्तिक असा आहारतक्ता (पर्सोनालिज्ड डाएट प्लॅन) असणे खूप महत्त्वाचे आहे. 

आहाराची मूलतत्त्वे 
दररोज तीन लिटर पर्यंत पाणी प्यावे. 
आहारामध्ये मैद्याचे पदार्थ किंवा बेकरीच्या पदार्थांचे सेवन करू नये. 
गायीचे दूध, पनीर, दही, ताक यांचा आहारामध्ये मुबलक प्रमाणात समावेश असावा. 
हंगामानुसार बाजारात असलेली फळे आहारामध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे. 
जंक फूड, बाहेरचे पदार्थ, तेलकट पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करू नयेत. 
वजन कमी करण्यासाठी शरीराची उपासमार करू नये. 
धान्य व धान्याचे पदार्थांचे प्रमाण आहारामध्ये कमी असावे. 
सगळ्या प्रकारच्या डाळी, उसळी, सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, फळे, गायीच्या दुधाचे पदार्थ योग्य प्रमाणात आहारात समाविष्ट करावेत. 
प्रथिने जास्त असलेले पदार्थ आहारामध्ये मुबलक प्रमाणात असावेत. 

शारीरिक हालचाल 
दररोज किमान तीस मिनिटे व्यायाम केल्यास फिटनेस आणि हृदयाची कार्यक्षमता वाढते. परंतु वजन कमी करणे आणि नंतर ते वाढू न देणे यासाठी किमान एक तासाचा व्यायाम जरुरी आहे. बैठ्या कामामध्ये घालविले जाणारे ताण आणि स्क्रीन टाइम (मोबाइल, टीव्ही, कॉम्पुटर ) इ. यामध्ये अत्यंत घट करणे अनिवार्य आहे. 

शस्त्रक्रियात्मक उपचार 
ज्या वेळी चयापचय (मेटाबॉलिझम) बिघडून एका विशिष्ट पातळीच्या पुढे समस्या दिसून येतात, त्या वेळी हा उत्तम उपाय ठरतो. यामध्ये पचन संस्थेच्या रचनेमध्ये काही विशिष्ट बदल करून चयापचय (मेटाबॉलिझम) सुधारण्यासाठी ट्रीटमेंट दिली जाते. हे उपचार दुर्बिणीद्वारे केले जातात. आणि रुग्ण रुग्णालयात साधारण दोन-तीन दिवस राहतात. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर कुठल्याही पद्धतीची विश्रांतीची गरज नसते. रुग्ण आपल्या पूर्ववत कामावर रुजू होऊ शकतात. या उपायांमुळे मधुमेह, हृदयविकार, सांधेदुखी, वंध्यत्व, घोरणे अशा विकारांवर आणि वजनावर नियंत्रण ठेवता येते. 

जगभरच्या आजवरच्या अनुभवानुसार बॅरिॲट्रिक सर्जरी ही आधुनिक विज्ञानाची लठ्ठपणावर मात करण्याची अत्यंत यशस्वी प्रणाली आहे. 

खाणे, आहारात फारसे बदल न होताही वजन वाढत राहणे, थकवा, आळस, नैराश्य, चिडचिडेपणा, डोकेदुखी, ढेरी वाढणे, वय वर्ष साठच्या आत गुडघेदुखी सुरू होणे, अती घोरण्याचा इतरांना त्रास होणे या आजारांचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त आढळते. कारण महिलांच्या आयुष्यात वेगवेगळ्या वयानुसार हार्मोन्स मध्ये अत्यंत चढउतार होतात. सर्व हार्मोन्सचा उगम मेंदूपाशी होत असल्याने मानसिक अवस्थेचे व आजाराचे प्रमाण खूप जास्त असते. एवढेच नाही तर वर नमूद केलेल्या आजारांना महिला जास्त प्रमाणात बळी पडतात. याचा अर्थ चिडचिडेपणा, व्यावसायिक संबंध यांच्यासाठी नुकसान कारक ठरतो. याउलट फिटनेस असणाऱ्या व्यक्तींमध्ये उलटे चित्र पाहावयास मिळते. 

वजनाचा उपचार घेताना शास्त्रीय पद्धतीने घेणे महत्त्वाचे आहे. अशास्त्रीय पद्धतीने घेतलेले उपचार हानिकारक आणि दूरगामी परिमाण करणारे ठरतात. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यांच्या जोडीला जाड व्यक्तीचा चयापचय (मेटॅबोलिझम) चांगला असेल तर, वजन वाढीची समस्या तयार होणार नाही. परंतु योग्य चयापचयाची साथ न मिळाल्यास व्यक्तीचे वजन वाढतच जाते. त्यामुळे आहारातील बदलाचा वजन घटवण्यासाठी तसा उपयोग होत नाही. अशा वेळी ओबेसिटी क्लिनिकमध्ये योग्य उपचार सुरू करणे गरजेचे आहे. बॅरिॲट्रिक सर्जरी या अत्यंत यशस्वी आणि शास्त्रीय उपचार पद्धतीमुळे आजच्या युगामध्ये लठ्ठपणा आणि संबंधित आजार यांच्यावर मात करणे सहज शक्य झाले आहे. 

लायपोसक्शन ही शस्त्रक्रिया लठ्ठपणावरील उपचारांसाठी नाही. यापद्धतीने काढलेली चरबी पुढच्या तीन ते सहा महिन्यांमध्ये परत वाढते. लठ्ठपणा कापून तो कमी होईल असे समजणे म्हणजे गळणाऱ्या छताची जमीन पुनःपुन्हा पुसण्यासारखे आहे. एव्हाना आपल्या लक्षात आलेच असेल की लठ्ठपणाची गुरुकिल्ली चयापचय (मेटॅबोलिझम) आहे. 

बॅरिएट्रिक सर्जरीचे प्रकार 
बॅरिएट्रिक सर्जरीमध्ये एकूण चार प्रकार आहेत. 
स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी 
गॅस्ट्रिक बायपास 
गॅस्ट्रिक बॅण्डिंग 
ड्युओडनल स्वीच डायव्हर्शन 

लठ्ठपणा कमी होण्याचे फायदे 
- लठ्ठपणामुळे होणाऱ्या सगळ्या व्याधी अत्यंत कमी होतात. 
- व्याधी वाढत नाहीत. 
- व्याधींसाठी लागणारी औषधे खूप कमी होतात किंवा लागत नाहीत. 
उदा. या शस्त्रक्रियेनंतर मधुमेह व लठ्ठपणा असणाऱ्या आणि इन्सुलिन लागणाऱ्या ऐंशी टक्के रुग्णांचे इन्सुलिन घेणे कायमचे बंद होते. 
- गुंतागुंतीचे (कॉम्प्लिकेशन्सचे) प्रमाण अत्यंत कमी होते. 
- कार्यक्षमता वाढीला लागते, शारीरिक अवयवांचे आरोग्य व कार्यक्षमता सुधारते (हृदय, किडनी, फुप्फुसे). 
- आयुष्य वाढते. 
- रोगप्रतिकारक क्षमता वाढते. 
- हालचालींमध्ये चपळता व उत्साह वाढतो. 
- आत्मविश्वास वाढल्यामुळे नातेसंबंध सुधारण्यास मदत होते. 
- एका जागतिक अहवालानुसार लठ्ठपणा कमी झाल्यानंतर एका व्यक्तीची ४०-६० टक्के आर्थिक बचत होते. 

याचा अर्थ असा की 
लठ्ठपणा ही गंभीर व्याधी असून जवळपास शंभर गंभीर व्याधींची निर्मिती लठ्ठपणामधूनच होत असते. लठ्ठपणा हे अपंगत्व आहे आणि सौंदर्यापलीकडे जाऊन त्याचा विचार करणे गरजेचे आहे. योग्य वेळी योग्य पद्धतीने शास्त्रीय उपचार घेतल्याने आपण लठ्ठपणातून कायमचे बाहेर येऊ शकता. 

 

 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Are You Obez? article write by Dr Jayashree Todakar Saee lele Dr Neeta Sawant