महिलांना संधिवात 

डॉ. कौशल मल्हान 
Friday, 14 February 2020

रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांची हाडे अधिक झिजू लागतात, कमकुवत होतात आणि स्त्रियांमध्ये संधिवात होण्याचे प्रमाणही वाढते. हाडांचे घनत्व अधिक राहण्यासाठी आधीच काळजी घ्यायला हवी. 

रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांची हाडे अधिक झिजू लागतात, कमकुवत होतात आणि स्त्रियांमध्ये संधिवात होण्याचे प्रमाणही वाढते. हाडांचे घनत्व अधिक राहण्यासाठी आधीच काळजी घ्यायला हवी. 

रजोनिवृत्तीनंतर हाडांची होणारी अतिरिक्त झीज यासह अनेक शारीरिक कारणांमुळे महिलांमध्ये संधिवाताचे प्रमाण पुरूषांपेक्षा अधिक असते, असे अभ्यासात लक्षात आले आहे. हाडांची नैसर्गिक झीज होण्याचे प्रमाण कमी करून ‘फ्रॅक्चर’चा धोका टाळणारी नवीन औषधे शोधण्यात येतात. आपले वय वाढत जाते तसतसे ‘वेअर एण्ड टेअर’ म्हणता येतील, अशा आजारांचे प्रमाणही वाढत जाते. डोळे असोत वा एखादा शरिरांतर्गत अवयव, सांधे असोत किंवा हाडे... वयोमानानुसार सर्वांनाच असे त्रास उद्भवतात. असे असले तरीही, हाडांच्या बाबतीत महिलांना असलेला धोका अधिक आहे. 

हाडांचे घनत्व किंवा हाडांतील मांस वयानुसार कमी होत जाते. पुरूष व महिला दोहोंमध्ये हे होते. परंतु, रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. हाडांमधील कॅल्शियम, ‘ड’ जीवनसत्व आणि अन्य खनिजे कमी होत जातात आणि त्यामुळे त्यांचे घनत्व कमी होते. हे अति झाल्यास, काही व्यक्तींची हाडे छिद्रमय किंवा नाजूक होतात आणि ती मोडण्याचे प्रमाण वाढते. महिलांच्या हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी इस्ट्रोजन (संप्रेरक) फार महत्वाचे असते.

रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजनची पातळी कमी झाल्यामुळे हाडांची घनता कमी व्हायला सुरूवात होते. कॅल्शियम व ‘ड’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे संधिवात होऊ शकतो. सडपातळ किंवा कृश महिलांमध्ये हाडांची जाडी मुळातच कमी असल्यामुळे त्यांच्यात संधिवाताचा धोका अधिक असतो. 
संधिवात किंवा हाडांची अति झीज झाल्यामुळे वारंवार हाडे मोडण्याचे प्रमाण वाढते. हाडांची झीज झाल्यावर कॅल्शियम व ‘ड’ जीवनसत्वाची पूरक औषधे ही प्राथमिक उपचारपद्धती आहे. 

वाढत्या वयोमानाबरोबरच, बेशिस्त आहार, कॅल्शियम व ‘ड’ जीवनसत्वाची आहारातली कमतरता, धूम्रपान, मद्यपान, तरुणींमध्ये अनियमित मासिक पाळी, आनुवंशिक आजार किंवा शारीरिक ठेवण या घटकांमुळेदेखील संधिवाताचे प्रमाण वाढू शकते. महिलांमध्ये पुरूषांच्या तुलनेत मुळातच हाडांची घनता कमी असून वाढत्या वयानुसार त्यांच्या हाडांचे वजन कमी होते आणि संधिवाताचा धोका वाढतो. 

हाडांच्या आरोग्यासाठी हाडांतील मांस व घनता सर्वोच्च असणे आवश्यक असते. वयाच्या तिसाव्या वर्षांपर्यंत हाडांची घनता सर्वाधिक असते. म्हणूनच, महिलांनी तरुण वयातच आपल्या हाडांची काळजी घ्यायला हवी. हाडांचे आरोग्य धोक्यात असलेल्या व्यक्तींना कॅल्शियम व ‘ड’ जीवनसत्वाची औषधे दिली जातात. संधिवात असलेल्या रुग्णांमधील हाडांची झीज कमी करण्यासाठी मोनोक्लोनल एण्टिबॉडी इंजेक्शनद्वारा देऊन हाडांमधील प्रथिने रोखून ठेवून हाडे मोडण्याची प्रक्रिया यामुळे थांबवता येते. नियमित व्यायाम, वजन उचलण्याचे व्यायाम यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राखते येऊ शकते. हाडांमध्ये जीवंत ऊती असल्यामुळे व्यायामातून हाडांजवळचे स्नायू अधिक सक्रीय होण्यास मदत होते. 
 

भारतात संधिवाताचे प्रमाण अधिक आहे. वाढत जाणारे आयुर्मान आणि बेशिस्त जीवनशैली यामुळे या आजाराचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, दिल्लीस्थित ३८ ते ६८ वर्षे वयोगटातले ६९ टक्के लोक हाडांची झीज अनुभवतात. जवळपास २२३ पुरूष व २२२ महिलांवर हा अभ्यास करण्यात आला असून यांपैकी ८.९९ टक्के रुग्णांना ऑस्टिओपोरोसिस तर, ५९.९९ टक्के रुग्णांना ऑस्टिओपेनिया झाला होता. वास्तविक, तरुण वयात संधिवात होण्याच्या घटना पाश्चिमात्य देशांपेक्षा भारतातच जास्त आढळून येतात. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून दिसून येते की, भारतात ‘ड’ जीवनसत्वाच्या कमतरतेच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात कमी वेळ असणे आणि आहारातही ‘ड’ जीवनसत्वाचा अभाव यामुळे असे होते. 
वाईट गोष्ट अशी की, अनेक वर्षे कोणत्याही लक्षणांखेरीज मानवी शरिरात संधिवात टिकून राहतो आणि हाडे मोडेपर्यंत त्याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. यापेक्षा वाईट म्हणजे, काहीवेळा हाडे संधिवातामुळे मोडली आहेत, हे शेवटपर्यंत कळतही नाही. त्यामुळे, अत्यंत वेदनादायक ‘फ्रॅक्चर’ होईपर्यंत रुग्णाला संधिवात असल्याची कल्पनाही येत नाही. फ्रॅक्चर कुठे झाले आहे, त्याप्रमाणे लक्षणे बदलतात, परंतु, बऱ्याचदा वेदना आणि हालचालींवर नियंत्रण ही प्राथमिक लक्षणे असतात. 

काय करता येईल? 
पूर्वीपासून म्हटल्याप्रमाणे, उपचारांपेक्षा प्रतिबंध नेहमीच फायद्याचा ठरतो. संधिवाताच्या बाबतीत हे १०० टक्के खरे आहे. वास्तविक, संधिवात रोखण्यासाठी तरुण वयातच हाडांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे ठरते. चुकीच्या सवयींमुळे आपल्या हाडांना मोडण्याची संधी देऊ नका. 

- दुग्धजन्य पदार्थ, शेंगा, डाळी आदींचा आहारात समावेश करून कॅल्शियमयुक्त जेवण घ्या. 

- ‘ड’ जीवनसत्वासाठी सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात राहा. 

- पस्तिशीनंतर नियमित हाडांच्या घनतेची चाचणी करून घ्या. 

- हाडे मजबूत होण्यासाठी नियमित व्यायाम करा. 

- धूम्रपान व मद्यपान बंद करा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arthritis in women article written by Dr Kaushal Malhan