आरोग्य स्वातंत्र्य

आरोग्य स्वातंत्र्य

स्वतंत्र या शब्दाचे दोन अर्थ दिसतात. प्रत्येक माणसाच्या आत त्याला जीवन जगण्यासाठी जे तत्त्व शरीरात जन्मतःच मिळालेले आहे आणि जीवन संपल्यानंतर जे तत्त्व मनुष्याला सोडून जाते, त्या ‘स्व’चे तंत्र म्हणजे स्वातंत्र्य किंवा स्वतःच्या शरीराला, स्वतःच्या मनाला, स्वतःला मिळालेल्या एका नावाला ‘स्व’ समजून ‘मनःपूतं समाचरेत्‌’ म्हणजे मनाप्रमाणे वागणे म्हणजे स्वातंत्र्य. 

प्रवासाला जाताना काही सामान बरोबर घेणे आवश्‍यक असते. रोजच्या नित्यकर्माची साधने, रोजचे कपडे आपल्याजवळ असणे आवश्‍यक असते. विशिष्ट कामासाठी बाहेर जाताना काही विशिष्ट साधने जवळ असणे व ते पिशवीत वा बॅगमध्ये भरून आपल्याजवळ ठेवणे आवश्‍यक असते. स्वतःला सांभाळून प्रवास करताना या सामनाचीही काळजी घ्यावी लागते. अशी काळजी घेणे हे बंधन नसून प्रवास व्यवस्थित व आनंदाने व्हावा, तसेच कार्यपूर्ती व्हावी यासाठी अशी काळजी घ्यावी लागते. मनाला आवडो वा न आवडो, सामानाची काळजी घेण्याचे बंधन घ्यावेच लागते. वाटेल तसे वागण्याची मुभा आहे असे समजून व तसे वागून चालत नाही. सामान हरवले, चोरीला गेले वा त्याची नासधूस झाली तर प्रवासाचा मूळ हेतू सिद्ध होणार नाही आणि मनुष्य लक्ष्याप्रत पोचणार नाही. 

एका छोट्या प्रवासाची ही कथा तर मोठ्या जीवनप्रवासाला निघाल्यानंतर काळजी घेणे आवश्‍यक असणार हे ओघानेच येते. या प्रवासासाठी आपल्याला शरीर हे साधन मिळालेले आहे. आपल्या लक्ष्यापर्यंत जाण्यासाठी, एक विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी जो हा जीवनप्रवास करायचा त्यासाठी लागणारी शक्‍ती, उपकरणे शरीराने पुरविलेली असतात. या उपकरणांची म्हणजेच पर्यायाने शरीराची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. केवळ सामानावर लक्ष ठेवणे हे जसे परवडणारे नाही, तसे केवळ एक विशिष्ट कार्य पूर्ण करायचे आहे म्हणून शरीराकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. जीवनाच्या शेवटच्या घटकेपर्यंत शरीररूपी साधन व सामान आपल्याला व्यवस्थित ठेवणेच आवश्‍यक आहे. त्यासाठी नुसती निरोगिता उपयोगाची नाही तर त्या सर्व साधनांची व्यवस्थित वाढ होणे, त्यातील ताकद शेवटपर्यंत टिकून राहणेही आवश्‍यक असते. ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्‌’ हे यासाठीच म्हटलेले आहे. प्रत्येक व्यक्‍तीला जन्मतःच काही गुण मिळालेले असतात किंवा काही गुणदोष त्याच्याबरोबर आलेले असतात. त्याला पुढे विशिष्ट कार्यक्षेत्रात मनुष्यमात्राच्या कल्याणासाठी काम करायचे असल्यामुळे काही कला उपजत असतात किंवा ज्ञानाचा लाभ झालेला असतो. त्याच्या लक्ष्यापर्यंत जाणे हा त्याचा धर्म असे म्हणता येते. आपल्या प्राचीन वाङ्‌मयात ‘धर्म’ हा शब्द याच संकल्पनेसाठी वापरलेला आहे. प्रत्येकाने स्वतःचा धर्म टिकवणे, पाळणे आवश्‍यक असते. धर्म टिकविणे म्हणजे शरीराचा व मनाचा स्वभाव ओळखणे, त्यानुसार कार्यरत राहणे. व्यक्‍तीचे कार्य हे बाहेरच्या जगताशी आणि समाजाशी संबंधित असते म्हणून सर्वांच्या कल्याणाचे काम करणे, समाजाशी जोडून राहणे हाही धर्मच असतो. त्यामुळे साधनरूपी शरीराकडे प्रथम लक्ष देणे आवश्‍यक असते. 

मनरूपी उपकरणाला एका बाजूने शरीर व दुसऱ्या बाजूने बाह्यजगताशी करायचा व्यवहार यात समतोल ठेवणे आवश्‍यक असते. प्रत्येक मनुष्य स्वतःच्या घराशी, कुटुंबाशी एका विशिष्ट नात्याने जोडलेला असतो, तसेच तो बाहेर त्याच्या कार्यक्षेत्रात त्याच्या व्यक्‍तिमत्वाने जोडलेला असतो. आतील व बाहेरील या त्याच्या दोन्ही अस्तित्वाला जोडून समतोल ठेवण्याचे काम मनाने करणे आवश्‍यक असते. हे मन कधी घरगुती गोष्टींकडे, शरीराकडे जास्त लक्ष देते तर कधी बाह्य जगताच्या आकर्षणांकडे ओढले जाते व असमतोल निर्माण होतो. यातून जीवनरूपी प्रवास डळमळीत होऊ लागतो. म्हणून एका बाजूने शरीराची काळजी घेण्यासाठी व्यायामशाळा उभे करणारे समर्थ श्री रामदास स्वामी दुसऱ्या बाजूने ‘मनाचे श्‍लोक’ किंवा ‘दासबोधा’तून मनासाठी मार्गदर्शन करतात. स्वातंत्र्य म्हटले की क्रांती आलीच. उत्क्रांतीसाठी वा संतुलनासाठी केलेली क्रांती ही सर्वांना कल्याणाकडे नेते. या क्रांतीला नियमांचे बंधन नसले तर ती दंगल वा अराजकतेकडे नेते. 

आरोग्यक्रांती अपेक्षित असणाऱ्यांना काही नियम समजून घ्यावेच लागतील. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी पूर्वनियोजित संघटनाबांधणी करावी लागते, ताकद उभी करावी लागते (ही ताकद शरीराची असेल, पैशाची असेल), विचारांचा पाया घेऊन क्रांती उभी करावी लागते तसेच आरोग्यक्रांतीचेही असावे. रोज सकाळी बाहेर फिरायला जाणे, व्यायाम व प्राणायाम करणे, मनाला समजून घेऊन त्याचा आत-बाहेरचा व्यवहार संतुलित राहण्याच्या हेतूने ध्यानधारणा करणे, शरीराच्या पेशींना व मनाला आराम मिळण्याच्या हेतूने काही वेळ ताणरहित असेल याकडे लक्ष ठेवणे, तसेच रोजच्या व्यवहारापलीकडे विशेष आनंदोत्सव करता येण्याच्या दृष्टीने करमणूक, उत्सव, सामाजिक व सामुदायिक जीवन यांचा जीवनात समावेश करणे, शरीर हे आहारापासून तयार होत असल्याने आहारावर विशेष लक्ष देणे आवश्‍यक असते. बाहेरील हवामानाप्रमाणे शरीराचे रक्षण करणे व स्वतःची काळजी घेणेही आवश्‍यक असते. सर्व शरीर अन्नापासून बनते व हे अन्न देणारा असतो सूर्य. या सूर्याची व अग्नीची उपासना करणे आवश्‍यक असते. धगधगणारा अग्नी जोपर्यंत इंजिनाच्या आतल्या भागात असतो तोपर्यंत अनेक डबे असणारी आगगाडी व्यवस्थित धावते, पण त्याच अग्नीची ठिणगी वाऱ्याबरोबर इतरत्र पडली तर हाहाकार माजतो, भडका उडतो. तसेच शरीरातील अग्नी समतोल असतो तोपर्यंत जीवनरथ व्यवस्थित चालत राहतो, परंतु शरीरस्थ अग्नी बिघडला तर शरीरव्यापार कोलमडून पडतो. शरीरातील अग्नी म्हणजे शरीरातील संप्रेरके (हॉर्मोनल सिस्टीम), तसेच शरीराची चेतासंस्था सांभाळणे आवश्‍यक असते. यासाठी काही नियम केलेले असतात. जग बदलते, फॅशन बदलते त्यानुसार खाण्यापिण्याचे नियम बदलणे परवडणारे नसते. तसेच फॅशनच्या नावाखाली पोशाखाचे नियम बदलणेही परवडणारे नसते. यातून अनारोग्य अनुभवायला येते. पण या सगळ्यांचा सरळ सरळ संबंध दिसून न आल्यामुळे मनुष्य आहार, पोशाख वगैंरेंच्या नियमांना बंधन समजून त्यातून स्वातंत्र्य मिळवण्याच्या मागे लागतो. यातून शरीराचे असंतुलन होऊन रोग मागे लागतात. तेव्हा आरोग्य टिकवायचे असेल तर काही बंधने पाळावीच लागतात. कारण शरीरावर, मनावर किंवा बाह्य जगतावर अवलंबून राहणे हे बंधन परवडणारे नाही आणि यांचे आरोग्य हेच आरोग्य स्वातंत्र्य. याचबरोबरीने शरीराने कष्ट करणे, अंगमेहनत करणे, व्यवसाय-उद्योग करणे, मेंदूनेही काही काम करणे आवश्‍यक असते. म्हणून मेंदूचे व्यायाम, मेंदूत असणारा सोमरस पुष्ट ठेवण्यासाठी विशिष्ट रसायने व व्यायाम हे आरोग्यक्रांतीचा एक भाग समजून त्यांच्याकडेही लक्ष द्यावे लागते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com