esakal | #FamilyDoctor मूतखडा - चिकित्सा व उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

#FamilyDoctor मूतखडा - चिकित्सा व उपचार

मूतखड्यांमुळे प्रत्येक वेळी दुखेलच असे नाही, तसेच पोटातील प्रत्येक दुखणे मूतखड्यामुळेच असेल असे नाही. म्हणून वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा ठरतो. योग्य चिकित्सा व योग्य उपचार यामुळेच पुढचे त्रास वाचतात.
प्रा. डॉ. सुरेश पाटणकर  (www.aceremedy.in)
संतोष शेणई  (santshenai@gmail.com)

#FamilyDoctor मूतखडा - चिकित्सा व उपचार

sakal_logo
By
प्रा. डॉ. सुरेश पाटणकर, संतोष शेणई

पोटात दुखण्याची, कळ येण्याची जागा व इतर माहितीवरून मूतखड्याची शंका येते. मात्र, निश्‍चित निदानासाठी लघवीची तपासणी (रक्ताच्या पेशी असणे-नसणे) आवश्‍यक असते. याबरोबरच पोटाचे क्ष-किरण चित्र, सोनोग्राफी किंवा अधिक तपासण्या कराव्या लागतात. यात खड्याची जागा, आकार नेमके कळू शकते. तसेच खडा नेमका कोणत्या घटकांचा आहे हेही समजून घेता येते. याबरोबर आणखी खडे असल्यास तेही कळते. मात्र मूतखड्याचा मूत्रपिंडावर नेमका किती परिणाम झाला आहे हे कळण्यासाठी काही विशेष तपासणी करावी लागते. तसेच रक्ताची तपासणी करून (युरियाचे, तसेच क्रिएटिनीनचे प्रमाण तपासून) दोन्ही मूत्रपिंडाचे काम किती प्रमाणात चांगले आहे किंवा बिघडले आहे याचा अंदाज घ्यावा लागतो. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, पोटातील प्रत्येक दुखणे मूतखड्यामुळेच असेल असे नाही, तसेच मूतखड्यांमुळे प्रत्येक वेळी दुखेलच असेही नाही, त्यामुळेच मूतखड्याच्या शंकेनंतर वैद्यकीय सल्ला घ्यावाच. ‘राईचा पर्वत करणे’ हा वाक्‍प्रचार आपण अवास्तवता दाखवण्यासाठी वापरतो. पण दुर्लक्ष केल्यामुळे राईएवढ्या मूतखड्यापासून पर्वताएवढे आजार होऊ शकतात हे विसरता येत नाही.  

विविध तपासण्या  
मूतखड्याची शंका असल्यास वेळीच डॉक्‍टरला दाखवावे. 
पोटाची सोनोग्राफी केल्यास मूतखड्याचे आकारमान, स्थान व खड्यांची संख्या समजते. खड्यांमुळे किती अडथळा आला आहे हेही कळते. नलिकांना किंवा मूत्रपिंडाला सूज आलेली असल्यास ती दिसून येते. मूत्रपिंडाच्या कामाबद्दलही प्राथमिक पडताळणी करता येते. सर्व प्रकारचे मूतखडे सोनोग्राफीमध्ये दिसून येतात. अगदी लहान म्हणजे दोन-तीन मिलीमीटर एवढा छोटा खडाही सोनोग्राफीत दिसून येतो. तरीही ही प्राथमिक तपासणी आहे हे लक्षात घ्यावे. कारण या तपासणीलाही काही मर्यादा आहेत. मुख्य म्हणजे जर पोटात खूप वायू (गॅस) असेल तर विशेषतः अंतर्मूत्रवाहिनीतील (युरेटर) मूतखडा सोनोग्राफीत दिसत नाही.  

पोटाच्या क्ष-किरण तपासणीमध्ये मूतखड्याचे आकारमान व घनता जाणता येते. मात्र, कॅल्शियमचे प्रमाण नगण्य असलेले खडे क्ष-किरण तपासणीत दिसत नाहीत, ही या तपासणीची मर्यादा आहे. 

आयव्हीपी (इंट्राव्हेनस पायलोग्राफी) ही पद्धत क्ष-किरण परीक्षेतीलच एक पद्धती आहे. आयोडिन कॉन्ट्रास्ट माध्यमाचा वापर करून मूत्रसंस्थेचे कार्य तपासले जाते. हे औषध शिरेतून दिल्यानंतर मूत्रसंस्थेतील त्याचा प्रवास तपासला जातो. त्यामुळे मूत्रसंस्थेचा नकाशा आपल्यासमोर मिळतो, असे म्हणायला हरकत नाही. या तपासणीद्वारे मूत्रपिंडांचे  काम योग्य पद्धतीने चालू आहे किंवा नाही हे ओळखणे शक्‍य होते. मूतखड्याची नेमकी जागा समजून येते. त्यामुळे पुढील उपचारांसाठी या तपासणीचा उपयोग होतो. 

मूत्रमार्गाची एंडोस्कोपीतून (औषध टाकून) तपासणी केल्यास मूतखड्याबद्दल अधिक तपशील समजून येतात. याला रेट्रॉग्रेड पायलोग्राफी असे म्हणतात. 

साधी व औषध देऊन अशा दोन प्रकारे सीटी स्कॅन तपासणी केली जाते. या तपासणीमुळे शंभर टक्के निदान होते. जे खडे क्ष-किरण तपासणीत किंवा सोनोग्राफीतही दिसत नाहीत, ते सीटी स्कॅनमध्ये दिसतात. खड्यांचे काठिण्यही या तपासणीत कळते.  

आयसोटोप स्कॅन तपासणीत मूतखड्यामुळे मूत्रपिंड किती निकामी झाले आहे हे कळते. या तपासणीसाठी रेडिओ अक्‍टिव्ह औषध शिरेतून सोडले जाते. शस्त्रक्रिया करून केवळ मूतखडा काढून उपयोग होईल का, की, मूत्रपिंडाचेच रोपण करावे लागेल याचा निर्णय या तपासणीनंतर घेता येतो. मूत्रपिंडाचे कार्य दहा टक्‍क्‍यांपेक्षा कमी झालेले असल्याची शंका येते तेव्हा ही तपासणी आवर्जून केली जाते.  
 
मूतखडा तयार होण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, लघवीचे पीएच, लघवीमधील विविध घटकांचे केंद्रिकरण, तसेच लघवीला काही अडथळा आहे का इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या असतात, हे आपण आधी पाहिलेच आहेत. मूतखडा झाल्याचे निदान होत असल्यास आणखी काही तपासण्या करून घ्यायला हव्यात. त्याचे योग्य चिकित्सेसाठी साह्य होते. 
 
१)     लघवीची तपासणी : पोटामध्ये दुखत असताना लघवी तपासल्यास बहुतांशी रुग्णांमध्ये तांबड्या पेशी आढळून येतात. काही रुग्णांमध्ये लघवीमध्ये कॅल्शियम ऑक्‍झॅलेट किंवा युरिक ॲसिडचे स्फटिक आढळून येतात. याशिवाय जंतुसंसर्ग झालेला असल्यास लघवीमध्ये पस सेल्स किंवा ई-कोलाय हा जीवाणू आढळून येतो. मूतखड्यामुळे मूत्रपिंडास अपाय झाला असल्यास लघवीत जास्त प्रमाणात प्रथिने आढळून येतात; तसेच लघवीत खूप आम्लता आढळते. युरिक ॲसिड किंवा सिस्टीन स्टोनची शक्‍यता असलेल्या रुग्णांमध्ये लघवीचे पीएच पाचपेक्षा कमी आढळते. याउलट लघवीचे पीएच सातपेक्षा जास्त आढळल्यास जंतुसंसर्गामुळे मूतखडा झाल्याची शक्‍यता अधिक असते. 

२)     रक्ताची तपासणी : वारंवार मूतखडा होणाऱ्या बहुतांश रुग्णांच्या रक्तामधील कॅल्शियम, फॉस्फरस, युरिक ॲसिड, इलेक्‍ट्रोलाइट व क्रिएटिनीनची तपासणी आवश्‍यक असते. या रुग्णांमध्ये रक्तामधील पॅरॅथायरॉइड हार्मोन्सची तपासणी, तसेच ‘व्हिटॅमीन डी थ्री’ची तपासणी करण्याची गरज असते. शिवाय या रुग्णांमध्ये चोवीस तासांची लघवी जमा करून त्यामधील कॅल्शियम, युरिक ॲसिड, ऑक्‍झॅलेट व सायट्रेट या घटकांचे प्रमाण मोजणे अत्यंत महत्त्वाचे असते. लघवीमध्ये ऑक्‍झॅलेटचे प्रमाण आढल्यास मूतखड्याची शक्‍यता जास्त असते. ज्या रुग्णांच्या लघवीमध्ये सायट्रेटचे प्रमाण कमी असते त्यांच्यात कॅल्शियम ऑक्‍झॅलेट स्टोनचे प्रमाण जास्त असते. सायट्रेट लघवीतील कॅल्शियम विरघळवण्यास मदत करते व मूतखड्याचा धोका कमी होतो. या तपासणीमुळे आपल्या आहारात योग्य ते बदल करून पुन्हा मूतखडा होण्याची शक्‍यता कमी करता येते.

३)     खड्याची तपासणी -मूतखडा कुठल्या घटकाचा आहे हे तपासणे आवश्‍यक असते. त्यामुळे तो कॅल्शियमचा आहे, युरिक ॲसिडचा आहे, फॉस्केट स्टोन आहे की जंतुसंसर्गामुळे झाला आहे याची माहिती खड्याची तपासणी केल्यानंतर कळू शकते. जंतुसंसर्ग असल्यास तो  किती प्रमाणात आहे हेही समजते. त्यानुसार असा त्रास पुन्हा उद्भवू नये, यासाठी काही उपाययोजना करता येते.

४)     लिथोरिक्‍स प्रोफाईल - या चाचण्या फारच कमी प्रयोगशाळांमध्ये केल्या जातात. काही रुग्णांमध्ये चयापचयाच्या प्रक्रियेतील दोषांमुळे मूतखडे होतात. कॅल्शियम लघवीत विरघळवून बाहेर टाकण्याची प्रक्रिया होत नाही. त्यामुळे थोडेसेही कॅल्शियम त्यांच्या मूत्रसंस्थेत तसेच साठून राहते. या दोषामुळे मूतखडे वारंवार होतात. अशी शरीरप्रवृत्ती असेल तर ही चाचणी आवर्जून केली जाते. 

घरगुती उपचार
मूतखड्यामुळे पोटात वेदना सुरू झाल्यास तातडीचा उपाय म्हणून अर्धा कप गरम पाण्यात साजूक तूप टाकून प्यावे. साधारण पंधरा मिनिटात पोटदुखी थांबते.
पुरेशी लघवी होण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे प्रमाण योग्य राखले पाहिजे. पाणी कमी प्यायले जाता नये. जर हवेत उष्मा असेल, उष्णतेच्या जागी काम करीत असाल, उन्हात राबत असाल, व्यायाम केला असेल तर पाणी भरपूर प्यायला हवे. 
रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी प्यायल्यास उत्तम. 
अन्नात जास्त मीठ टाळले पाहिजे. पदार्थांवर वरून मीठ घालून घेऊ नये. लोणच्यासारखा खारवलेला पदार्थही टाळावा. जास्तीचे मीठ टाळल्याने, कॅल्शियमचे खडे होण्याची प्रवृत्ती असेल तर सोडियमचे प्रमाण वाढून कॅल्शियम शरीराबाहेर टाकले जाते.
आतड्यात कॅल्शियमचे शोषण होत असल्याची शंका असल्यास दुधाचे पदार्थ आणि कॅल्शियम जास्त असलेले इतर पदार्थ खाण्याचे टाळले पाहिजे.

कॅल्शियम ऑक्‍झॅलेट खडे असतील तर काही पालेभाज्यांसारखे ऑक्‍झॅलेट असलेले अन्नपदार्थ खाणे टाळले पाहिजे. उदाहरणार्थ, पालक, चुका, टोमॅटो, पत्ताकोबी यांचे आहारातील प्रमाण कमी केले पाहिजे. म्हणजे या पालेभाज्या पूर्ण टाळण्याची गरज नाही, मात्र त्या वारंवार खाऊ नयेत. काजू, कोल्ड्रिंक्‍स, चॉकलेट असे पदार्थ मूतखडा असणाऱ्या रुग्णांनी टाळावेच. तसेच मटनामध्ये युरिक ॲसिडचे व काही प्रकारच्या माशांमध्ये ऑक्‍झॅलेटचे प्रमाण खूप जास्त असते. ज्यांना या प्रकारचा मूतखडा आहे किंवा त्याचा त्रास आधी झाला आहे, त्या रुग्णांनी हे पदार्थ कटाक्षाने टाळावेत. कोकणात मासे खाणारी मंडळी आवर्जून सोलकढी पितात. माशांमधून मिळालेल्या ऑक्‍झॅलेटचे आमसोलामुळे विघटन होते. (ज्या आहारामुळे आपले पोट बिघडते, नीट पचन होत नाही असा आहार टाळावा.)

हुलग्याचे म्हणजे कुळीथाचे सूप किंवा पिठले करून घ्यावे. खडा लहान होऊन शरीराबाहेर निघून जाण्यास कुळीथ उपयुक्त ठरतो.

मूतखडा झाल्यास चामोमिला, लायकोपोडियम बेर्रिस व्हल्गॅरिसचा द्राव तीन-चार थेंब पाण्यात टाकून दिवसातून दोन वेळा रोज घेण्याचा उपाय होमिओपॅथींत सांगितला आहे.

आयुर्वेदाने सुचवलेले उपाय
मूतखड्यांवर आयुर्वेदात अनेक औषधे सांगितली आहेत. मूतखड्यांचा त्रास असल्यास एकदा तरी तज्ज्ञाकडून योग्य ती तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे. ताबडतोब शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक नसल्यास निरनिराळे आयुर्वेदिक उपाय सुचवण्यात आले आहेत. वरुणादि काथ हे औषध यासाठी उपयुक्त आहे. पाषाणभेद वनस्पती व गोखरू काटे (सराटे) यांचे समप्रमाणात  मिसळलेले चूर्ण दिले जाते. पुनर्नवा वनस्पतीही मूतखड्यावर उपयुक्त आहे. पुनर्नवा (खापरखुटी, वसूची भाजी) ही पावसाळ्यापासून होळीपर्यंत ठिकठिकाणी आढळते. ओली वनस्पती काढून सावलीत वाळवून नंतर वापरता येते.

एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे की, कोणत्याही उपचारांना काही मर्यादा असतातच. घरगुती उपचार हे प्राथमिक उपचार आहेत. वैद्यकीय तज्ज्ञापर्यंत पोचण्याच्या आधी रुग्णाचा त्रास कमी करण्यासाठी ते उपचार आहेत. उपचारांच्या मर्यादा लक्षात घेऊन ते केले पाहिजेत. दुसरी गोष्ट, खडा लहान आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. प्रत्येक खडा हा सुरवातीला लहानच असतो. खडा लहान असल्याने तो सहज पडून जाईल, असा गैरसमज मनात असू नये. तसेच, खडा पडून जाण्यासाठी उपाययोजना केल्यानंतर तो खराच पडून गेला आहे ना, याची पुन्हा तपासणी करून खातरजमा करावी. काही वेळा उपचारामुळे खड्याचा आकार कमी होतो आणि होणारा त्रास थांबतो. पण खडा पडून गेलेला नसतो. खड्यामुळे होणारा त्रास थांबला म्हणून त्याकडे दुर्लक्ष केल्यास आणि प्रत्यक्षात खडा पडून गेलेला नसल्यास त्यावरच पुटे चढून हाच खडा मोठा होत जातो. खड्याचे मूत्रपिंडातील अस्तित्व मूत्रपिंडाची क्षमता कमी करणारे, मूत्रपिंड निकामी करणारे ठरू शकते. तसेच मूत्रसंस्थेत कोठेही खडा अडकून तिथे घासत राहिला तर तेथे व्रण होण्याची व त्याचे कर्करोगात रूपांतर होण्याची भीती असते. म्हणून वेळच्या वेळी काळजी घेणे, मूतखडा नसल्याची खातरजमा करून घेणे, वैद्यकीय सल्ला घेणे हाच योग्य मार्ग आहे. 

loading image
go to top