मूत्रकृच्छ्र-पथ्यापथ्य

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 10 November 2017

ताजे आवळे उपलब्ध असले तर त्यांचा रस काढून किंवा आवळकाठीचा काढा तयार करून त्यात गूळ मिसळून घेण्याने थकवा दूर होतो, शरीर-मन तृप्त होतात, रक्‍तपित्त, दाह, शूल व मूत्रकृच्छ्र हे रोग दूर होतात.

मूत्र म्हणजे लघवी आणि कृच्छ्र म्हणजे अवघड. त्यामुळे या रोगात लघवी कष्टाने होते, लघवी करताना जळजळ व वेदना होते किंवा लघवी थोडी-थोडी होते,  वारंवार लघवीला जावे लागते, लघवी झाल्यावरही समाधान होत नाही वगैरे लक्षणे आढळतात, त्या रोगाला ‘मूत्रकृच्छ्र’ असे म्हणतात. 

पित्तामुळे मूत्रकृच्छ्र होते तेव्हा त्यात मुख्य लक्षण दाह हे असते. यावर थंड वस्तू पथ्यकर असतात. 

द्राक्षाविदारीक्षुरसैर्घृतैश्‍च कृच्छ्रेषु पित्तप्रभवेषु कार्याः ।
  द्राक्षांचा रस किंवा मनुका कोळून काढलेले पाणी 

 

विदारी कंद म्हणून वेलाला खाली येणारा रताळ्यासारखा कंद असतो त्याचा रस
उसाचा रस या गोष्टी मूत्रदाहावर पथ्यकर असतात. 

कोहळा किंवा पेठा हा एक प्रकारचा भोपळा असतो, तो लघवी सहजतेने होण्यासाठी मदत करणारा असतो. 

कुष्माण्डकरसं पीत्वा सयवक्षारशर्करम्‌ ।
मूत्रकृच्छ्राद्विमुच्येत शीघ्रश्‍च लभते सुखम्‌ ।।

कोहळ्याच्या रसात जवखार व साखर मिसळून पिण्याने मूत्रप्रवृत्ती विनासायास आणि मोकळेपणाने होते. 

आवळा हा सुद्धा मूत्रवहसंस्थेसाठी हितकर असतो. 
गुडेनामनलकं वृष्यं श्रमघ्नं तर्पणं परम्‌ ।
पित्तासृग्दाहशूलघ्नं मूत्रकृच्छ्रनिवारणम्‌ ।।

ताजे आवळे उपलब्ध असले तर त्यांचा रस काढून किंवा आवळकाठीचा काढा तयार करून त्यात गूळ मिसळून घेण्याने थकवा दूर होतो, शरीर-मन तृप्त होतात, रक्‍तपित्त, दाह, शूल व मूत्रकृच्छ्र हे रोग दूर होतात. 

सितातुल्यो यवक्षारः सर्वकृच्छ्रविनाशनः ।

खडीसाखर व यवक्षार यांचे समभाग मिश्रण पाण्यासह घेण्याने मूत्रकृच्छ्राचा त्रास बरा होतो. 

मूत्रकृच्छ्रावरील अनेक औषधे तांदळाच्या धुवणाबरोबर घ्यायला सांगितलेली असतात. लघवीला जळजळ होत असली किंवा लघवी अडखळत होत असली, वेदना होत असल्या तर कच्चे तांदूळ भिजत घातलेले पाणी म्हणजे तांदळाचे धुवण त्यात खडीसाखर, चिमूटभर वेलची, चिमूटभर धणे-जिरे टाकून घेण्याने लगेच बरे वाटते. 

नारळाचे दूध आणि शहाळ्याचे पाणी हे मिश्रण एकत्र करून घेण्यानेही मोकळी लघवी होण्यास मदत मिळते. नारळाची फुले सहसा दिसत नाही, परंतु ती सुद्धा मूत्रकृच्छ्रावर पथ्यकर असतात. 

नारिकेलोद्भवं पुष्पं तण्डुलोदकसंयुतम्‌ ।
सरक्‍तं मूत्रकृच्छ्रं हि पीतं हन्ति न संशयः ।।

नारळीची फुले, कच्च्या तांदळाबरोबर वाटून पाण्याबरोबर सेवन करण्याने लघवीतून रक्‍त येत असले व लघवी करताना त्रास होत असला तर त्यावर गुणकारी असते. 
स्वयंपाकात वापरली जाणारी वेलची ही सुद्धा लघवीच्या विकारांमध्ये पथ्यकर असते. 
मूत्रेण सुरया वाऽपि कदलीस्वरसेन वा ।
मूत्रकृच्छ्रविनाशाय सूक्ष्मं पिष्ट्‌वा त्रुटिं पिबेत्‌ ।।

वेलचीचे दाणे कुटून तयार केलेले अगदी बारीक (सूक्ष्म) चूर्ण सहा रत्ती प्रमाणात म्हणजे सातशे मिलीग्रॅम गोमूत्र, सुरा (एक प्रकारच्या आयुर्वेदिक मद्य), किंवा केळीच्या मुळाच्या रसाबरोबर घेण्याने मूत्रकृच्छ्र दूर होते. 

ताज्या दूर्वांचा रस, उसाचा रस, ताज्या शतावरीचा रस हे एकत्र किंवा एकेकटे घेण्याने लघवीचे त्रास दूर होतात. धणे व जिरे पाण्यात भिजत घालून गाळून घेतलेले पाणी हे सुद्धा मूत्रकृच्छ्रावर पथ्यकर असते. या सर्व उपायांच्या बरोबरीने कोमट पाण्यात बसून अवगाहन (कटिस्वेद) घेणे, पळसाची पाने वाफवून त्यांचा लेप ओटीपोटावर करणे, आहारात साध्या मिठाऐवजी सैंधव वापरणे, हे उपाय सहायक असतात. 

मूत्रकृच्छ्रामध्ये पथ्य : लाल तांदूळ, जुना तांदूळ, लाह्या, जव, मूग, कुळीथ, कोहळा, काकडी, तांदुळजा, लाल माठ, पडवळ, मुळा, द्राक्षे, नारळ, दूध, ताक, साजूक तूप, उकळलेले पाणी, आले, ओली हळद, मध, गोमूत्र, धणे, जिरे, वेलची, आवळा, ऊस, दूर्वा, ज्येष्ठमध, गवती चहा, गूळ, अहळीव, चंदन, सब्जा, खडीसाखर वगैरे. 

मूत्रकृच्छ्रामध्ये अपथ्य - मका, वरई, नाचणी, मेथी, अंबाडी, चुका, वाल, पावटा, मटकी, चवळी, उडीद, कवठ, अननस, चीज, शिळे पाणी, गाजर, साबूदाणा, चमचमीत व मसालेदार पदार्थ, तीळ, हिंग, मोहरी वगैरे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about Urine