पाऊल आणि पायाचा संधिवात

डॉ. अमरीश बिडये, डॉ. पराग संचेती
Friday, 3 May 2019

पाऊल करू लागते ‘फाऊल’ तेव्हा सावध व्हायचे. पावलाच्या, पायाच्या सांध्यामध्ये संधिवात तर नाही ना, याची खातरजमा करून घ्यायची. संधिवात असेल तर पुढे वाढणाऱ्या समस्या टाळण्यासाठी लगेच तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यायचे. 

पाऊल करू लागते ‘फाऊल’ तेव्हा सावध व्हायचे. पावलाच्या, पायाच्या सांध्यामध्ये संधिवात तर नाही ना, याची खातरजमा करून घ्यायची. संधिवात असेल तर पुढे वाढणाऱ्या समस्या टाळण्यासाठी लगेच तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यायचे. 

संधिवात म्हणजे सांध्यांची झालेली झीज किंवा सांध्यांना सूज आल्यामुळे होणाऱ्या वेदना. अनेक कारणांमुळे संधिवात होऊ शकतो. त्यातील काही मुख्य कारणे म्हणजे सांध्यांचा ऱ्हास झाल्यामुळे (वेअर आणि टीअर), वेगवेगळ्या जंतुसंसर्गांमुळे, मोठे अपघात किंवा आघात झाल्यानंतर (सांध्यांना इजा झाल्याने) तसेच ऱ्हुमेटाइड्‌स इत्यादी. माणसाच्या पायामध्ये तीसपेक्षा जास्त सांधे असतात. या सर्वच सांध्यांवर संधिवाताचा परिणाम होऊ शकतो. माणसाच्या हालचालींमध्ये शेवटचा अवयव म्हणजे पाय असतो. पायातील कोणत्याही कारणामुळे असलेली वेदना त्याच्या चलनशक्तीवर किंवा हालचालींवर परिणाम करू शकते. पावलाच्या सांध्याचा पृष्ठभाग आकाराने अतिशय लहान असतो. या सांध्यावर शरीराचे संपूर्ण वजन येते. त्यामुळे पावलाचा संधिवात या सांध्याला दुर्बल बनवणारा असतो.

पाऊल आणि पायाच्या बाबतीत आढळणारे संधिवाताचे प्रकार :
डिजनरेटिव्ह - हा संधिवाताचा प्रकार गुडघे आणि नितंब यामध्ये सर्रास आढळतो. तेवढ्या प्रमाणात तो पाऊल आणि पायाच्या बाबतीत आढळून येत नाही. पावलाच्या मध्यभागातील सांध्याला किंवा बोटांच्या मोठ्या सांध्याला या प्रकारच्या संधिवाताची लागण लवकर होते. पाऊल जन्मतः सपाट असणे हे भारतात मोठ्या प्रमाणात आढळते. सपाट पाऊल असणाऱ्या बहुतेकांना याचा त्रास होत नाही. परंतु काही लोकांना कालांतराने पावलाच्या मध्य भागातील सांध्याला संधिवाताचा त्रास होतो.

ऱ्हुमेटॉइड : हा एक सर्वसाधारण संधिवाताचा प्रकार आहे. जो एकावेळी अनेक सांध्यांवर परिणाम करतो. ऱ्हुमेटॉइड संधिवातामध्ये बहुतांश रुग्णांचे पाऊल याला बळी पडते. सुरवातीला या आजारामध्ये स्नायुबंधांची झीज होते. नंतर सांध्यांची झीज होऊ लागते. पावलाच्या पुढच्या भागावर याचा जास्त परिणाम होतो, त्यामुळे संबंधित पायाला ऱ्हुमेटॉइड संधिवाताचा धोका संभवतो. 

मोठे अपघात किंवा आघात झाल्यानंतर होणारा संधिवात : याला इंग्रजीमध्ये ‘पोस्ट ट्रॉमॅटिक’ असे म्हटले जाते. पाऊल आणि पायामध्ये हा संधिवाताचा प्रकार सर्वसाधारण आहे. भारतात पायाला होणारे फ्रॅक्‍चर अगदी सामान्य मानले जाते. माणूस उंचावरून पडल्यावर टाचेच्या हाडाला फ्रॅक्‍चर होऊ शकते. यामुळे सांध्यांना इजा पोचते. एकदा कूर्चाला इजा झाल्यावर ते पुन्हा पूर्वस्थितीत येऊ शकत नाही आणि त्यामुळे संधिवात उद्‌भवतो. या इजा पोचलेल्या सांध्यांना योग्य उपचार देऊन पूर्वस्थितीत आणावे लागते, नाहीतर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. पायाचा सांधा एक मिलिमीटर जरी त्याच्या जागेवरून सरकला असेल, तरी त्यावर येणारा भार अंदाजे चाळीस टक्के वाढतो. पावलाच्या मधल्या भागात होणारे फ्रॅक्‍चर बहुतांश वेळा दुर्लक्षित राहते. त्यावर साधे पाय मुरगळण्याचे उपचार केले जातात. योग्य उपचार न मिळाल्यामुळेसुद्धा पावलाच्या मधल्या सांध्याला संधिवाताचा त्रास सुरू होतो.

सांध्याला जंतुसंसर्ग झाल्यामुळे सांध्याच्या कूर्चाची झीज सुरू होते. ओघाने संधिवाताचा त्रास सुरू होतो. काही रुग्णांच्या पाऊल आणि पायाचा क्षय सुरू होतो. क्षयरोग जडल्याचे हे पहिले लक्षण असण्याची शक्‍यता असते. संसर्गजन्य आजारामुळे सांध्याची दाहकता वाढते. अशा संसर्गजन्य आजारांनंतर बराच काळ सांधेदुखी राहण्याची शक्‍यता असते. 

काय करावे? 
पाऊल आणि पायाच्या संधिवाताचे व्यवस्थापन पारंपरिक पद्धतीबरोबरच शस्त्रक्रियेचा पर्याय वापरूनही करता येते. 

पारंपरिक व्यवस्थापन :
पावलाच्या संधिवातावर उपचार करताना सुरवातीला पारंपरिक उपचार पद्धतीचा वापर डॉक्‍टरांकडून नेहमीच केला जातो. या उपचार पद्धतीमध्ये आराम करणे आणि सांध्याला आधार देणे या गोष्टींचा समावेश असतो. ‘RICE` ही संकल्पना संधिवाताच्या सुरवातीच्या काळात अतिशय उत्तम उपचार पद्धत ठरते. रेस्ट म्हणजे आराम, आइस म्हणजे बर्फाने संबंधित सांधा शेकणे, कंप्रेशन म्हणजे सांध्यांवर दाब देऊन केलेले उपचार आणि एलेव्हेशन म्हणजे संबंधित पाय किंवा पावलाला विशिष्ट उंचीवर ठेवणे होय.

पाऊल आणि पायाच्या संधिवातावर उपचार करताना दाहकता कमी होण्यासाठी मर्यादित काळासाठी औषधे दिली जातात. गरजेनुसार तेल आणि क्रिम्स वापरण्याचा सल्ला डॉक्‍टरांकडून दिला जातो. अँटिबायोटिक्‍स, जंतुसंसर्ग न होण्याकरिता औषधे ऱ्हुमटॉइड संधिवातासाठी आणि नंतरही घेण्याची गरज असते. 

पाऊल आणि पायाच्या संधिवातासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसेस आणि बुटांमध्ये वापरण्यासाठी सोल यांचीही गरज काही रुग्णांना भासते. सांध्यांची हालचाल कमी होण्यास यांची मदत होते. ओघाने वेदना कमी होतात. काही घटनांमध्ये केवळ या आधार देणाऱ्या साधनांचा वापर करूनच संधिवात पूर्णपणे बरा होऊ शकतो.  

शस्त्रक्रियेचा पर्याय -
पारंपरिक पद्धतीने उपचार शक्‍य नसतील तर शस्त्रक्रियेचा विचार केला जातो. काही रुग्णांबाबतीत पारंपरिक पद्धतीने केलेल्या उपचारांना यश मिळत नाही, त्यामुळे डॉक्‍टर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात. पायाचे एखादे व्यंग सहजपणे दिसत असल्यास शस्त्रक्रिया करावी लागते. म्हणजे यात रुग्णाला बूट घालताना त्रास होत असल्यास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. पाऊल आणि पायाच्या विविध आजारांची संधिवात ही शेवटची पायरी असते, त्यामुळे संधिवात विकसित व्हायच्या आधीच शस्त्रक्रिया केली जाते. पावलाचे बहुतांश सांधे अतिशय छोट्या आकाराचे असतात, त्यामुळे शस्त्रक्रिया आणि पारंपरिक उपचार यांचा समन्वय साधून देण्यात येणारे उपचार सोडून कोणतीही इतर उपचारपद्धती घ्यायला हे सांधे सक्षम नसतात. 

शस्त्रक्रिया आणि पारंपरिक उपचार यांचा समन्वय :
पाऊल आणि पायाच्या संधिवाताचे उपचार घेताना शस्त्रक्रिया आणि पारंपरिक उपचार यांचा समन्वय करून देण्यात येणारे उपचार हे रुग्णांना मिळणारे वरदान म्हणता येईल. एखाद्या सांध्याला संधिवाताचा त्रास होऊ लागल्यावर त्या सांध्याच्या कूर्चाची झीज होऊ लागते. काही घटनांमध्ये कूर्चा संपूर्ण नष्ट होतो किंवा मूळ आकारात बदल होऊन तो वेगळा होतो. अशा वेळी दोन हाडांचे एकमेकांना घर्षण होऊन वेदना होऊ लागतात. या एकत्रितपणे केलेल्या उपचारांमुळे कूर्चाला पूर्वस्थितीत आणून त्याची हालचाल बंद केली जाते, ओघाने वेदनासुद्धा बंद होतात. 

या उपचार पद्धतीचा एकच तोटा आहे. संबंधित सांध्याची हालचाल बंद होते. यामुळे रुग्णाच्या चालण्यात अधूपणा येतो. ओघाने आजूबाजूच्या सांध्यांवर ताण येतो. भविष्यात या आजूबाजूच्या सांध्यांना संधिवाताचा त्रास होण्याची शक्‍यता असते. 

या उपचार पद्धतीचा आणखी एक प्रकार म्हणजे धातूचा वापर करून संबंधित सांध्याला आधार दिला जातो. सांध्याच्या भोवती हाडाची व्यवस्थित वाढ झाली, हाडाची ताकद वाढली, की हा धातूचा आधार काढून टाकण्यात येतो. यासाठी शस्त्रक्रियेनंतर काही काळ पाय प्लॅस्टरमध्ये ठेवावा लागतो. छोट्या सांध्यासाठी प्लॅस्टरचा कालावधी साधारण सहा आठवडे असू शकतो. मोठ्या सांध्यासाठी अंदाजे तीन महिन्यांपर्यंत पाय प्लॅस्टरमध्ये ठेवावा लागतो.

पाऊल आणि पायाच्या संधिवाताच्या बहुतांश घटनांमध्ये या एकत्रित उपचार पद्धतीचा वापर करण्यात येतो. या पद्धतीमुळे योग्य परिणामांपर्यंत पोचता येते. रुग्णांनासुद्धा या उपचार पद्धतीचा उत्तम फायदा होतो. 

कृत्रिम पुनर्रोपण -
पावलाच्या पुढच्या आणि मधल्या सांध्यांना संधिवाताचा त्रास होत असल्यास हे सांधे बदलता येत नाहीत. पाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा बदलता येऊ शकतो. परंतु या सांध्याचे कृत्रिम पुनर्रोपण ही नवीन संकल्पना आहे, त्यामुळे अजून भारतात उपलब्ध नाही. अनेक पुनर्रोपण शस्त्रक्रियांचे प्रयोग आत्तापर्यंत झाले आहेत; परंतु गुडघे किंवा नितंबाच्या पुनर्रोपणाच्या शस्त्रक्रियांमध्ये मोठे यश लाभलेले दिसते.

अत्याधुनिक पद्धतीने केलेल्या पुनर्रोपण शस्त्रक्रियांचे सकारात्मक परिणाम समोर येत आहेत. पुनर्रोपण शस्त्रक्रियांमध्ये इजा झालेल्या सांध्याचा कूर्चा काढण्यात येतो. सांध्याचा पृष्ठभाग नीट करून त्यावर कृत्रिम कूर्चा बसवला जातो. सांध्यांच्या कृत्रिम पुनर्रोपण शस्त्रक्रियांमुळे वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच, रुग्णाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

सांध्यांच्या कृत्रिम पुनर्रोपण शस्त्रक्रियांचा तोटा असा, की हे कृत्रिम सांधे त्यांच्या जागेवरून काही वेळा निसटू शकतात. काही घटनांमध्ये ते सैल होतात आणि नंतर मूळ जागेवरून हलतात. यामुळे हाडाची झीज होऊ शकते आणि सांध्यांची कृत्रिम पुनर्रोपण शस्त्रक्रिया अयशस्वी ठरते. यामुळे वेदना वाढतात. गरज पडल्यास डॉक्‍टर पुन्हा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात. सांध्यांचे कृत्रिम पुनर्रोपण केल्यानंतर पुढच्या दहा वर्षांत पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागण्याचे प्रमाण साधारण दहा ते तीस टक्के आहे. 

सांध्यांच्या कृत्रिम पुनर्रोपण शस्त्रक्रियेत जंतुसंसर्ग होण्याची शक्‍यता असते. तसेच, जखम चिघळून त्यात पू होण्याची व काही अडचणी निर्माण होण्याची भीती असते; परंतु योग्य काळजी घेतल्यास ही शस्त्रक्रिया यशस्वी होते.  

हे उपचार सुरू करायचे की नाहीत याची निवड पूर्णपणे रुग्णावर अवलंबून असते. कृत्रिम पुनर्रोपण उपचार पद्धतीचा भविष्यात फारसा त्रास होत नाही. पायाच्या संधिवातामध्ये ओस्टिओअर्थरिटीसपेक्षा ऱ्हुमटॉइडअर्थरिटीस बाबतीत ही शस्त्रक्रिया उत्तम परिणामकारक ठरते. पुण्यात नुकताच एक नवीन प्रयोग यशस्वी झाला. यात पायाच्या अंगठ्याच्या मोठ्या सांध्याचे कृत्रिम पुनर्रोपण कार्टीवाच्या साहाय्याने यशस्वी झाले. संधिवाताचा परिणाम अंगठ्याच्या मोठ्या सांध्याला बहुतांश घटनांमध्ये होतो. यासाठी आत्तापर्यंत एकत्रित उपचार पद्धतीचा वापर झाला आहे. मनुष्याच्या चालण्याच्या क्रियेमध्ये हा सांधा अतिशय महत्त्वाचे कार्य करतो. म्हणून या सांध्याच्या निरोगी आयुष्यासाठी भूतकाळात अनेक प्रयोग करण्यात आले. सुरवातीला उत्तम परिणाम दाखवल्यानंतर कालांतराने हे प्रयोग अयशस्वी झाले. त्यामुळे आता शस्त्रक्रियेचा परिणाम होतो. कार्टीवा या आधुनिक कृत्रिम पुनर्रोपण शस्त्रक्रियेत पूर्वीपेक्षा अजून चांगल्या प्रकारचा धातू वापरला जातो. याचा अभ्यास अमेरिका आणि लंडन येथे सुरू आहे. या तंत्रज्ञानाचे सकारात्मक निष्कर्ष दिसून येत आहेत. भविष्यकाळात पायाच्या अंगठ्याच्या मोठ्या सांध्याच्या संधिवातावर हा उपाय असू शकतो. 

पावलाच्या पुढील भागातील सांध्यांना ऱ्हुमटॉइड संधिवाताचा त्रास झाल्यास त्यावर उपचार पद्धती :
ऱ्हुमटॉइड संधिवात बहुतांश वेळा पावलाच्या पुढच्या सांध्यांवर परिणाम करतो. याचा परिणाम इतर छोट्या बोटांवर होतो. यामुळे पावलावर असमान प्रमाणात ताण येतो. पावलावर घट्टा पडण्याची शक्‍यता यामुळे वाढते. काही घटनांमध्ये यामुळे ‘Hallux Varus` हे व्यंग तयार होते. या रुग्णांना बूट घालताना अतिशय त्रास होतो, त्यामुळे कोणतीही समस्या रुग्णाला जाणवत असल्यास त्वरित डॉक्‍टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. हे व्यंग वेळेत दूर करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. या उपचारांमध्ये पायाच्या अंगठ्याच्या मोठ्या सांध्याबरोबरच इतर बोटांच्या छोट्या सांध्यांचाही समावेश असतो. या उपचारांमुळे पाऊल सरळ दिसू लागते. बूट आणि चप्पल घालताना रुग्णाला त्रास होत नाही. शरीराचा भार तळपायावर समान प्रमाणात विभागाला जातो, त्यामुळे रुग्णाच्या शरीराचे संतुलन योग्य राहते. तसेच तळपायाला पडलेले घट्टे नष्ट होतात.

थोडक्‍यात सांगायचे तर...
पाऊल आणि पायाच्या संधिवातावर शस्त्रक्रिया केल्याने संधिवातापासून मुक्तता मिळते, तर शस्त्रक्रिया व पारंपरिक यांची एकत्रित उपचार पद्धती हा एकच उत्तम पर्याय उपचारांसाठी शिल्लक राहतो. संधिवाताचे शरीरावर आणखी गंभीर परिणाम होण्याआधी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. प्रायोगिक पातळीवर याचा अभ्यास सध्या सुरू आहे. यामुळे सद्यःस्थितीत हे उपचार महाग आहेत. यातील काही आत्ता भारतात उपलब्ध नाहीत; परंतु काही काळातच ते सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on arthritis