दमा तमकश्वास

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 5 July 2019

श्वासावर योग्य उपचार वेळेवर केले गेले नाहीत, तर त्यामुळे हृदय व रस-रक्‍तादी धातूंना अशक्‍तता येते. योग्य औषधे, आवश्‍यक उपचार, उचित आहार-विहार करून दम्याला आटोक्‍यात ठेवले पाहिजे. अन्यथा गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.

श्वासावर योग्य उपचार वेळेवर केले गेले नाहीत, तर त्यामुळे हृदय व रस-रक्‍तादी धातूंना अशक्‍तता येते. योग्य औषधे, आवश्‍यक उपचार, उचित आहार-विहार करून दम्याला आटोक्‍यात ठेवले पाहिजे. अन्यथा गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.

दमा म्हणून जो रोग प्रसिद्ध आहे, त्याला आयुर्वेदात ‘तमकश्वास’ असे म्हणतात. आयुर्वेदात जे महाव्याधी (कठीण रोग) सांगितले, त्यातील ‘श्वास’ या रोगाचा हा एक प्रकार. दमा रोग सहसा पावसाळ्यात डोके वर काढतो. दम्याची प्रवृत्ती असणाऱ्यांना या दिवसांमध्ये आधीपासूनच काही साधे, काही घरगुती उपाय माहिती करून घेणे उत्तम होय. दमा का होतो, त्यावर कोणते उपचार करता येतात, पथ्य काय पाळावे लागते वगैरे गोष्टींची माहिती आज आपण करून घेऊ या. 

दम्याचे वर्णन करताना सुरवातीलाच आचार्य सांगतात, की श्वासावर योग्य उपचार वेळेवर केले गेले नाहीत, तर त्यामुळे हृदय व रस-रक्‍तादी धातूंना अशक्‍तता येते. योग्य औषधे, आवश्‍यक उपचार, उचित आहार-विहार करून दम्याला आटोक्‍यात ठेवले तर ठीक, नाही तर संतापलेला साप जसा मृत्यूला कारणीभूत ठरतो, तसाच योग्य उपचार न केला गेलेला दमा मृत्यूस कारणीभूत ठरू शकतो. म्हणून दम्याकडे दुर्लक्ष करू नये, योग्य औषध असे की ज्यात खऱ्या अर्थाने दमा बरा करण्याचे सामर्थ्य असते. अर्थातच बरोबरीने खाणे, पिणे, वागणे याचेही पथ्य सांभाळावे लागते.

दमा होतो म्हणजे काय?
आयुर्वेदीय विचारसरणीनुसार दमा होतो म्हणजे नेमके काय होते हे पुढील सूत्रावरून समजू शकेल,
कफोपरुद्धगमनः पवनो विष्वगास्थितः ।
प्राणोदकान्नवाहीनिदुष्टः स्रोतांसि दूषयन्‌ ।।
...अष्टांगसंग्रह शारीरस्थान

प्राण-उदानाची जोडी श्वासोच्छ्वासाचे काम करत असते. उरलेल्या तीन वायूंचा म्हणजे समान, व्यान व अपान यांचाही प्रभाव श्वासोच्छ्वासावर होत असतोच. वाताची गती जोवर व्यवस्थित आहे तोवर श्वसन व्यवस्थित चालू असते, पण ती गती कफदोषामुळे अवरुद्ध झाली तर अडलेला वात प्राणवह, उदकवह तसेच अन्नवह स्रोतसांना बिघडवतो व दम्याची उत्पत्ती करतो. थोडक्‍यात दमा होण्यास कफ व वात हे दोन दोष मुख्यत्वे कारणीभूत असतात. 

लक्षणे दम्याची
दम्याची सामान्य लक्षणे अशी होत. 
  सर्दी होते, घशात कफ साठल्याने श्वासोच्छ्वासाच्या वेळी घूर-घूर आवाज येतो, खोकला येतो, खोकल्याची उबळ तीव्र असते, पण छातीत कफ इतका चिकटलेला असतो की खोकून खोकून व्यक्‍ती बेजार होते, पण कफ सुटत नाही. बराच वेळ खोकल्यावर जर थोडा कफ पडला तर काही वेळापुरते बरे वाटते, पण पुन्हा खोकला येतोच, दम लागतो, बेचैनी वाटते, खूप तहान लागते. 

  दम लागायला लागला की, बोलावयास त्रास होतो. दम्याने त्रस्त मनुष्य आडवा पडू शकत नाही; कारण त्यामुळे छातीवर दाब येतो, वेदना होतात, दम अजूनच वाढतो, डोळ्यांवर सूज येते, डोक्‍याला व संपूर्ण अंगाला घाम येतो, काहीतरी गरम घ्यावे किंवा छातीवर शेक घ्यावा अशी इच्छा होते. 

  बहुधा असा त्रास रात्रीच्या अंतिम प्रहरी म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर एक-दोन तास असताना होतो. पावसाळा, ढगाळ वातावरण, थंडी असताना त्रासाचे प्रमाण वाढते. तसेच, कफकारक आहार-विहारानेही त्रास होतो.

  राग, भय, अतिरिक्‍त ताण यामुळेही दम्याचा त्रास होतो किंवा वाढतो.

तमकश्वासाचे म्हणजेच दम्याचे दोषानुबंधानुसार दोन प्रकार होतात. वात-कफदोषाच्या कमी-अधिक प्रमाणावरून त्याचे कफप्रधान तमकश्वास व वातप्रधान तमकश्वास असे दोन प्रकार करता येतात. 

कफप्रधान प्रकारात छातीत कफ अधिक असतो, खोकल्याची ढास त्यामानाने कमी लागते व हा कफ लवकर सुटतो. वातप्रधान प्रकारात मात्र खोकला कोरडा असतो, खूप खोकल्यावर थोडासा कफ सुटतो. हा प्रकार अधिक कष्टकारक असतो. दम्याच्या रोग्यामध्ये वरील कोणत्या प्रकारचा दमा आहे हे सर्वप्रथम ठरवावे लागते, कारण त्यानुसार उपचारांची दिशा बदलते. 

तमकश्वास योग्य प्रयत्नांनी बरा होऊ शकतो, मात्र, व्यक्‍ती अत्यंत दुर्बल असेल व रोग खूप वाढलेल्या अवस्थेत असेल तर मात्र असाध्य ठरू शकतो. 

दम्यावरचे काही घरगुती उपचार
  दालचिनी, लवंग, मिरे, सुंठ, जायपत्री व खडीसाखर समभाग एकत्र करावे. हे अर्धा चमचा मिश्रण मधासह सकाळ संध्याकाळ घेणे. 
  अडुळशाची पाने वाफवून रस काढावा व दोन चमचे रसात चिमूटभर दालचिनीचे चूर्ण टाकून मधासह दिवसातून तीन वेळा घेणे. 

 दम्याचा तीव्र वेग असता आल्याचा रस व मध हे मिश्रण वारंवार चाटवणे. 
  दम्याचा तीव्र वेग असता लवंग व वेलची घालून विड्याचे पान चघळून खाणे व हळूहळू रस गिळणे. 

  दम्याचा तीव्र वेग असता कोमट तीळ तेलामध्ये थोडेसे मीठ घालून छाती व पोटावर हलक्‍या हाताने चोळणे फायदेशीर असते. संतुलन अभ्यंग तेलाचा पण उपयोग होतो. उकळत्या पाण्यात लवंग, तुळशी, ओवा, अक्कलकरा, कापूर यापैकी मिळतील तेवढ्या गोष्टी टाकून वाफारा घेता येतो. किंवा निलगिरी वा लवंगाच्या तेलाचा वाफारा घेता येतो. 

  दम लागत असताना रुईच्या पानास तेलाचे बोट लावून तव्यावर गरम करून व त्याने छाती व पोटाला तेल लावून शेकणे लागलीच गुण देणारे असते. 

 कपभर पाण्यात थोडे किसलेले आले टाकून उकळले, गाळून घेतले व नंतर खडीसाखर, चिमूटभर कापूर व थोडा हिंग टाकून गरम असताना घोट घोट पिण्याने दम लागायचा कमी होतो.

  दम्याचा विकार असणाऱ्यांनी गवती चहा, तुळशीची पाने, आले, दालचिनी टाकून केलेला चहा नियमित घेणे हितावह असते. 

  दम्याचा त्रास असता वर्षभर, विशेषत: त्रास होतो त्या ऋतूत, सकाळी एक कप कोमट पाण्यात एक चमचा मध घालून घेणे पथ्यकर असते. 

  जेवणात फोडणीमध्ये लसणाचा वापर दम्यासाठी उपयुक्‍त ठरतो. 

  दम्याचा त्रास असणाऱ्यांनी पोट हलके व साफ राहील याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक होय. 

  दम्याचा आवेग कमी करण्यासाठी आठ-दहा थेंब दालचिनीचे तेल साखरेत मिसळून घेता येते. 

  आल्याचा रस, विड्याच्या पानाचा रस व मध सम प्रमाणात एकत्र करून घेण्याचाही फायदा होतो. 

  दम्यामध्ये देवदाराची साल, गुग्गुळ, धूप, ओवा, तगरीची सुकवलेली फुले यांची धुरी घेतल्यास किंवा संतुलन टेंडरनेस सारख्या धुपाची धुरी घेतल्यास फायदा होतो. 

डॉक्‍टरांच्या सल्ल्याने प्राणसॅन योग, श्वाससॅन, श्वासकुठार, श्वासचिंतामणी ही औषधे घेता येतात व त्याचाही दम्यावर उत्तम उपयोग होताना दिसतो. 

दम्याचे पथ्य - अपथ्य 
पथ्य - साठेसाळीचे तांदूळ, साळीच्या लाह्या, कुळीथ, गहू, यव, तूप, मध, जुने मद्य, बकरीचे दूध, परवर, तोंडली, वांगी, चवळईची पालेभाजी, माठ, मसूर, मूग, तूर, द्राक्षे, मनुका, गरम पाणी, लसूण, आले, ओली हळद, आंबेहळद, वेलची, केशर, दालचिनी, लवंग, तमालपत्र, मिरे.

अपथ्य - मासे, रताळे, सुरण वगैरे कंदमुळे, तांबडा भोपळा, भेंडी, वाल, वाटाणे वगैरे पचावयास जड कडधान्ये, साबुदाणा, मोहरी, अननस, फणस, चिकू, सीताफळ, कैरी, लोणची, दही, थंड पाणी, शीतपेय, रात्रीचे आईस्क्रीम.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on astma